उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १९४
वसे हृदयी देव तो कोण कैसा ।
पुसे आदरे साधकु प्रश्न ऐसा ।
देहे टाकिता देव कोठे रहातो ।
परी मागुता ठाव कोठे पहातो ।।१९४।।
अर्थ : साधक समर्थांना आदरपूर्वक प्रश्न विचारतो की आपल्या हृदयामध्ये जो देव राहतो तो कोण आहे आणि तो कसा आहे ? देह सोडल्यानंतर तो देव कोठे राहतो ? नंतर तो कोठे जन्म घेतो ?
( साधकु - साधक/जिज्ञासू व्यक्ती, टाकिता - सोडल्यानंतर, मागुता - पुन्हा, ठाव - ठिकाण/आश्रयस्थान )
विवेचन
या ठिकाणी साधकाने समर्थांना विचारलेले प्रश्न खरं तर कोणत्याही साधकाच्या मनात येणारे आहेत. जसे महाभारतातील युद्धापूर्वी अर्जुनाला काही प्रश्न पडले होते, तेव्हा भगवंतांनी त्याचे निमित्त करून सर्व जगासाठी गीता सांगितली. तसेच इथे साधकाचे प्रश्न आहेत. पुढील काही श्लोकांमध्ये समर्थांनी या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. हे प्रश्न मूलभूत प्रश्न आहेत. मी सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात वास करतो हे सांगताना गीतेत भगवंत म्हणतात," ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति..." मग साहजिकच साधकाला प्रश्न पडतो की जर परमेश्वर सर्व प्राणिमात्रांच्या हृदयात स्थित आहे, तर तो देव कोणता ? त्याचे स्वरूप जाणून घेण्याची साधकाला इच्छा होते. म्हणून तो विचारतो, " तो देव आहे तरी कसा ?" आपल्या शरीरात देव राहतो असे आपण मानले तर हा देह सोडल्यानंतर म्हणजेच मृत्यूनंतर हा परमेश्वर कोठे जातो ? कुठे राहतो ? पुन्हा तो कुठे जन्म घेतो ? असे विविध प्रश्न साधकाला पडतात.
तसे तर तत्त्वज्ञानाच्या पुस्तकात किंवा धर्मग्रंथांत या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. परंतु अशा प्रश्नांची उत्तरे समर्थांसारख्या साक्षात्कारी संतांच्या मुखातून ऐकणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण त्यामागे त्यांची साधना असते. खरे तर आधीच्या काही श्लोकांमध्ये यातील पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरे आली आहेत. आपल्या हृदयात वास्तव्य करून असणाऱ्या देवाला समर्थांनी थोरला देव असे म्हटले आहे. त्याचे स्वरूपही सांगितले आहे. ते पाहता येत नाही कारण ते अत्यंत सूक्ष्म आहे. परंतु तरीही साधकाच्या मनात पुन्हा काही प्रश्न अवश्य उपस्थित होतात. त्याच प्रश्नांची सविस्तर उत्तरे पुढील काही श्लोकांमध्ये समर्थांनी दिली आहेत.
दुसऱ्या ओळीतील 'पुसे आदरे साधकु प्रश्न ऐसा ' यातील पुसे,आदरे आणि साधक हे तीन शब्द महत्वाचे आहेत. हे प्रश्न कोणी विचारायला हवेत? तर साधकाने. आपण सर्व साधक आहोत. ज्याला साधना मार्गावर चालायचे आहे त्याने सद्गुरूंना अत्यंत आदरपूर्वक प्रश्न विचारायला हवेत. त्यांची परीक्षा घेण्यासाठी नाही. आपण जर साधक असू तर आपल्याला जे प्रश्न पडायला हवेत, तेच प्रश्न या ठिकाणी दिले आहेत. साधना मार्गावर असताना आपल्याला जर, " मला पैशाची कमतरता आहे, अधिक पैसा कसा मिळेल? माझ्या मुलाबाळांचे कल्याण कसे होईल..? यासारखे प्रश्न पडत असतील तर साधना मार्गावर आपण अजून पूर्णपणे समर्पित झालो नसून आपण ऐहिक गोष्टीतच अडकलो आहोत असा याचा अर्थ आहे. म्हणून साधकाला जे प्रश्न पडायला हवेत ते म्हणजे आपल्या हृदयात जो देव राहतो तो कसा आहे, तो कुठे राहतो, देह पडल्यानंतर तो कुठे जातो आणि त्याला पुन्हा कसे पहावे? आणि असे प्रश्न त्याने अत्यंत आदरपूर्वक गुरुला विचारायला हवेत. जेव्हा साधक म्हणून आपली अशी योग्यता होईल तेव्हा आपले सद्गुरु देहात असोत की नसोत परंतु कोणत्यातरी माध्यमातून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या प्रेरणेमुळे नक्कीच मिळेल.
आपल्या देहबुद्धीमुळे हे प्रश्न वारंवार आपल्या मनात निर्माण होतात. जोपर्यंत ' मी देह नसून मी आत्मा आहे ' ही भावना दृढ होत नाही तोपर्यंत या प्रश्नांची तीव्रता जास्त जाणवते. जसजशी देहबुद्धी कमी होऊ लागते आणि मी म्हणजे केवळ हा देह नसून आत्म्याच्या रूपात भगवंतच माझ्या शरीरात वास करीत आहे ही भावना दृढ होत जाते, तेव्हा या प्रश्नांचेही कोडे उलगडत जाते. मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते या प्रश्नाचे उत्तर देताना भगवंत गीतेत म्हणतात की ज्याप्रमाणे आपण एखादे जुने जीर्ण झालेले वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र धारण करतो, तसेच हा देह जीर्ण झाल्यावर आत्मा हे शरीर टाकून नवीन शरीर धारण करतो. अर्थातच जीव आपल्या कर्मानुसार पुढील जन्म घेतो. या श्लोकातील प्रश्नांची उत्तरे समर्थांनी पुढील श्लोकात दिली आहेत. त्यावेळी त्यांची अधिक चर्चा करता येईल.
स्वसंवाद
१. ऐहिक अडचणी व स्वार्थाचे प्रश्न बाजूला ठेवून, सद्गुरूंप्रती नितांत आदर बाळगत मी माझ्या आत्मोद्धाराचे आणि अंतरीच्या ईश्वराचे मूळ प्रश्न विचारण्यास पात्र झालो आहे का?
२. गीतेत सांगितल्याप्रमाणे भगवंत माझ्याही हृदयात वास करतो, या जाणिवेतून मी स्वतःच्या शरीराला देवाचे मंदिर मानून सात्त्विक आचरण करतो का?
३. मरण आणि पुनर्जन्माच्या भीतीमध्ये अडकण्याऐवजी, 'हा देह केवळ जीर्ण वस्त्रासारखा असून आत्मा अविनाशी आहे' हे सत्य मी अंतर्मुख होऊन स्वीकारतो का?
४. तात्त्विक प्रश्नांची केवळ पुस्तकी उत्तरे शोधण्याऐवजी, समर्थांसारख्या आत्मज्ञानी संतांच्या शिकवणीतून अनुभूती घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२०/९/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
यात एक परिच्छेद नव्याने ऍड केला आहे. तो कसा वाटतो ? प्रश्नांमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे का ?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा