उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १६५
देह्यादीक प्रपंच हा चिंतियेला ।
परी अंतरी लोभ निश्चित ठेला ।
हरीचिंतने मुक्तिकांता वरावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ।।१६५।।
अर्थ : माणूस आयुष्यभर देहाची व संसाराची (प्रपंचाची) चिंता वाहून सगळा व्यवहार करीत असतो, तरीही त्याच्या मनातील विषयांचा व धनाचा लोभ कमी होत नाही. तो लोभ सुटण्यासाठी परमेश्वर चिंतन करून मुक्तीरूपी स्त्रीला वरावे आणि यासाठी नेहमी सज्जनांची (संतांची) संगत धरावी.
( चिंतियेला - सारखा एखाद्या गोष्टीचा विचार करणे, निश्चित - दृढ/घट्ट, मुक्तिकांता - मुक्तीरूपी पत्नी )
विवेचन
जन्माला आल्यापासून संसार माणसाच्या पाठीमागे लागलेलाच आहे. संसार म्हणजे प्रपंच. तो फक्त लग्न झाले म्हणजे असतो असे नाही. विवाहित असो वा असो अविवाहित, प्रत्येकाच्या पाठीमागे काहीतरी विवंचना सारखी लागलेली असते. विवाहित माणसाचा फरक एवढाच पडतो की त्याला पत्नी, पत्नीकडील नातेवाईक, त्याशिवाय आपली मुले आणि नातेवाईक हे सगळे आपले वाटू लागतात. त्यांच्याशी त्याचे नाते एवढे घट्ट होत जाते की हे सगळे माझे आहेत असे त्याला वाटायला लागते. एक प्रकारचा मोहाचा पडदा त्याच्या डोळ्यावर येतो. त्यांच्यासाठी सारखे काहीतरी केले पाहिजे असे त्याला वाटत राहते. त्या मोहातून लोभ उत्पन्न होतो. त्या लोभापायी मग आयुष्यभर सुखाच्या आणि पैशाच्या मागे धावणे सुरू राहते.
आपल्याला सारखी प्रपंचाची आणि आपल्या माणसांची चिंता लागून राहिलेली असते. हे सगळे माणूस आपल्या देहबुद्धीला घट्ट चिकटून असल्यामुळे होते. आपण आणि आपली माणसे हे देहावरील प्रेमच असते. त्यापलीकडे असणाऱ्या आत्मरुपी परमेश्वराला तो पाहू शकत नाही. मग यासाठी उपाय काय ? तो समर्थ तिसऱ्या ओळीत सांगतात. ' हरीचिंतने मुक्तिकांता वरावी.' आपण सतत संसाराची चिंता करतो पण परमेश्वर मला कसा प्राप्त होईल याची चिंता आपण कधी करतो ? संतांनी प्रपंचाची चिंता केली नाही. त्यांनी चिंता केली ती परमेश्वर आपल्याला कसा प्राप्त होईल याची. संसाराची चिंता टाकून देऊन आपण मुक्तीरूपी पत्नीचे वरण करावे. एकदा का ' मुक्ती ' आपली कांता म्हणजे बायको झाली की संसारातील सुखदुःखाचे काही वाटत नाही.
रामकृष्ण परमहंस आणि शारदामाता तसे लौकिक अर्थाने पतिपत्नी होते. पण पतिपत्नीचे देहाचे नाते त्यांनी कधी पाळले नाही. एकमेकांकडे देह म्हणून न पाहता त्यांनी आपल्यातील आत्मरुपी परमेश्वर पाहिला. साखरखेर्डा येथील प्रल्हाद महाराज रामदासी आणि त्यांच्या पत्नी यांनी देखील आयुष्यभर हा दंडक पाळला. प्रपंचातील कांता परमार्थाच्या दृष्टीने बंधन ठरू शकते पण समर्थ म्हणतात त्याप्रमाणे मुक्तिकांता हिला आपली पत्नी केली की ती आपल्याला सर्व बंधनांपासून सोडवते.
तुकाराम महाराज देखील म्हणतात, ' तुका म्हणे मुक्ति पर्णिली नोवरी| आता दिवसचारी खेळीमेळी||’ मुक्तीची आस धरणाऱ्या अशा संतांकडून उपदेश मिळाल्यास आपल्या जीवनाचे सार्थक होते. भगवद्गीतेत देखील भगवंत म्हणतात, ‘मन्मना भव, मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ' माझे अनुसंधान धर .प्रापंचिक कल्पना जाळून टाक. माझ्या भावनेने भरून जा. तर तू मत्स्वरूप होशील. असे केलेस तर तुझ्या गळ्यात मुक्तीरुपी कांता माळ घालेल .तू मुक्त होशील.' पण हे सगळे संतांच्या संगतीने शक्य होईल. म्हणूनच समर्थ सांगतात त्याप्रमाणे संतांचा सहवास मिळवणे आवश्यक असते. त्यामुळे नेहमी शरीराने जरी नाही मनाने संतांचा सहवास करावा. त्यांच्या ग्रंथांच्या अध्ययन, मनन यातून आपल्याला हा सहवास लाभतो.
स्वसंवाद
१. मी २४ तास केवळ प्रपंचाची, पैशाची आणि स्वतःच्या माणसांचीच चिंता करतो, की ईश्वराच्या अनुसंधानासाठी व आत्मोद्धारासाठीही थोडा वेळ काढतो?
२. रामकृष्ण परमहंस किंवा प्रल्हाद महाराजांप्रमाणे, मी माझ्या लौकिक नात्यांत केवळ देहबुद्धीने अडकलो आहे, की त्यापलीकडचा ईश्वरी अंश पाहण्याची दृष्टी ठेवतो?
३. भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे ("मन्मना भव मद्भक्तो"), प्रापंचिक वासना आणि लोभ बाजूला सारून मी मनाने ईश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो का?
४. समर्थांच्या शिकवणीनुसार, प्रपंचातील बंधने सैल करून 'मुक्तीरूपी कांतेला वरण्यासाठी' (आत्ममुक्तीसाठी) मी संतांच्या ग्रंथांचा आणि विचारांचा नित्य सहवास धरतो का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२०/८/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा