मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १८६

उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १८६ 

सदा सर्वदा राम सन्नीध आहे ।

मना सज्जना सत्य शोधून पाहे ।

अखंडीत भेटी रघूराज योगु ।

मना सांडि रे मीपणाचा वियोगु ।।१८६।।

अर्थ : स्वस्वरूप रूपात श्रीराम सदा सर्वदा आपल्या जवळच आहेत. तेव्हा हे सज्जन मना, या चिरंतन सत्याचा तू शोध घे. तो ( राम ) स्वस्वरुपी असल्याने त्याच्या आणि आपल्या भेटीचा अखंड योग आहे. परंतु त्यासाठी ज्या मीपणामुळे त्याचा आणि तुझा वियोग झाला आहे, तो मीपणा टाकून दे. 

( राम - परमात्मा, सन्निध - जवळ, अखंडित - निरंतर/व्यत्ययरहित, योग - ऐक्य, सांडी - टाकून दे,  वियोग - वेगळेपण )

विवेचन 

आधीच्या श्लोकात समर्थांनी आपल्याला ' रामरूपी लपावे ' म्हणजेच आपल्या अंतरात स्थित असणाऱ्या आत्मारामाशी एकरूप व्हावे हे सांगितले. आता त्याच कल्पनेचा थोडा विस्तार समर्थ या श्लोकात करतात. ज्या आत्मरुपाशी समर्थ आपल्याला एकरूप व्हायला सांगतात ते आत्मस्वरूप म्हणजे परमात्म्याचाच अंश आहे. आपण आणि तो वेगळे नाहीत. या अर्थाने परमेश्वर आपल्या सन्निध म्हणजे जवळ आहे. कसा आणि किती जवळ ? तर समर्थ इथे ' सदा ' आणि ' सर्वदा ' हे दोन शब्द वापरतात. वरवर पाहता हे शब्द एकाच अर्थाचे वाटतात. पण त्यात फरक आहे. ' सदा ' म्हणजे नेहमी आणि ' सर्वदा ' म्हणजे सर्वत्र. तात्पर्य तो सगळीकडे तर आहेच पण आपण आजच्या भाषेत वापरतो ते शब्द वापरायचे झाले तर तो २४X७ आपल्याजवळच आहे. प्रसंगी आपल्याला आपले नातेवाईक, मित्रमंडळी सोडून जातील. पण ' तो ' आपल्याला सोडून जात नाही. जोपर्यंत हा देह आहे, तोपर्यंत तो आपल्याजवळच आहे. त्याच्याइतके जवळ कोणीच नाही.

आपल्या देहबुद्धीमुळे आपल्याला त्याचे आपल्या अंतर्यामी असलेले अस्तित्व लक्षात येत नाही. म्हणून समर्थ आपल्या मनाला आवाहन करतात की हे सज्जन मना, तू या सत्याचा शोध घे. मन हे अवखळ आणि चंचल आहे. ते एका ठिकाणी स्थिर होत नाही. लहान मुलांसारखीच त्याची अवस्था असते. बहिणाबाई म्हणतात,' मन  वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर.' असं हे मन ! लहान मूल कितीही चुकले तरी आई त्याला समजावून सांगताना ' बाळा, तू शहाणा आहेस ना ! शहाणी मुलं असं करीत नाहीत.' अशा गोड शब्दात समजावून सांगते. तशीच ही समर्थ माउली. त्यांनाही आपले कल्याण व्हावे अशी तळमळ आहे. म्हणून या चंचल मनाचा उल्लेख करताना ते ' मना सज्जना ' असाच करतात. तेव्हा हे सज्जन मना, तू स्वतःच का हे सत्य शोधून पाहत नाहीस ? एखादी गोष्ट दुसऱ्याने सांगितली तर बऱ्याच वेळा पटत नाही पण आपण जेव्हा स्वतः त्या गोष्टीबद्दल जाणून घेतो, तेव्हा तिची सत्यता आपल्या लक्षात येते. 

असे हे सत्य मनाने शोधून काढल्यावर हे मना, तुझ्या हे लक्षात येईल की परमेश्वर सतत आपल्याजवळच आहे. पण ' तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी' या उक्तीप्रमाणे आपण त्याला दुसरीकडेच शोधत असतो. त्याला शोधायला कुठे दुसरीकडे जावे लागत नाही. म्हणजेच ' रघुराज भेटीचा अखंड योग ' आहे. पण हे मना, तुझा आणि या रघुराज भेटीचा योग का येत नाही बरं ? तर या भेटीच्या आड येतो ' मीपणा '. मीपणामुळे या रघुरायाचा वियोग आपल्याला होतो. तेव्हा हे मना, हा मीपणा टाकून दे म्हणजे तो रामराया सदा सर्वदा आपल्याजवळच आहे याची अनुभूती तुला होईल. आणि समर्थांनी सुरुवातीच्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे ' सदा सर्वदा योग तुझा घडावा ' असा योग आपल्याला घडेल. 

स्वसंवाद 

१. संकटसमयी स्वतःला एकटे व असहाय समजण्याऐवजी, परमेश्वर माझ्या 'सदा सर्वदा सन्निध' (२४ तास सोबत) आहे या अढळ सत्यावर मी विश्वास ठेवतो का?

२. बहिणाबाईंनी वर्णन केलेल्या उभ्या पिकात धावणाऱ्या चंचल मनाला आवर घालून, आईच्या मायेने त्याला अंतर्मुख करत आत्मस्वरूपाचा शोध घेण्यास मी प्रवृत्त करतो का?

३. प्रपंचातील नातीगोती आणि ऐहिक सुखे कधी ना कधी साथ सोडतील हे जाणून, कधीही न दुरावणाऱ्या त्या 'रघुराजाशी' अखंड भेटीचा योग साधण्याची माझी धडपड आहे का?

४. समर्थांच्या इशाऱ्यानुसार, ईश्वराशी अखंड ऐक्य साधण्याच्या आड येणारा आणि वियोग निर्माण करणारा सूक्ष्म 'मीपणा' (अहंकार) पूर्णपणे सांडून टाकण्यास माझे मन तयार आहे का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

८/९/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...