उगवतीचे रंग
नात्यांचं महावस्त्र – भाग अठरा : 'समाज' (माणूसपणाला आकार देणारे विशाल महावस्त्र)
प्रिय वाचकहो,
प्रत्येक भागागणिक नात्यांच्या महावस्त्राचे विविध पदर उलगडून पाहण्याचा प्रयत्न आपण अखंडपणे करत आहोत. हा भाग लिहिताना मनात असा विचार आला की, या नात्यांच्या महावस्त्रामध्ये 'समाज' या घटकाचा अंतर्भाव करावा का? मग अधिक विचार करताना असं लक्षात आलं की, माणूस वाढतो आणि घडतो तो समाजातच! त्याचं कर्तृत्व, त्याचे विचार आणि त्याचे संपूर्ण अस्तित्व विकसित होते ते केवळ आणि केवळ समाजामध्येच.
एखादं अवाढव्य यंत्र असावं आणि त्याचे अनेक बारीक-सारीक भाग त्याच्याभोवती समन्वयाने सतत फिरत राहावेत; अगदी तसंच माणूस आणि समाज यांचं अतूट नातं आहे असं मला वाटतं. त्या यंत्रातील एखादा जरी लहानसा भाग बिघडला तरी संपूर्ण यंत्राचे कार्य थांबतं. त्याप्रमाणेच आपण सगळे या समाजरूपी महायंत्राचा एकेक अविभाज्य घटक आहोत; म्हणजेच आपल्या प्रत्येकाची समाजाप्रती काहीएक निश्चित जबाबदारी आहे. मग या समाजाचा विचार 'नात्यांचं महावस्त्र' विणताना का करू नये? आणि म्हणूनच आजचा हा लेख! जेव्हा समाजाचा विचार येतो, तेव्हा त्याच्या सोबतीने संस्कृतीही येते, म्हणूनच संस्कृतीचा विचारही या भागात सहजपणे जोडला गेला आहे.
रसिकहो, 'नात्यांचं महावस्त्र' विणताना पहिल्या टप्प्यात आपण कौटुंबिक रक्ताच्या नात्यांची ऊब अनुभवली; दुसऱ्या टप्प्यात आत्मिक दृष्टी देणारे 'गुरू', जीवाभावाचा 'मित्र' आणि उंबरठ्याबाहेरचा खरा आप्त असणारा 'शेजारी' हे रक्तापलीकडचे जिवंत बंध पाहिले. या वैयक्तिक आणि कौटुंबिक परिघाच्या पलीकडे जाऊन ज्या अथांग अवकाशात हे सारे धागे एकत्र गुंफले जातात, ज्याच्या कुशीत माणूस जन्म घेतो, वाढतो आणि स्वतःचे अस्तित्व शोधतो, त्या सर्वात विशाल आणि पायाभूत घटकाचे नाव म्हणजे 'समाज'!
माणूस हा मुळातच निसर्गतः समाजप्रिय प्राणी आहे. जन्माला आल्यापासून ते अखेरचा श्वास घेईपर्यंत मानवाला लागणारी सुरक्षा, ओळख, भाषा, संस्कार आणि विकासाच्या अमर्याद संधी केवळ आणि केवळ समाजामुळेच उपलब्ध होतात. सिमेंट-विटांचे घर केवळ निवारा देते; पण जगण्याला खरी सुरक्षितता, प्रतिष्ठा आणि अर्थ मिळवून देतो तो सामूहिक जीवन जगणारा समाज!
या ठिकाणी मला एका चित्रपटाची कथा प्रकर्षाने आठवते. हॉलीवूडचा एक जगप्रसिद्ध चित्रपट आहे—'कास्ट अवे' (Cast Away). 'चक नोलँड' हा त्या चित्रपटाचा नायक एका भयानक विमान अपघातातून आश्चर्यकारकरीत्या वाचतो आणि एका निर्जन बेटावर जाऊन फेकdisplayला जातो. तिथे एकट्याने जगण्यासाठी त्याला नारळ, पाणी, मासे आणि गुहेचा निवारा सर्वकाही मिळते. भौतिक गरजा भागतात; पण सभोवताली एकही माणूस नसलेल्या त्या भयाण एकांतात त्याचा जीव गुदमरू लागतो. माणसाच्या सोबतीसाठी आसुसलेला चक अखेर समुद्रातून वाहून आलेल्या एका व्हॉलीबॉलवर स्वतःच्या रक्ताने एक मानवी चेहरा रेखाटतो, त्याला 'विल्सन' असे नाव देतो आणि त्या निर्जीव चेंडूशी तासन् तास माणसासारखा बोलू लागतो!
