उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग २०१
कदा वोळखीमाजी दुजे दिसेना ।
मनीं मानसीं द्वैत काही वसेना ।
बहुतां दिसां आपुली भेटि जाली ।
विदेहीपणे सर्व काया निवाली ।।२०१।।
अर्थ : परमात्मतत्वाची ओळख झाल्यावर दुसरे काहीच दिसत किंवा अनुभवास येत नाही. मनामधील द्वैतभावना संपून जाते. फार दिवसांनी आपली आणि परमात्म्याची भेट झाली. मग देहाचे भान नाहीसे होऊन सर्व शरीर शांत झाले.
( वोळख - परिचय/जाणीव, वोळखीमाजी - आत्मज्ञानाच्या जाणिवेत, दुजे दिसेना - एका परमात्म्याशिवाय दुसरे काही दिसत नाही, मनीं मानसी - मनामध्ये, वसेना - आश्रयास येत नाही, बहुता - अनेक, दिसां - दिवसांनी, विदेहीपण - देहभान नष्ट होते ती स्थिती, काया - शरीर, निवाली - शांत/तृप्त झाली )
विवेचन
मागील श्लोकाप्रमाणेच परमात्मस्वरूपाच्या अनुभूतीचे वर्णन करणारा हा श्लोक आहे. साधकाला जेव्हा सद्गुरुकृपेने परमात्म्याचे ज्ञान होते, तेव्हा त्याला एका परमात्म्याशिवाय दुसरे काहीही अनुभवास येत नाही. हे आधीच्या श्लोकातही आपण पाहिले आहे. साधक पूर्णपणे परमात्म्याशी तादात्म्य पावतो. ज्ञाता आणि ज्ञेय हे वेगळे राहतच नाही. अशा वेळी जरी तो साधक देहाने लोकांमध्ये वावरत असेल, व्यवहार करत असेल पण अंतर्यामी तो त्या शक्तीशी जोडलेलाच राहतो. त्या परमात्म शक्तीपासून तो कधीही विभक्त होत नाही. म्हणूनच तो ' भक्त ' म्हणवतो.
त्याच्या मनात कोणतेही द्वैत शिल्लकच उरत नाही. भक्त प्रल्हादाला परमेश्वर जसा सर्वत्र दिसत होता, तसाच तो खांबातही दिसत होता. जसे समुद्राच्या पाण्यात लाटा निर्माण होतात, त्या लाटासुद्धा पाण्यातूनच निर्माण होतात आणि पाण्यातच विरून जातात. तद्वतच साधकाच्या मनात एका परब्रह्माशिवाय दुसरे काही असत नाही. अशा अवस्थेत मनच शिल्लक राहत नाही. त्यामुळे दुजे कोणी राहतच नाही. ' तुज सगुण म्हणू की निर्गुण रे ' हा प्रश्नच उरत नाही. ' सगुण निर्गुण एकू गोविंदु रे ' अशी स्थिती होते.
परमात्म्याची जेव्हा ओळख होते किंवा भेट होते तो क्षण भाग्याचा ! ' याचसाठी केला होता अट्टाहास ' अशी आनंदाची, समाधानाची व तृप्ततेची अवस्था असते. ' बहुतां दिसां नच भेटलो...' अशी ही भेट. एखादे लेकरू आईवाचून तळमळते. अनेक वर्षे त्याची आणि आईची भेटच होत नाही. पण जेव्हा हे दुरावलेले जीव एकत्र येतात, तेव्हा आनंदाला पारावार राहत नाही. ' आनंदाचे डोही आनंद तरंग ' अशी ही अवस्था असते. या श्लोकात ' बहुतां दिसां आपुली भेटि जाली ' असे शब्द समर्थांनी वापरले आहेत. हे ' बहुत दिस ' म्हणजे अनेक वर्षे असू शकतात किंवा अनेक जन्मही असू शकतात. जीव जेव्हा जन्माला आला तेव्हापासून त्याने किती शरीरे धारण केली, किती जन्म-मृत्यू झाले हे तो भगवंतच जाणे.
पण जेव्हा ही जिवाशिवाची भेट होते, तेव्हा भवबंधन तुटून जाते. मनुष्य जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. माणूस देहाने वावरत असतो, व्यवहार करीत असतो पण त्याचबरोबर त्याचे देहाशी कायमस्वरूपी जोडले गेलेले मन देहापासून मुक्त होते. त्याला विदेही अवस्था प्राप्त होते. आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे. परमात्मा हा आनंदस्वरूप आहे. विदेहीपणामुळे देहबुद्धी संपुष्टात आलेली असते. ' काया निवाली ' म्हणजे मन आणि शरीर आनंदरूप होऊन जाते. बाहेरच्या सुखदुःखांचा परिणाम होत नाही. ' काया निवाली ' म्हणजे देहबुद्धीची वखवख, आसक्ती संपते. जीव जन्म-मरणाच्या चक्रातून मुक्त होतो.
स्वसंवाद
१. बाह्य जगातील भेद आणि वैविध्य पाहत असताना, प्रल्हादाप्रमाणे सर्व चराचरात एकच परमात्मतत्त्व पाहण्याची समदृष्टी माझ्यात रुजली आहे का?
२. आईसाठी व्याकुळ होणाऱ्या लेकराप्रमाणे, कित्येक जन्मांपासून दुरावलेल्या त्या अंतरीच्या परमात्म्याला भेटण्याची उत्कट आर्तता माझ्या मनात जागी झाली आहे का?
३. दैनंदिन प्रपंच आणि व्यवहार सांभाळत असताना, तुकोबारायांच्या शिकवणीनुसार मनातील द्वैतभाव संपवून ईश्वराशी अखंड जोडलेले राहण्याचा मी सराव करतो का?
४. जगातील नश्वर सुखदुःखांनी व वासनांनी विचलित न होता, 'काया निवाली' या समर्थांच्या वचनानुसार देहभानाची वखवख शांत करून मी अंतरीचे चिरंतन समाधान अनुभवतो का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२९/९/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा