मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग २०५

उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग २०५ 

मनाची शते ऐकता दोष जाती ।

मतिमंद ते साधना योग्य होती ।

चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी ।

म्हणे दास विश्वासतां मुक्ति भोगी ।।२०५।।

अर्थ : हे दोनशे पाच मनाचे श्लोक श्रवण केले तर दोष निघून जातात. अज्ञानी माणसे भक्तिमार्गाला लागतील. आपल्याला ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य प्राप्त होईल. समर्थ म्हणतात यावर विश्वास ठेवून वागल्यास नक्कीच मुक्तीचे अधिकारी व्हाल.

( मनाची शते - मनाचे हे दोनशे पाच श्लोक, मतिमंद - अज्ञानी/ आपले हित न कळणारे, विश्वासतां - विश्वास ठेवला असता, मुक्ति भोगी - आत्मिक समाधान प्राप्त करणे  )

विवेचन 

मनाच्या श्लोकांमधील हा शेवटचा श्लोक. ज्याप्रमाणे एखाद्या स्तोत्र किंवा पुराणाच्या शेवटी त्याची फलश्रुती दिलेली असते, तशीच फलश्रुती समर्थांनी इथे दिली आहे. परंतु ही फलश्रुती अवास्तव किंवा काही चमत्कार घडेल असे सांगणारी नाही. यात कोणत्याही भौतिक सुखांचे आश्वासन नाही. मनाच्या श्लोकांमधून समर्थांनी मनाला जो उपदेश केला त्याचाच परिणाम म्हणून या श्लोकात सांगितलेली गोष्ट घडणार आहे. ते ऐकून आपल्या वागण्यात बदल घडणे अपेक्षित आहे. तीच खरी फलश्रुती ! काय म्हणताहेत समर्थ या फलश्रुतीत ? तर ' मनाची शते ऐकता दोष जाती.' मनाची शते म्हणजे हे दोनशे पाच श्लोक. हे श्लोक वारंवार ऐकल्याने, त्यांचे मनन, चिंतन केल्याने आपले सर्व दोष निघून जातील. म्हणजेच मनाचे श्लोक हे निर्दोषत्व प्रदान करणारे आहेत. 

आपल्यामध्ये कोणते दोष आहेत ते समर्थ माउलींनी वारंवार या श्लोकांमध्ये सांगितले आहेतच. काम, क्रोध आदी विकार, देहबुद्धी, ऐहिक आणि भौतिक सुखाची लालसा या गोष्टींच्या मागे आपण आयुष्यभर लागतो. सुखाचा शोध घेतो. धावून धावून दमछाक होते. आयुष्याच्या अखेरीस लक्षात येते की ज्या ज्या गोष्टी सुखाच्या म्हणून आपण आयुष्यभर मागे लागलो, त्यांचा शोध घेता घेता आपण दुःखी झालो, हाती काही लागले नाही. ' जगी सर्व सुखी असा कोण आहे ' असा प्रश्न समर्थांनी विचारला. पण आम्हाला त्याकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. 

ज्यांच्या हे लक्षात येईल की ऐहिक सुखे म्हणजे पाण्यावरील बुडबुडे. बुडबुडे किती अल्पजीवी असतात ! तशीच ही सुखे. ' सुखाची घडी लोटता दुःख आहे.' हे आम्ही लक्षातच घेतलं नाही. म्हणून समर्थांनी आमच्या मनाला उपदेश करणारे हे मनाचे श्लोक सांगितले. वेद, उपनिषदे आपण वाचू की नाही ते सांगता येणार नाही. पण हे साधे सोपे  मनोपनिषद आपण निश्चित वाचू शकतो, ऐकू शकतो, त्यावर मनन, चिंतन करू शकतो. असे केल्याने आपल्यातील दोष निघून जातील. आपले व्यक्तिमत्त्व विकसित व्हायला मदत होईल. आम्ही आमचे जीवन अधिक चांगल्या प्रकारे जगू शकू. 

समर्थ दुसऱ्या ओळीत म्हणतात,' मतिमंद ते साधना योग्य होती.' मतिमंद म्हणजे कोण ? तर ज्यांना आपले हित कशात आहे हे कळत नाही अशी माणसे. आम्ही आयुष्यभर नको त्या गोष्टींच्या मागे लागतो. देह म्हणजेच मी असे मानतो. देहाची सुखदुःखे आपली समजतो. देहाचे चोचले पुरवतो. हे एक प्रकारचे अज्ञानच आहे. अशा अज्ञानी माणसांना उद्देशूनच समर्थांनी ' मतिमंद ' हा शब्द वापरला आहे. मनाच्या श्लोकांचे पुन्हा पुन्हा मनन, चिंतन केल्याने अशी माणसे भक्तिमार्गाला लागतील. साधनायोग्य होतील. कारण त्यांना आपले अंतिम हित कशात आहे ते लक्षात येईल. ' गमू पंथ आनंत या राघवाचा ' त्या मार्गावर निदान वाटचाल तरी करण्यासाठी आम्ही योग्य होऊ.

आज विज्ञानाच्या लागलेल्या नानाविध शोधांनी माणूस सामर्थ्यवान झाला आहे, जग जवळ आले आहे असे आपण म्हणतो. पण खरंच माणसाच्या मनाची स्थिती कशी आहे. बरीच माणसे मनाने दुबळी झाली आहेत. एवढ्या तेवढ्या क्षुल्लक कारणांवरून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. लोक एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. अशा कठीण परिस्थितीत मनाचे श्लोक हे सामर्थ्य देणारे, बळ प्रदान करणारे आहेत. आज जी प्रेरणादायक ( मोटिव्हेशनल ) आणि सकारात्मक संदेश देणारी पुस्तके मोठ्या संख्येने निघत आहेत, त्यात जे काही सांगितले आहे ते समर्थांनी साडेतीनशे वर्षांपूर्वीच आम्हाला सांगितले. केवढी ही दूरदृष्टी ! आज माणसाला भौतिक समृद्धीसोबतच मनःशांतीसाठी अध्यात्माची बैठक आवश्यक आहे. ती बैठक देण्याचे  काम हे मनाचे श्लोक सहज करतात. म्हणूनच हे श्लोक ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य प्रदान करणारे आहेत. 

अज्ञानरूपी अंध:काराच्या या जंगलात आत्मज्ञान प्रदान करणाऱ्या या मनाच्या श्लोकांचा कंदील हाती असेल तर पुढच्या पावलांवर उजेड पडेल. एकेक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकता येईल. मग अंधाराची भीती नाही. मुक्ती तरी दुसरी काय असते ? अज्ञानातून मुक्ती म्हणजे मोक्ष. तो देणारे हे मनाचे श्लोक आहेत. यावर विश्वास ठेवून वाटचाल करा असे समर्थ आम्हाला सांगत आहेत. ते आम्हाला खात्रीने मुक्ती प्रदान करतील. ' श्रद्धावान लभते ज्ञानं,  संशयात्मा विनश्यति ' असे  गीतेत देखील सांगितले आहे.

खरं तर मी एक अगदी सामान्य माणूस. मनाच्या श्लोकांवर लिहिण्याची आणि काही सांगण्याची माझी योग्यता नाही. परंतु तरी देखील मला माध्यम बनवून समर्थांनी ही सेवा माझ्याकडून करवून घेतली याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. यातील काही चांगले वाटले तर त्याचे श्रेय समर्थांचे आणि ज्यांनी मला संदर्भ म्हणून माहिती पुरवली त्या सर्वांचे आहे. त्या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे. ' जय जय रघुवीर समर्थ.' 

स्वसंवाद 

१. मनाच्या श्लोकांचे वाचन केवळ शब्दांपुरते न ठेवता, त्यातून माझ्या अंतरातील काम, क्रोध, देहबुद्धी आदी दोषांचे निराकरण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न मी करतो का?

२. भौतिक सुखांच्या मृगजळामागे न धावता, समर्थांनी सांगितलेल्या 'साधनायोग्य' मार्गावर चालून स्वतःचे शाश्वत व अंतिम हित साधण्याचा माझा निश्चय झाला आहे का?

३. आजच्या तणावपूर्ण व अस्थिर जगात मनाला अढळ बळ देण्यासाठी, मनाच्या श्लोकांमधील ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य मी माझ्या दैनंदिन जगण्यात उतरवतो का?

४. 'म्हणे दास विश्वासतां मुक्ति भोगी' या समर्थांच्या आश्वासनावर पूर्ण श्रद्धा ठेवून, अज्ञानाच्या बंधनातून मुक्त होत अंतरीचे चिरंतन आत्मसुख अनुभवण्याची माझी तयारी आहे का?

( संपूर्ण )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१/१०/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

संदर्भ - 

१. सार्थ मनाचे श्लोक - प्रा. के वि. बेलसरे 

२. मनाचे श्लोक : अध्यात्माची पाऊलवाट - प्रा. डॉ. सुरेश मेणे 

३. मनाच्या श्लोकातून मनःशांती - सुनील चिंचोलकर 

४. मना सज्जना - प्रा. हेमंत गोखले 

५. मनोबोध - अनंत दामोदर आठवले 

६. रवींद्र पाठक यांची यु ट्यूबवरील प्रवचने 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...