हा चित्रपट एका अत्यंत विदारक सत्यावर बोट ठेवतो. ते सत्य म्हणजे माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा जितका मूलभूत आणि आवश्यक आहे, तितकीच दुसऱ्या माणसाची सोबत आणि समाजाचा परिसरही अपरिहार्य आहे. पूर्वी एखाद्या व्यक्तीला कठोर शिक्षा द्यायची असेल, तर त्याला एकांतवासात डांबत असत. एकटे राहणे ही माणसासाठी जगातील सर्वात मोठी शिक्षा ठरते; कारण दीर्घकाळ एकटेपणाने माणसाला वेड लागण्याचीही शक्यता असते. समाजाशिवाय माणूस म्हणजे पाण्याबाहेर काढलेला मासा! आपण कितीही श्रीमंत, व्यस्त किंवा यशस्वी झालो, तरी शेवटी माणसाला माणसाचीच ओढ असते. आपण यशस्वी झालो किंवा एखादे उत्तुंग कर्तृत्व गाजवले, तर समाजाने आपल्या पाठीवर कौतुकाची थाप टाकावी ही प्रत्येकाची स्वाभाविक अपेक्षा असतेच. समाज हा परस्परांवरील निखळ प्रेमाने, संवादाने आणि सहकार्यानेच जिवंत राहतो.
आफ्रिकन तत्त्वज्ञानात एक नितांत सुंदर संकल्पना आहे, 'उबुंटू' (Ubuntu). त्याचा अर्थ असा: "मी आहे, कारण आम्ही आहोत!" (I am because we are). व्यक्तीचे अस्तित्व हे समाजाच्या अस्तित्वावरच अवलंबून असते. आपल्या जीवनात समाजाचे योगदान पायाभूत आहे. एकटा माणूस अरण्यातल्या श्वापदांसमोर किंवा संकटांसमोर हतबल ठरतो; पण समाजच त्याला सामूहिक सुरक्षिततेचे अभेद्य कवच देतो. म्हणूनच मानवी इतिहासात आदिमानव एकत्र आला, त्यातून कुटुंब निर्माण झाले आणि कुटुंबांमधून हा विस्तीर्ण समाज उभा राहिला. त्यातून संस्कृती विकसित होत गेली.
सुखात आनंद द्विगुणीत करणारा आणि संकटात पाठीवर आश्वस्त हात ठेवणारा समाजच माणसाला नैराश्यातून बाहेर काढतो. त्यामुळे एखाद्याने जर समाजाशी फटकून वागायचे ठरवले, तर शेवटी त्याच्यावर केवळ पश्चात्ताप करण्याचीच वेळ येते हे निश्चित!
पिढ्यानपिढ्या चालत आलेले ज्ञान, विज्ञानाचे शोध आणि जगण्याची कौशल्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्याचे अजोड कार्य समाजातील शाळा, ग्रंथालये आणि संस्था करत असतात. समाज माणसाला हक्क, कर्तव्ये आणि नैतिकतेचे भान देतो; ज्यामुळे समता, न्याय आणि शांतता टिकून राहते.
विशेष म्हणजे, या समाजाची सर्वात उत्तुंग आणि अलौकिक देणगी कोणती असेल, तर ती म्हणजे आपली 'संस्कृती' (Culture)!
संस्कृती म्हणजे केवळ सण, उत्सव किंवा कर्मकांडे नव्हेत; तर माणसाची जगण्याची पद्धत, त्याचे उदात्त विचार, मूल्ये, कला आणि परंपरांचा एकत्रित त्रिवेणी संगम म्हणजे संस्कृती. संस्कृतीच माणसाला केवळ एक जैविक प्राणी राहू न देता त्याला संवेदनशील, विवेकी आणि सुसंस्कृत 'मानव' बनवते.
संस्कृती व्यक्तीला त्याची मूळ ओळख आणि अस्मिता देते. आपण कोण आहोत, आपले पूर्वज कोण होते आणि आपली मुळे कुठे रुजलेली आहेत, याचे उत्तर संस्कृतीतून मिळते. दिवाळीचा प्रकाश, ईदचा गोडवा, ख्रिसमसचा आनंद हे सर्व सण भेदाभेद विसरून समाजाला एका सूत्रात बांधतात. संगीत, नृत्य, साहित्य, चित्रकला आणि नाट्य यांसारख्या ललित कला समाजाच्या सांस्कृतिक कुशीतच बहरतात आणि मानवी मनाची संवेदनशीलता जिवंत ठेवतात.
विशेषतः भारतीय संस्कृतीने तर माणसाला निसर्गाचा आदर करायला शिकवले. वटपौर्णिमेला वटवृक्षाची पूजा, नागपंचमीला मुक्या प्राण्याबद्दल कृतज्ञता, नद्यांना दिलेले 'लोकमाता' हे पवित्र रूप—हे सर्व माणसाचे आणि निसर्गाचे अतूट नाते जपणारे उदात्त सांस्कृतिक संस्कार आहेत.
मात्र, आजच्या यांत्रिक आणि वेगवान युगाकडे पाहिले तर एक विदारक चित्र समोर येते. आजचा माणूस स्वतःच्या विवंचनांनी ग्रस्त आहे, तर आजचा समाजही अनेक संघर्ष आणि समस्यांनी वेढलेला आहे. जात, धर्म, प्रांतिक अस्मिता, आर्थिक विषमता आणि सोशल मीडियावरील द्वेष यामुळे समाजाची वीण उसवू पाहत आहे. माणसामाणसांमधील जिवंत संवाद आटत चालला आहे.
पण माणूस कितीही दूर गेला तरी तो समाजाशिवाय जगू शकत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मग हे नाते अधिक सुदृढ करण्यासाठी आपल्याला काय करता येईल ? या गोष्टीचा विचार करताना मला पुढील काही मुद्दे महत्त्वाचे वाटतात.
प्रत्येक गोष्टीत "यात माझा काय फायदा?" हा संकुचित हिशोब न करता, "यातून माझ्या समाजाचे काय भले होईल? मी समाजासाठी काय योगदान देऊ शकतो?" हा उदात्त विचार रुजवायला हवा. असाच निःस्वार्थ विचार कर्मयोगी बाबा आमटे आणि असंख्य समाजसुधारकांनी केला, म्हणूनच या भूतलावर साक्षात मानवतेचे दर्शन घडले. आज माणूस सोशल मीडियाच्या आभासी जगात जास्त गुरफटला आहे. समाजासाठी कार्य करताना या आभासी चौकटीतून बाहेर पडून प्रत्यक्ष माणसांना भेटणे, शेजारी-पाजारी विचारपूस करणे आणि आस्थेने गरजूंच्या मदतीला धावून जाणे आवश्यक आहे.
भिन्न मते आणि भिन्न जीवनपद्धती असलेल्या व्यक्तींचा आदर करण्याची सहिष्णू दृष्टी मनात निर्माण झाली पाहिजे. त्यालाच तर आपण लोकशाही म्हणतो ना! हे संस्कार नव्या पिढीमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून रुजवता आले पाहिजेत. असा आदर्श समाजातील तरुण पिढी समोर ठेवण्याचे कार्य समाजातील जाणत्यांनी करायला हवे.
समाज आपल्याला शिक्षण, प्रतिष्ठा, सुरक्षितता आणि ओळख मिळवून देतो; त्या बदल्यात समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकाला सक्षम करण्यासाठी आपल्या वेळेचा, ज्ञानाचा आणि संपत्तीचा काही अंश तरी कृतज्ञतापूर्वक परत केला पाहिजे ही प्रत्येकाचीच नैतिक जबाबदारी ठरते !
नात्यांच्या या भरजरी 'महावस्त्रा'चा हा 'समाज' नावाचा पदर म्हणजे एकाच धाग्याने बांधलेली लक्षावधी मनांची एक विशाल चादर आहे. या चादरीचा एकही धागा उसवला तर संपूर्ण वस्त्र विस्कळीत होते; पण जेव्हा प्रत्येक धागा दुसऱ्या धाग्याला प्रेमाने आणि विश्वासाने घट्ट धरून ठेवतो, तेव्हा ही चादर किंवा हे महावस्त्र काळाच्या कोणत्याही वादळात संपूर्ण मानवतेला मायेची आणि सुरक्षिततेची शाश्वत ऊब देते!
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१/११/२०२६
प्रतिक्रियेसाठी: ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा