मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग २०४

उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग २०४

मना संग हा सर्व संगास तोडी ।

मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी ।

मना संग हा साधकां सीघ्र सोडी ।

मना संग हा द्वैत निशेष मोडी ।।२०४।।

अर्थ : हे मना, संतांचा संग इतर सर्व संग तोडतो. अरे मना, संतांचा संग हा तात्काळ मोक्षप्राप्ती करून

देणारा आहे. हे मना, संतांचा संग माणसाला इतर सर्व बंधनांपासून मुक्त करतो. आणि हे मना, संतांचा

संग हा भगवंत आणि आपण यांच्यातील असलेलं द्वैत समूळ नष्ट करतो.

(संग - संतांचा सहवास, सर्व संग - ऐहिक गोष्टी/देहबुद्धी, तोडी - नष्ट करतो, मोक्ष - अज्ञानापासून मुक्ती,

जोडी- प्राप्त करून देतो, सीघ्र - त्वरेने, सोडी - बंधनांपासून सोडवतो, नि:शेष - मुळापासून/संपूर्णपणे  )

विवेचन

आपण आता मनाच्या श्लोकातील शेवटच्या श्लोकाच्या आधीचा श्लोक पाहत आहोत. २०२ आणि २०३ या

श्लोकांमध्ये सत्संगतीचा महिमा समर्थांनी आपल्याला सांगितला. या श्लोकात ते संतसंगतीने कोणत्या गोष्टी

प्राप्त होतात ते आपल्याला सांगत आहेत. पहिल्या ओळीत समर्थ सांगतात की हे मना संतांचा संग, त्यांचा

सहवास इतर सर्व गोष्टींचा संग तोडणारा आहे. एक संतांचा संग इतका प्रभावी आहे की तो अन्य काही बंधने

राहूच देत नाही. जशी एखादी मास्टर की असते. तिच्यामुळे सर्व कुलुपे आपोआप उघडतात. तशी मास्टर की

म्हणजे संतांचा सहवास. तो फक्त देहानेच असला पाहिजे अशी आवश्यकता नाही. तो संग त्यांचा उपदेश

पाळून मनाने करता येतो. त्यांचे सतत स्मरण, त्यांनी सांगितलेले साधन, त्यांनी लिहिलेल्या किंवा सांगितलेल्या

ग्रंथांचा अभ्यास इ. गोष्टीतून हा संतांचा संग आपल्याला लाभू शकतो.

हा संतांचा संग अन्य कोणते संग सोडतो ? तर जन्मल्यापासून देहबुद्धी बळकट होत जाते. देहाच्या संगामुळे त्याची सुखदुःखे ही आपलीच सुखदुःखे आहेत असे आपण मानून चालतो. आणखी संग असतो तो आपल्या कुटुंबातील लोकांचा, नातेवाईकांचा, मित्रांचा. संग असतो तो अभिमानाचा, अहंकाराचा. संग असतो देहाला सुख देणाऱ्या पैसा, सत्ता आदी गोष्टींचा. पण सद्गुरू संग इतका प्रभावी असतो की त्यांच्या सहवासात आल्यानंतर या सगळ्या भौतिक गोष्टींचे आकर्षण आपोआप कमी होत जाते. ज्याने एकदा अमृताची गोडी चाखली, त्याला इतर पक्वान्नांचे आकर्षण वाटणारच नाही. 

समर्थ दुसऱ्या ओळीत म्हणतात,' मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी.' अर्थ हा की संत ताबडतोब मोक्ष मिळवून देतात.मोक्ष म्हणजे काय ? मोक्षाच्या अनेक व्याख्या केल्या जातात. मोक्ष हा मृत्यूनंतर मिळतो असे मानले जाते. मोक्ष म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता असेही म्हटले जाते. पण मोक्ष म्हणजे अज्ञानापासून मुक्ती असाही अर्थ घेता येईल. सद्गुरू आपल्याला अज्ञानापासून मुक्ती देतात. आत्मज्ञान देतात. एकदा ते झाले की मोक्ष वेगळा आणखी काय राहिला ? सद्गुरू आपल्याला चिरंतन आनंदाचे साधन प्रदान करतात. ईश्वराशी आपले संधान जोडून देतात. चिरंतन आनंद म्हणजे सुद्धा मोक्षच ! कारण परमेश्वर हा आनंदस्वरूप आहे. सद्गुरुंच्या संगतीत आपल्याला सिद्धावस्था प्राप्त होते. म्हणजे आपण साधक न राहता सिद्धपुरुष होतो. म्हणून तिसऱ्या ओळीत समर्थ म्हणतात, ' मना संग हा साधकां सीघ्र सोडी.' तो साधक राहतच नाही. परमेश्वर स्वरूप होतो. 

साधक एकदा परमेश्वरस्वरूप झाला की  द्वैत कुठले ? म्हणून अंतिम चरणात समर्थ म्हणतात, ' मना संग हा द्वैत निशेष मोडी.' साधक जर केवळ स्वप्रयत्नांवरच अवलंबून राहील, तर त्याला सिद्धावस्थेपर्यंत पोहोचायला अनेक वर्षे किंवा अनेक जन्मही लागू शकतील. पण सद्गुरूंमुळे हे कार्य सोपे, सहज आणि जलद होते. ' आपणासारिखे करिती तात्काळ, नाही काळवेळ तयालागी ' असे सद्गुरुंच्या बाबतीत म्हणूनच म्हटले जाते. सद्गुरू हे परमेश्वराचेच रूप आहेत. म्हणून गुरूंना वंदन करताना आपण म्हणतो,' गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥'  गुरूंच्या संगतीत द्वैत समूळ नाहीसे होते. 

स्वसंवाद 

१. संतांच्या आणि सद्गुरूंच्या विचारांची 'मास्टर की' हाती घेऊन, देहबुद्धी व संसारातील क्षणभंगुर मोहाची कुलुपे तोडण्याचा मी प्रयत्न करतो का?

२. मोक्ष हा केवळ मृत्यूनंतरचा विषय न मानता, सद्गुरूंनी दिलेल्या आत्मज्ञानाने जिवंतपणी अज्ञानातून मुक्त होऊन नित्य आनंदात जगण्याची माझी धडपड आहे का?

३. 'आपणासारिखे करिती तात्काळ' या संतांच्या सामर्थ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून, संकुचित 'साधकपण' ओलांडून भगवंताशी एकरूप होण्यासाठी मी स्वतःला समर्पित करतो का?

४. 'गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः' या भावाने सद्गुरूंचे स्मरण करत, माझ्यातील व ईश्वरामधील द्वैताचा पडदा समूळ (निःशेष) नष्ट करण्याची माझी अंतरी तळमळ आहे का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१/१०/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...