मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १९९

उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १९९ 

अती जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे ।

तेथे तर्क संपर्क तोही न साहे ।

अती गूढ ते दृढ तत्काळ सोपे ।

दुजेवीण जे खूण स्वामीप्रतापें ।।१९९।।

अर्थ : परमात्मस्वरूप अत्यंत पुरातन आहे. तसेच ते अत्यंत विशाल आहे. तेथे आपली तर्कबुद्धी उपयोगी पडत नाही. परमात्मा अत्यंत गूढ, रहस्यमय आणि स्थिर आहे. परंतु गुरुकृपेच्या साहाय्याने त्याच्या ठिकाणी द्वैत अस्तित्वात नाही हे एकदा समजले की हे परमात्मस्वरूप कळणे सुलभ होते. 

( अति जीर्ण - अत्यंत पुरातन, तर्कसंपर्क - तर्कबुद्धीची धाव/मजल, गूढ - रहस्यमय/गुप्त, दृढ - स्थिर, तत्काळ - ताबडतोब, स्वामीप्रताप - सद्गुरूंची कृपा ) 

विवेचन 

या श्लोकात देखील परमात्मा कसा आहे हे समर्थ सांगत आहेत. श्लोक क्रमांक १९४ मध्ये साधकाने जो प्रश्न विचारला आहे, त्याची उत्तरे समर्थ १९५ ते १९९ या पाच श्लोकात देत आहेत. खरोखर परमात्म्याचे स्वरूप सांगणे कठीण आहे. वेदांनी देखील जेथे ' नेती नेती ' असे म्हटले तिथे समर्थांसारखी सद्गुरू माउली आपल्याला परमात्म्याचे गूढ स्वरूप समजावून सांगत आहे. समर्थ आत्मसाक्षात्कारी संत असल्याने त्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. मनाच्या श्लोकांमध्ये वेदांताचे सर्व सार आले आहे. 

परमात्मा कसा आहे हे सांगताना समर्थांनी ' अति जीर्ण ' हे शब्द वापरले आहेत. साधारणपणे ' जीर्ण ' म्हणजे जुनाट, टाकाऊ झालेली वस्तू असा अर्थ आपण घेतो. परंतु ' जीर्ण ' म्हणजे अत्यंत प्राचीन, पुरातन असे परब्रह्म. जे आधीही होते, आताही आहे आणि यापुढेही कायम अस्तित्वात असेल. असा या शब्दाचा अर्थ समर्थांना अपेक्षित आहे. श्रीराम म्हणजे समर्थांचे आराध्य दैवत. जगाच्या आधीही हा परमात्मा अस्तित्वात होता, आजही आहे आणि पुढेही असेल. 

हे परमात्म्याचे स्वरूप अत्यंत गूढ आणि रहस्यमय आहे. आपल्या तर्कबुद्धीची धाव तिथपर्यंत पोहोचत नाही. त्याला व्यापक देखील म्हणणे पुरेसे होत नाही. तरीदेखील समर्थांनी त्याचे स्वरूप सांगण्यासाठी ' अति जीर्ण ' हा कालवाचक शब्द वापरला आहे. तसेच ' विस्तीर्ण ' हा स्थलदर्शक शब्द योजला आहे. एखादा कुशल शिक्षक ज्याप्रमाणे विविध उदाहरणे देऊन मुलांना आपला विषय समजवून देण्याचा प्रयत्न करतो, तसेच आपल्या कल्याणासाठीच्या तळमळीने समर्थांमधील लोकशिक्षक हे परमेश्वराचे स्वरूप आपल्याला समजावून सांगत आहे. 

परमात्मस्वरूप असे गूढ, रहस्यमय असले तरी समर्थ साधकाला आश्वासित करतात. ते म्हणतात, "अती गूढ ते दृढ तत्काळ सोपे." एकदा सद्गुरूंची कृपा झाली की तेथे किंचितही द्वैत अस्तित्वात नाही हे आपल्याला आपल्या अंतर्यामी कळते. मग या परमात्मतत्वाला समजणे सोपे होते. त्यासाठी अहंकाराचा आणि देहबुद्धीचा त्याग करून सद्गुरूंना संपूर्णपणे शरण जाण्याची आवश्यकता असते. 

स्वसंवाद 

१. परब्रह्माचे शाश्वत स्वरूप केवळ कोरड्या तर्काने किंवा बुद्धीच्या चष्म्यातून न मोजता, ते मनाच्या पलीकडचे आहे हे ओळखून मी लीन होतो का?

२. काळ आणि स्थळाच्या सीमा ओलांडून अनादि काळापासून अस्तित्वात असणाऱ्या त्या 'अती जीर्ण व विस्तीर्ण' प्रभूच्या अस्तित्वाचे भान मी दैनंदिन जीवनात ठेवतो का?

३. परमार्थातील अति गूढ रहस्ये समजून घेण्यासाठी स्वतःच्या अहंकारावर विसंबून न राहता, मी पूर्ण शरणागतीने सद्गुरूंची कास धरतो का?

४. 'स्वामीप्रतापे' म्हणजे सद्गुरूंच्या कृपेने द्वैताचा पडदा दूर सारून, देहबुद्धी विरघळवत अंतरीच्या सहज आत्मस्वरूपात रममाण होण्याचा माझा प्रामाणिक अभ्यास आहे का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२७/९/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...