उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १९७
नभासारिखे रूप या राघवाचे ।
मनीं चिंतितां मूळ तुटे भवाचे ।
तया पाहता देहबुद्धी उरेना ।
सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना ।।१९७।।
अर्थ : या राघवाचे रूप नभाप्रमाणे म्हणजे आकाशासारखे आहे. त्याचे ध्यान केले असता भवबंधन तुटते. त्याचे दर्शन झाले तर देहबुद्धी नष्ट होते. त्याच्या रूपाची किंवा दर्शनाची इतकी अनिवार ओढ लागते की आपली तृप्ती होत नाही.
( भव - संसार, आर्त - उत्कट ओढ/व्याकुळता )
विवेचन
आधीच्या म्हणजे श्लोक क्रमांक १९४ मध्ये साधकाने जो प्रश्न समर्थांना विचारला त्याचीच उत्तरे समर्थ या १९५ ते १९९ श्लोकांमध्ये देत आहेत. खरं तर हे सगळे श्लोक विवेचनाचे किंवा निरूपणाचे नसून अनुभूतीचे आहेत. ज्ञानेश्वरीतील ' एक तरी ओवी अनुभवावी ' असे म्हटले जाते. तसेच हे समर्थांचे मनाचे श्लोक आहेत. या श्लोकांच्या बाबतीतही एक तरी श्लोक अनुभवावा असे म्हणता येईल.
या श्लोकात राघवाचे म्हणजे परमेश्वराचे स्वरूप नेमके कसे आहे ते समर्थ सांगतात. आधीच्या श्लोकात आपण पाहिले की तो ' नभापरी व्यापकु ' आहे. या श्लोकात समर्थ म्हणतात,' नभासारखे रूप या राघवाचे.' नभाप्रमाणे विशाल आणि व्यापक तर तो आहेच पण त्याचे स्वरूपही आकाशासारखेच आहे. इथे ' आकाश ' या शब्दाचे अनेक अर्थ घेता येतात. आकाशाप्रमाणे वृत्ती व्यापक असलेला हा राघव आहे. एखादी व्यक्ती स्वभावाने उदार असली तर बऱ्याच वेळा अशा व्यक्तीला त्याचे अंतःकरण समुद्रासारखे विशाल आहे असे म्हटले जाते. हिंदीमध्ये अशा व्यक्तीसाठी ' दर्यादिल ' शब्द वापरला जातो. पण समुद्राला तरी कुठे तरी मर्यादा आहे. आकाशाला ती नाही. आकाश सर्वत्र आहे. जसे आकाश पृथ्वीवरून सर्वत्र दिसते तसेच ते इतर ग्रहांवरून देखील दिसते. त्याला अंत ना पार. तसाच हा राघव आहे. वनवासात जाण्याची आज्ञा झाली असता भरताला राज्य सोपवून वनात जाणारा राम, वनवासात वालीचे राज्य मिळण्याची शक्यता असताना ते नाकारणारा राम, रावणाच्या पराभवानंतर लंकेचा राजा होणे सहज शक्य असताना बिभीषणाला राज्य देणारा राम , पतितांना पावन करणारा राम, निषादराज, शबरी, अहिल्या यांच्यामध्ये कोणताही भेदभाव न करता त्यांच्यावर कृपा आणि प्रेम करणारा राम...! त्याच्या आकाशाप्रमाणे विशाल हृदयाची उदाहरणे सांगावी तेवढी कमी आहेत.
आकाशाचा रंग निळा आहे. रामाचा रंगही आकाशाशी स्पर्धा करणारा आहे. आकाश कशानेही लिंपित होत नाही. पांढरे ढग, काळे ढग येतात आणि जातात. आकाश अचल राहते. वाऱ्याबरोबर उडणारी धूळ आकाशाला मलीन करू शकत नाही. हे आकाशाचे सर्व गुण रामरायाच्या ठिकाणी वसतात. या राघवाच्या दर्शनाचा महिमा इतका मोठा आहे की या भवबंधनाचे मूळ तुटण्यासाठी फक्त त्याचे दर्शन पुरेसे आहे. माणूस या भवसागरात अडकलेला असतो. त्यात तो गटांगळ्या खात असतो. जन्ममृत्यूचे चक्र त्याच्या पाठी लागलेले असते. त्याच्या ' भवाचे मूळ तुटते ' म्हणजे त्याचे कर्मबंधन नाहीसे होते. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते.
त्याचे दर्शन झाले की देहबुद्धी नष्ट होते. किंबहुना देहबुद्धी नष्ट झाल्यानंतरच त्याचे दर्शन घडते. त्याच्या चिंतन, मनन, ध्यान आणि नामस्मरणाने देहबुद्धी कमी होत जाते. एक वेळ अशी येते की संसाराची आसक्ती पूर्णपणे नाहीशी होते. संसारातील आनंद तात्पुरता असतो. भगवंताच्या दर्शनात मिळणारा आनंद सर्वोच्च आहे. ' या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ' असे तुकाराम महाराज म्हणतात. एकदा त्याचे दर्शन झाले की पुन्हा पुन्हा त्याच्या दर्शनाची / भेटीची ओढ लागते. दर्शन झाले तरी तृप्ती होत नाही.
स्वसंवाद
१. श्रीरामाच्या आकाशासारख्या विशाल हृदयाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून, संकुचित भेदाभेदांच्या पलीकडे जाऊन सर्वांवर निरपेक्ष प्रेम करण्याचा मी प्रयत्न करतो का?
२. अनुकूल-प्रतिकूल प्रसंग किंवा सुख-दुःखाचे ढग आले तरीही, आकाशाप्रमाणे अंतरी मलीन न होता अलिप्त व स्थिर राहण्याचा सराव मी करतो का?
३. प्रपंचातील क्षणभंगुर सुखांमध्ये समाधान मानण्याऐवजी, भवबंधनाचे मूळ तोडणाऱ्या त्या राघवाच्या नित्य अनुसंधानात मी रममाण होतो का?
४. तुकोबारायांप्रमाणे, प्रभूच्या दर्शनाने तृप्त न होता अंतरात्म्यात त्याच्या भेटीची आणि नामाची 'आर्तता' (उत्कट ओढ) मी निरंतर जागी ठेवतो का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२५/९/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा