उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १८१
नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदु ।
नव्हे निंदकु मत्सरू भक्तिमंदु ।
नव्हे उन्मतु वेसनी संगबाधु ।
जगी ज्ञानिया तो चि साधु अगाधु ।।१८१।।
अर्थ : चेटूक किंवा जादूटोणा करणारा, दुसऱ्यांना फसवणारा, द्रव्यलोभी, इतरांची निंदा आणि मत्सर करणारा, भक्तिहीन असलेला, उन्मत्तपणे वागणारा, व्यसनी, आपल्या सहवासाने दुसऱ्याला बिघडवणारा माणूस गुरू असूच शकत नाही. ज्याला आत्मज्ञान झाले आहे अशी व्यक्तीच गुरुपदासाठी योग्य समजावी.
( चेटकी - चेटूक किंवा जादूटोणा करणारा, चाळकू - फसवणारा, द्रव्यभोंदु - फसवून दुसऱ्याचे धन लुबाडणारा, निंदकु - दुसऱ्याची निंदा करणारा, मत्सरू - इतरांचा मत्सर/द्वेष करणारा, भक्तिमंदु - भक्तिहीन असलेला, उन्मतु - उन्मत्त झालेला, वेसनी - व्यसन असणारा, संगबाधु - आपल्या संगतीने इतरांना बिघडवणारा, अगाधु - अपार/सखोल )
विवेचन
या श्लोकात समर्थ ' गुरु ' कसा नसावा ते सांगत आहेत. सामान्य माणसे ऐहिक सुखाच्या प्राप्तीसाठी आणि मनःशांतीसाठी गुरूचा शोध घेतात. पण बऱ्याच वेळा त्यांची फसगत होण्याची शक्यता असते. खऱ्या गुरूऐवजी एखाद्या भोंदूबाबाच्या जाळ्यात ते अडकतात. म्हणून या श्लोकात समर्थांनी गुरू कसा नसावा त्याची नऊ लक्षणे सांगितली आहेत. समर्थांचा काळ साडेतीनशे वर्षांपूर्वीचा होता पण आजही त्यांनी सांगितलेली ही लक्षणे साधुपुरुषाची पारख करण्यासाठी उपयोगी ठरतात. कारण आजही अशा प्रकारचे लोक आहेत जे स्वतःला गुरू म्हणवून घेतात. पण आजचा समाज शिकलेला, विज्ञानवादी असला तरी अशा लोकांच्या वागण्याला बळी पडतो.
गुरु कसा नसावा हे सांगताना समर्थ म्हणतात तो चेटूक करणारा म्हणजे जारणमारण किंवा करणी करणारा नसावा.कारण अशा लोकांच्या नादी लागणे म्हणजे स्वतःचे अहित करून घेणे होय. तो गुरू म्हणून दुसऱ्यांची फसवणूक करणारा नसावा. कारण जो दुसऱ्यांना फसवून आपला कार्यभाग साधतो अशी व्यक्ती कदापिही गुरुपदासाठी पात्र असू शकत नाही. तिसरे लक्षण म्हणजे तो द्रव्यलोभी नसावा. गुरू तर ऐहिक गोष्टी, पैसा, सत्ता इ. पासून मनाने विरक्त झालेला असावा. पण ज्याच्या मनात कांचन आणि कामिनीची हाव आहे तो इतरांना काय मार्गदर्शन करणार ? गुरू हा श्रीमंत आणि गरीब शिष्य यात भेदभाव करीत नाही. सोने आणि माती यांचे मूल्य त्याच्या दृष्टीने सारखेच असते. व्यक्तीव्यक्तीत तो भेद करीत नाही.
चौथे लक्षण म्हणजे तो इतरांची निंदा करणारा नसावा. सर्वांप्रती त्याच्या मनात आदर असला पाहिजे. ' मुंगी आणि राव. आम्हा सारखाच जीव ' अशी त्याची वृत्ती असावी. पाचवे लक्षण म्हणजे तो इतरांचा स्वार्थापोटी मत्सर करणारा नसावा. सहावी गोष्ट म्हणजे तो भक्तिहीन नसावा. परमेश्वराच्या भक्तीत तो सदैव रममाण झालेला नसेल तर त्याच्या सान्निध्यात येणाऱ्यांना तो भक्तिमार्गाचा उपदेश कसा करू शकेल ? सातवे लक्षण म्हणजे तो उन्मत्त झालेला नसावा. आजकाल बरेच साधू उन्मत्तपणे वागताना दिसतात. कुंभमेळ्यात होणारी साधूंची भांडणे, मारामाऱ्या पाहिल्या की याचा प्रत्यय येतो. आठवे लक्षण म्हणजे गुरू हा व्यसनी नसावा. नाहीतर आजकाल गांजा, अफू इ.चे व्यसन असलेले आणि कायम त्याच्या तारेतच मस्त राहणारे साधू पुष्कळ बघायला मिळतात. समर्थांच्या काळातही अशी मंडळी भरपूर होती. आणि नववे लक्षण अतिशय महत्वाचे आहे. अशा साधूंच्या संगतीत माणसे बिघडायला नकोत.गुरूंच्या सान्निध्यात माणसाच्या अंतरंगात बदल होऊन तो परमार्थाच्या मार्गावर अग्रेसर झाला पाहिजे. परंतु वरील दुर्गुण अंगात असणारे साधू आपल्या संगतीत आलेल्या शिष्यांना देखील त्यांच्यासारखेच व्यसनी आणि दुर्गुणी बनवतात.
समर्थांनी ही जी गुरुमध्ये नको असलेली लक्षणे सांगितली आहेत, तशीच संत तुकाराम सांगतात. ते म्हणतात
ऐसे कैसे जाले भोंदू । कर्म करोनि ह्मणति साधु ॥१॥
अंगी लावूनियां राख । डोळे झांकुनी करिती पाप ॥२॥
दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयांचा सोहळा ॥३॥
तुका ह्मणे सांगो किती । जळो तयांची संगती ॥४॥
असे अनेक संत म्हणवून घेणाऱ्यांपैकी काही जण आज तुरुंगात आहेत. वर्तमानपत्रातून त्यांची नावे आपल्याला वेळोवेळी वाचायला मिळतात.
या श्लोकातील शेवटच्या चरणात समर्थ खरा गुरु कसा असावा ते सांगतात. ' ज्ञानी ' असणे हे खऱ्या गुरूचे महत्वाचे लक्षण आहे. ज्ञानी याचा अर्थ आत्मज्ञानी. ज्याला आत्मज्ञान झाले आहे अशी व्यक्तीच सद्गुरू म्हणवून घेण्यासाठी पात्र असते. अशा गुरूंनी भगवंताला जाणून घेतलेले असते आणि आपल्या शिष्यांनाही ते त्याची ओळख करून देतात. स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांकडे येण्यापूर्वी अनेक गुरूंकडे गेले होते. परंतु कोणीही त्यांचे समाधान करू शकले नव्हते. रामकृष्णांकडे गेल्यावर त्यांनी त्यांना विचारले,"आपण देव पाहिला आहे का ? आपण मला तो दाखवू शकाल का ?" यावर रामकृष्ण उत्तरले,"होय नरेंद्र, मी तुला जेवढ्या जवळून पाहत आहे, तेवढ्याच जवळून त्याला पाहिले आहे. मी तुलाही तो दाखवू शकेन." आणि मग पुढचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. तेव्हा गुरू पारखून मगच आपल्या हृदयात त्याला स्थान द्यावे.
स्वसंवाद
१. गुरू निवडताना मी केवळ त्याच्या बाह्य अवडंबराला, लोकप्रियतेला किंवा कथित चमत्कारांना भुलतो, की समर्थांनी सांगितलेल्या नऊ कसोट्यांवर त्याचे आचरण पारखून घेतो?
२. तुकोबारायांच्या 'ऐसे कैसे जाले भोंदू' या वचनाप्रमाणे, वैराग्याचा आव आणून स्वतःच्या वासना आणि पैशाची हाव पुरवणाऱ्या दांभिक गुरूंपासून मी सावध राहतो का?
३. मी ज्या व्यक्तीला आदरणीय मानतो, तिच्या संगतीने माझ्या अंतरीचे दुर्गुण, व्यसने व द्वेष कमी होऊन चित्त सात्त्विक होते का?
४. स्वामी विवेकानंदांप्रमाणे, केवळ शाब्दिक ज्ञानावर विश्वास न ठेवता, प्रत्यक्ष ईश्वरी अनुभूती देणाऱ्या 'आत्मज्ञानी' सद्गुरूंची कास धरण्याची माझी तळमळ आहे का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
४/९/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा