उगवतीचे रंग
गुलमोहर गर तुम्हारा नाम होता…
“गुलमोहर गर तुम्हारा नाम होता,
मौसम-ए-गुल को हँसाना भी हमारा काम होता…”
सत्तरच्या दशकातील एका सुरेल चित्रपटातलं हे गीत कानावर पडलं की मन नकळत एका केशरी-लाल बहराच्या दुनियेत जाऊन विसावतं. प्रेयसीला गुलमोहराची उपमा देणाऱ्या त्या शब्दांमधली कोमलता आणि झाडाचं विलोभनीय सौंदर्य मनाला एका वेगळ्याच प्रसन्नतेने भरून टाकतं. ‘गुलमोहर’ हा मूळचा उर्दू शब्द. ‘गुल’ म्हणजे फूल आणि ‘मोहर’ म्हणजे मोर किंवा मुकुट; थोडक्यात सांगायचं तर फुलांचा मोर! आपल्या पिसार्यातील मोहक रंग उधळून मोर जसा रानावनात थुईथुई नाचताना देखणा दिसतो, अगदी तसाच हा वृक्ष एप्रिल-मेच्या रखरखत्या उन्हात लाल-केशरी फुलांचा मनमोहक पिसारा फुलवून उभा असतो.
उन्हाळ्याच्या दुपारची काहिली होत असताना, जेव्हा सृष्टी निष्पर्ण आणि उदास वाटू लागते, तेव्हा हा गुलमोहर मात्र स्वतःच्या अंगावर रंगांची आगळीवेगळी होळी खेळत असतो. पूर्ण बहरलेलं हे झाड पाहिलं की मनात एक गमतीदार विचार येतो—जणू या झाडाने आपली हिरवीगार पाने शेजारच्या इतर झाडांना काही काळासाठी उसनी दिली असावीत आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून हा फुलांचा प्रचंड खजिना पदरात पाडून घेतला असावा! झाडाखाली फुलांचा पायघडीसारखा सडा पडतो, तेव्हा डांबरी रस्ता किंवा काळी माती त्या लाल-नारंगी रंगात न्हाऊन निघते.
तसा गुलमोहर हा आपल्याकडचा मूळ वृक्ष नाही; तो विदेशी, मूळचा मादागास्करचा. पण जगभरातील अनेक देशांना भुरळ पाडत त्याने भारताच्या मातीलाही आपलंसं केलं. पूर्व भारतात तर लोक त्याला मोठ्या आदराने ‘कृष्णचुरा’ म्हणतात, म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णाचा मोरपिसांचा मुकुट!
माझ्या आठवणींच्या कुंभात गुलमोहराचं एक खास पान जपलेलं आहे. पूर्वी आमच्या महाविद्यालयाच्या प्रांगणात एक भलामोठा गुलमोहर दिमाखात उभा होता. त्याच्या खोडाभोवती एक छानसा पार बांधलेला होता. लेक्चर्स संपले किंवा ‘ऑफ पिरियड’ असला की त्या पारावर तरुण मुला-मुलींची एकच जत्रा भरायची. गुलमोहर जणू त्या तरुणाईच्या खळाळत्या हास्याला आणि सुख-दुःखांच्या गप्पांना आपल्या फांद्यांच्या छत्रछायेत मूकपणे ऐकत असायचा. स्वतःचं तारुण्य आणि रूप त्या मुलांच्या अंगात भिनवत असायचा.
त्या झाडाच्या सावलीत किती तरी मने एकमेकांत गुंफली गेली असतील, तर किती तरी प्रेमभंगांचे अबोल हुंदके त्याने आपल्या पालापाचोळ्यात सामावून घेतले असतील. त्या पाराकडे पाहताना मला बाबुजींच्या (सुधीर फडके) त्या अजरामर गाण्याची ओळ नेहमी आठवायची—
“त्या तरूतळी विसरले गीत…हृदय रिकामे घेऊन फिरतो इथे तिथे टेकित..."
पुढे उच्चशिक्षणासाठी जेव्हा मी पुणे विद्यापीठात गेलो, तेव्हा तर गुलमोहराची आणि माझी रोजचीच भेट व्हायची. विद्यापीठाच्या विस्तीर्ण हिरवळीवर, इंग्रजी राजवटीतील इमारतींच्या पार्श्वभूमीवर ते लालभडक वृक्ष जणू नभाला भिडणारी स्वप्ने घेऊन उभे होते. सभोवताली जमलेली ती रसरशीत तरुणाई आणि डोक्यावर बहरणारा गुलमोहर… ते दिवस आठवले तरी आजही मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहते.
काळाच्या ओघात शिक्षण संपले, चाळीसगावला नोकरीनिमित्त स्थिरावलो. आयुष्यात बरीच वर्षे गेल्यानंतर जेव्हा स्वतःचं नवं घर बांधलं, तेव्हा घराच्या अंगणात एक गुलमोहर लावायचा हा माझा जुना हट्ट मी मोठ्या हौसेने पूर्ण केला. एका नाजूक रोपाची लागवड केली, जनावरांपासून रक्षण व्हावे म्हणून सुंदर कुंपण घातले. रोज त्याला पाणी घालताना मी माझ्या जुन्या आठवणींनाच खतपाणी घालत होतो. हळूहळू ते रोपटं फोफावलं, फांद्या पसरल्या आणि काही वर्षांतच तो एक देखणा वृक्ष झाला!
एका उन्हाळ्यात त्यावर पहिली कळी उमलली आणि पाहता पाहता अंगण लाल फुलांनी डवरले. दारासमोर फुलांचा सडा पडू लागला. महाविद्यालयाच्या पारावर पाहिलेलं ते स्वप्न आता माझ्या स्वतःच्या दारात मूर्त रूपात उभं होतं. घराची ती खरी ओळख बनली होती.
पण निसर्गाचा नियम असावा, बहरालाही कधीतरी दृष्ट लागते. काही वर्षांनंतर रस्त्यावरून झाडे तोडणारी काही माणसे आली. त्यांनी त्या गुलमोहराच्या बुंध्यावर कुर्हाडीचे दोन घाव घातले. मी आवाजाने ताडकन बाहेर आलो, तर ते म्हणू लागले, “साहेब, हे झाड काही कामाचं नाही. हे तोडून टाका. हे परदेशी झाड आहे, त्यावर पक्षी घरटंही बांधत नाहीत, सावलीही कच्ची असते.”
मला त्यांचं बोलणं ऐकून फार राग आला. मी ठामपणे त्यांना बजावलं, “हे मी मोठ्या हौसेने लावलेले झाड आहे, याला हात लावू नका!” नंतरही दोन-तीनदा त्या माणसांनी ते झाड तोडण्याचा आग्रह धरला, पण प्रत्येक वेळी मी त्यांना घरावरून परतवून लावले. मनात विचार आला—पक्षांच्या घरट्यांसाठी इतर झाडे आहेतच की! हे झाड आपल्या दारात उभे राहून येणाऱ्या-जाणाऱ्या डोळ्यांना निव्वळ सौंदर्य देतं, रखरखत्या उन्हात मायेची सावली देतं, मनाला अतीव आनंद देतं; या आनंदाला काही मोल नसतं का? केवळ ‘उपयुक्तता’ हीच अस्तित्वाची एकमेव कसोटी असावी का?
माणसांची ती कठोर कुऱ्हाड थांबली खरी, पण त्यांच्या शब्दांचे घाव बहुधा त्या झाडाच्या अंतर्मनाला लागले असावेत. काय विचित्र योगायोग असावा, ते हिरवेगार झाड हळूहळू मलूल होऊ लागले. पानगळ सुरू झाली आणि काही महिन्यांत ते झाड पूर्णपणे निष्पर्ण झाले. वठलेल्या लाकडासारखा त्याचा केवळ सांगाडा दारात उभा राहिला.
माझा जीव अक्षरशः कासावीस झाला. जणू माझ्या घरातील एखादा हसरा, सजीव कौटुंबिक सदस्यच मला सोडून चालला होता. रोज सकाळी फिरायला जाताना मी त्याच्या खोडाजवळ थांबायचो. त्याच्या खरखरीत सालीवरून मायेने हात फिरवायचो. त्याच्याशी मनातल्या मनात संवाद साधायचो—‘अरे, असा कसा हार मानतोस? तुलाअजून जगायचेआहे. उठ, पुन्हा बहर!’
झाडाला माणसाच्या मायेची भाषा समजते का? विज्ञान काय म्हणेल ठाऊक नाही, पण काही दिवसांनी त्या कोरड्या पडलेल्या शेंड्यावर गुलाबी-तांबूस रंगाचे लहानसे कोंब फुटलेले दिसले. हळूहळू नाजूक हिरवी पाने आली आणि ते झाड पुन्हा एकदा हिरवेगार होऊन उभे राहिले. त्या दिवशी झालेला आनंद हा एखाद्या हरवलेल्या जीवाला पुनर्जन्म मिळाल्यासारखाच होता!
पुढील दोन वर्षे त्याने पुन्हा आपल्याला फुलांनी न्हाऊ घातले. पण बहुधा त्याचे आयुष्य संपत आले होते. त्या एकाकी संवादाने दिलेली ती केवळ एक तात्पुरती संजीवनी असावी.
आणि एका शांत दुपारी… आजूबाजूला कोणीही माणसं नसताना, खाली कोणतंही वाहन उभं नसताना, कुणालाही यत्किंचितही इजा न पोहोचवता, ते भव्य झाड आपल्या मुळांसकट जमिनीवर शांतपणे आडवे झाले. जातानाही त्याने कोणाला त्रास दिला नाही, जणू आपल्या मालकावर आणि घरादारावर एक शेवटचा कृतज्ञ कटाक्ष टाकून ते विसावले.
एका देखण्या गुलमोहराची ऐहिक कथा तिथे संपली होती. पण ते झाड आजही माझ्या अंगणातून कुठेही गेलेले नाही. ते माझ्या डोळ्यांत, माझ्या आठवणींच्या पारावर आणि माझ्या मनाच्या मातीत आपल्या केशरी रंगांसकट कायमचं रुतून बसलं आहे!
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१२/१०/२०२६
प्रतिक्रियेसाठी: ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा