उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग २००
कळे आकळे रूप ते ज्ञान होता ।
तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था ।
मना उन्मनीं शब्द कुंठीत राहे ।
तो ते तो चि तो राम सर्वत्र पाहे ।।२००।।
अर्थ : जेव्हा ज्ञान होते तेव्हा परमात्मस्वरूप नुसते कळते असे नाही तर त्याचे आकलन होते. अशावेळी सर्वसाक्षीपणाची अवस्था देखील नाहीशी होते. मन उन्मनी अवस्थेत जाते आणि तेथे शब्द देखील मागे सरतात. अशा वेळी एका परमात्म्याशिवाय दुसरे काही प्रत्ययास येत नाही.
( आकळे - आकलन/अनुभूती होणे, आटणे - नष्ट होणे, सर्वसाक्षी अवस्था - ईश्वरासहित सर्वांना साक्षीभावाने पाहणारे मन, उन्मनी - मनाच्या पलीकडील निर्विकल्प अवस्था/अमन अवस्था, कुंठीत होणे - स्तब्ध होणे/गती थांबणे/हार मानणे )
विवेचन
मनाच्या श्लोकांमधील इतर श्लोक आणि हा श्लोक यांच्यात एक फरक असा आहे की हा श्लोक साधकाच्या उन्मनी अवस्थेबद्दल सांगणारा आहे. हा अनुभूतीचा श्लोक आहे. जेव्हा सद्गुरूकृपेने साधकाची अज्ञानी अवस्था नष्ट होते, तो ज्ञानी होतो, तेव्हा त्याला कोणता अनुभव येतो ते सांगणारा हा श्लोक आहे. अनुभवाचे गुह्य येथे समर्थ उघड करतात.
जोपर्यंत सद्गुरूंची कृपा होत नाही, तोपर्यंत साधकाची जी अवस्था असते, ती परमार्थाच्या दृष्टीने अज्ञानीच म्हणता येईल अशी असते. मी म्हणजे फक्त देह नसून एक आत्मा आहे. माझ्यातील आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे. अशा प्रकारची मनोभूमिका साधकाची तयार झालेली असते. तो सर्वसाक्षी अवस्थेने सगळीकडे पाहत असतो. पण तरीही हे ज्ञान कोरडे असते. त्याला अनुभूतीचा स्पर्श नसतो. ती अनुभूती देण्याचे कार्य सद्गुरू करतात. एक व्यावहारिक उदाहरण द्यायचे झाले तर समजा एखाद्या नवीन घरात विजेसाठीची वायरिंग वगैरे सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बल्ब किंवा ट्यूबलाईट देखील लावले गेले आहेत. पण जोपर्यंत ते एखाद्या वीज केंद्राशी जोडले जात नाही, तोपर्यंत ते दिवे काम करणार नाहीत. जेव्हा ते विद्युत केंद्राशी जोडले जातात, तत्क्षणी त्यात वीज प्रवाहित होऊन घर प्रकाशाने उजळून निघते. सद्गुरूंची कृपा हेच कार्य करते. क्षणार्धात अज्ञानाचा अंधकार नष्ट होऊन ज्ञानाच्या प्रकाशाने अंतरंग उजळून निघते. मग सर्वसाक्षीपणाची अवस्थाही नाहीशी होते. सर्वत्र एक परमात्माच दिसू लागतो.
अशी अनुभूती जेव्हा येते तेव्हा मनाची अवस्था उन्मनी होते. उन्मनी अवस्था शब्दात सांगणे कठीण आहे. पण ही अवस्था साधकाला जेव्हा प्राप्त होते, तेव्हा शब्द फिके होतात. शब्दांची गरजच पडत नाही. ज्ञानेश्वर माउलींच्या शब्दात सांगायचे तर हा ' शब्देविण संवादु, दुजेविण अनुवादु 'अशी अवस्था असते. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अशा मनाच्या तीन अवस्था असतात. ज्ञान झाल्यानंतर साधक एका चौथ्या अवस्थेत पोहोचतो. तिला ' तुर्यावस्था ' म्हणतात. अशा वेळी आपण सर्व विश्वाचे साक्षी आहोत अशा प्रकारची विश्वव्यापी जाणीव होते. ही साधनेतील उच्च अवस्था आहे.
परंतु सद्गुरुकृपा हा असा एक परीस आहे की त्याला किंचितही अशुद्धता सहन होत नाही. सद्गुरुंच्या कृपेने पुढे ही तुर्यावस्था देखील नष्ट होते. सर्वसाक्षीपणाची जाणीव देखील नाश पावते. सर्वसाक्षीपणात द्वैतभाव आहे. साधक जेव्हा परमात्म्याशी एकरूप होतो, तेव्हा हा द्वैतभाव संपतो. ' मी तू पणाची झाली बोळवण ' अशी अवस्था असते. मग सर्वत्र तोच तो राम किंवा परमात्मा भरलेला आहे अशी अनुभूती येऊ लागते. हीच मनाची उन्मनी अवस्था असते. या अवस्थेत मन ' अमन ' होते. किंवा ' न -मन ' होते. म्हणून आपण जेव्हा भगवंताला ' नमन ' करतो, तेव्हा मन शिल्लक राहायलाच नको. तेव्हा ते ' न-मन ' होईल.
स्वसंवाद
१. केवळ पुस्तकी किंवा कोरड्या आध्यात्मिक ज्ञानावर समाधान न मानता, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष आत्मिक अनुभूती घेण्याची माझी तळमळ आहे का?
२. विजेच्या उपकरणांप्रमाणे, माझ्या अंतःकरणात ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी स्वतःचा अहंकार विरघळवून मी स्वतःला सद्गुरुकृपेच्या प्रवाहाशी जोडले आहे का?
३. जगातील घडामोडींवर मते मांडत राहण्यापेक्षा, माउलींच्या 'शब्देविण संवादु' या वचनाप्रमाणे अंतरीच्या निस्तब्ध आणि शांत उन्मनी अवस्थेचा अनुभव घेण्याचा मी सराव करतो का?
४. ईश्वराला 'नमन' करताना, माझ्यातील संकुचित वासना व मन पूर्णपणे विसर्जित करून (न-मन होऊन) सर्व चराचरात भरलेल्या एकाच रामाला पाहण्याची माझी तयारी आहे का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२८/९/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा