उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १९६
नभी वावरे जो अणुरेणू कांही ।
रिता ठाव या राघवेंवीण नाही ।
तया पाहतां पाहतां तेंचि जालें ।
तेथें लक्ष अलक्ष सर्वे बुडालें ।।१९६।।
अर्थ : आकाशामध्ये सर्वत्र पसरलेले जे सूक्ष्मात सूक्ष्म कण अर्थात अणुरेणू त्यातही परमात्मा भरलेला आहे.
या राघवाशिवाय रिते असे ठिकाणच नाही. जो त्याच्या स्वरूपाला पाहण्याचा सराव करतो, तो पाहता पाहता
तोच (परमात्मा ) बनून जातो. मग तेथे दृश्य आणि अदृश्य या साऱ्यांचा विलय होतो.
(नभ - आकाश, अणुरेणू - सूक्ष्मातिसूक्ष्म असे द्रव्य/धुळीचे कण, लक्ष - दृश्य, अलक्ष - अदृश्य )
विवेचन
या श्लोकात समर्थ परमात्मस्वरूपाचे वर्णन आपल्याला सांगत आहेत. आधीच्या श्लोकात आपण पाहिले की
परमात्म्याचे स्वरूप आकाशाप्रमाणे व्यापक आहे. तो सर्वत्र भरून राहिला आहे. तो कोठे जात नाही आणि येत
नाही. या श्लोकात त्याच कल्पनेचा आणखी विस्तार समर्थ करीत आहेत. परमात्मा आकाशाप्रमाणे व्यापक तर
आहेच पण तो सूक्ष्मही आहे. किती सूक्ष्म आहे ? तर आजच्या विज्ञानात ज्या अणुरेणूंची कल्पना आपण करतो,
तेवढा सूक्ष्म !त्याच अणुरेणूंचा उल्लेख समर्थांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी केला आहे. परमेश्वर चराचरात आहे हे
आपण नेहमी म्हणतो आणि ऐकतो. पण येथे त्याच्या व्यापकतेची आणि सूक्ष्मतेची कल्पना समर्थ आपल्याला
देतात. जशी आपल्या भोवताली हवा सर्वत्र भरून राहिली आहे, ती आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे
परमेश्वर सर्वत्र भरून राहिला आहे. रेडिओ आणि टीव्हीच्या सूक्ष्म तरंग लहरी आपल्या भोवती अस्तित्वात
आहेत. आपल्याला त्या दिसत नाहीत. पण जेव्हा आपण रेडिओ किंवा टीव्ही लावतो, तेव्हा त्यांचे अस्तित्व
प्रत्ययास येते.
परमेश्वर नभाप्रमाणे व्यापक आहे आणि अणुरेणूंप्रमाणे सूक्ष्म देखील आहे. ही गोष्ट जर प्रतिकात्मक
अर्थाने आपण घेतली तर असे म्हणता येईल की आपण परमेश्वराला पाहण्यासाठी आपल्या वृत्ती
नभाप्रमाणे विशाल कराव्या. ' जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत 'अशी व्यापक आणि विशाल
वृत्ती झाली पाहिजे. आणि मन अणुरेणूंसारखे सूक्ष्म झाले पाहिजे. आपल्या मनोवृत्ती संकुचित
असतात. त्यांना हळूहळू विशाल केले पाहिजे. ' हे विश्वची माझे घर ' हे फक्त म्हणण्यापुरते नको तर
आचरणात आले पाहिजे. आपल्याला भेटणारी व्यक्ती श्रीमंत असो वा गरीब, सामान्य असो वा विशेष, ज्ञानी
असो वा अज्ञानी एवढेच काय पण अगदी पशू-पक्षी, वनस्पती या सर्वांकडे परमेश्वराचे रूप म्हणून पाहता आले पाहिजे.
समर्थांचे शिष्य श्रीधरस्वामी अगदी फुले तोडताना देखील त्यांच्याशी संवाद साधत असत. तुला समर्थांच्या
चरणावर अर्पण व्हायचे आहे असे म्हणून ते फूल वा तुळशीपत्र तोडत असत. जेव्हा अशा प्रकारचा सर्वांभूती
समान भाव आपल्या मनात निर्माण होईल तेव्हा चराचरात भरलेला राघव असा आपल्याला दिसू लागेल.
परमेश्वराचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणून आपले मनही सूक्ष्म झाले पाहिजे. त्यासाठी देहबुद्धी कमी
व्हायला हवी. देहबुद्धी म्हणजे तरी काय ? स्वार्थबुद्धी जी फक्त आपल्यापुरते पाहते. ती आत्मबुद्धी व्हावी.
जेव्हा ध्यान, नामस्मरण आणि सद्गुरूंची कृपा आपल्यावर होईल तेव्हा त्या राघवाला पाहता पाहता आपणही
त्याच्या स्वरूपाला प्राप्त होऊ. लक्ष्य आणि पाहणारा हे द्वैत नाहीसे होईल. दृश्य आणि अदृश्य हा भेदही
नाहीसा होईल. एकरूपता प्राप्त होईल. मी देह नसून ब्रह्म आहे ही जाणीव होते. पण शेवटी तीही विरून जाते.
आपण परमात्मस्वरूपच होतो.
स्वसंवाद
१. आकाश आणि अणुरेणूंमध्ये भरून राहिलेल्या त्या राघवाचे अस्तित्व ओळखून, मी माझ्या संकुचित भावनांना बाजूला सारून अंतःकरण विशाल करतो का?
२. श्रीधरस्वामींप्रमाणे निसर्गातील झाडे, पाने, पशू-पक्षी आणि सर्व माणसांकडे ईश्वराचेच रूप म्हणून पाहण्याची 'सर्वांभूती समदृष्टी' मी ठेवतो का?
३. टीव्ही किंवा रेडिओच्या अदृश्य लहरींप्रमाणे सर्वत्र संचार करणाऱ्या ईश्वराला अनुभवण्यासाठी, मी ध्यानाने आणि नामस्मरणाने माझे मन सूक्ष्म बनवतो का?
४. 'तया पाहतां पाहतां तेंचि जालें' या संतवचनानुसार, दृश्य-अदृश्याचे आणि स्वतःच्या क्षुद्र 'मीपणा'चे द्वैत विसरून त्या ईश्वराशी पूर्ण एकरूप होण्याची माझी धडपड आहे का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२४/९/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा