मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १९३

उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १९३

नव्हे जाणता नेणता देवराणा ।

न ये वर्णितां वेदशास्त्रां पुराणां ।

नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा ।

श्रुति नेणती नेणती अंत त्याचा ।।१९३।।

अर्थ : परब्रह्माच्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान दोन्हीही नाही. वेद, शास्त्रे आणि पुराणे त्याचे वर्णन करण्यास असमर्थ ठरली आहेत. तो दृश्यही नाही आणि अदृश्यही नाही किंवा दृश्य आणि अदृश्य यांचा साक्षीही नाही. वेदांना देखील त्याचा अंतपार कळू शकला नाही. 

( जाणता -ज्ञानी, नेणता - अज्ञानी, श्रुती - वेद, उपनिषदे इ., अंत - स्वरूप/गहनता )

विवेचन 

या श्लोकात समर्थ परमात्म स्वरूपाचे वर्णन करीत आहेत. आपण मानव आहोत. कोणतीही गोष्ट जाणून घेण्याचा आपला जो मानवी प्रयत्न असतो, तो सापेक्ष असतो. म्हणजेच त्यावर स्थलकालाचा प्रभाव असतो. ज्याला एखादी गोष्ट जशी भासेल तसे तो त्याचे वर्णन करतो. उदाहरणार्थ आपली मनःस्थिती प्रसन्न असेल तर आपल्या भोवतीचा निसर्ग आपल्याला तसाच प्रसन्न वाटतो. पण जेव्हा मनःस्थिती उदास असते, तेव्हा तोच निसर्ग उदास, खिन्न वाटू लागतो. तेव्हा एखादा कवी म्हणतो, ' आज उदास उदास दूर पांगल्या सावल्या.' परंतु आपण जेव्हा याच मानवी मर्यादांनी परमेश्वराचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या साऱ्या जाणिवा अपूर्ण पडतात. 

समर्थ पहिल्या ओळीत त्याचे स्वरूप सांगताना म्हणतात,' नव्हे जाणता नेणता देवराणा.' जाणता आणि नेणता म्हणजे ज्ञानी आणि अज्ञानी. परमात्म्याच्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान दोन्ही असत नाही. अर्थातच तो या दोन्हींच्या पलीकडे आहे. एक उदाहरण आपण घेऊ. सूर्य आपला प्रकाशदाता, जीवनदाता आहे. सूर्य उगवला की प्रकाश पडतो आणि सूर्य मावळला की अंधार. आपण म्हणतो की सूर्यामुळे प्रकाश मिळतो. पण सूर्य अंधार आणि प्रकाश या दोन्हींच्या पलीकडे आहे. तसेच भगवंत जाणता किंवा नेणता या गोष्टींच्या पलीकडे आहे. ज्ञानेश्वर माउलींचा एक सुरेख अभंग आहे.

जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । उच्चारणीं पाहीं मोक्ष सदा ॥१॥
नारायण हरी उच्चार नामाचा । तेथें कळी-काळाचा रीघ नाहीं ॥२॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । तें जीवजंतूंसीं केंवि कळे ॥३॥
ज्ञानदेवा फळ नारायण पाठ । सर्वत्र वैकुंठ केलें असे ॥४॥

पुढील ओळीत समर्थ म्हणतात,' न ये वर्णिता वेदशास्त्रां पुराणां ' अशा या भगवंताचे वर्णन करण्यासाठी वेद, शास्त्रे, पुराणे देखील असमर्थ ठरतात. हीच गोष्ट ज्ञानेश्वर माउली सुद्धा वरील अभंगात सांगत आहेत. ' तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । तें जीवजंतूंसीं केंवि कळे ।। " कानडा राजा पंढरीचा " या लोकप्रिय गीतात सुद्धा ' वेदांनाही नाही कळला अंतपार याचा...' असे म्हटले आहे. तर मानवी मर्यादांनी त्याला कसे जाणून घेता येईल ? 

पुढे समर्थ म्हणतात,' नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा.' परमात्म्याला आपण आपल्या या दैहिक नेत्रांनी पाहू शकत नसल्याने तो दृश्य नाही. पण समर्थ म्हणतात की तो अदृश्यही नाही. कारण तो तर सर्व विश्व व्यापून उरला आहे. त्याचे अस्तित्व जाणता येऊ शकते. त्याचप्रमाणे तो दृश्य आणि अदृश्य यांचा साक्षीही नाही. कारण जेव्हा एखादी व्यक्ती साक्षी आहे असे आपण म्हणतो तेव्हा पाहणारा आणि जी गोष्ट पाहिली जाते ती, अशा दोन गोष्टी येतात. म्हणजेच या ठिकाणी द्वैत आले. द्वैत परमात्म्याच्या ठिकाणी नाही. पाहणाराही भगवंत आणि जाणणाराही भगवंत अशी ती एकरूप अवस्था असते. ' देव पहावया गेलो, देवचि होऊनि ठेलो.' अशी अवस्था असते. 

तात्पर्य, भगवंताला जाणून घेण्यासाठी सर्व प्रकारच्या मानवी फूटपट्ट्या तोकड्या पडतात. म्हणून आत्मज्ञानाने त्याला जाणून घ्यावे. त्यासाठी नामस्मरणाची कास धरावी. आपली साधना योग्य मार्गाने सुरू राहिली तर सद्गुरुही आपल्या जीवनात भाग्याने येतात. तेच आपल्याला परमार्थ मार्गावर पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. 

स्वसंवाद 

१. जीवनातील सुख-दुःखांच्या पलीकडे जाऊन, सर्वकाळ स्थिर असणाऱ्या ईश्वराशी मी मनाने जोडला जातो का?

२. ज्ञान आणि अज्ञानाच्या मानवी कल्पनांपलीकडे असणाऱ्या भगवंताचे मूळ स्वरूप समजून घेण्यासाठी, माऊलींच्या शिकवणीनुसार 'नारायण हरी' नामाचा अखंड उच्चार मी करतो का?

३. वेद-शास्त्रांच्या वर्णनालाही न सापडणाऱ्या त्या अथांग तत्त्वाला बुद्धीच्या किंवा तर्काच्या संकुचित फूटपट्टीत मोजण्याचा माझा अट्टाहास मी सोडतो का?

४. 'देव पहावया गेलो, देवचि होऊनि ठेलो' या अद्वैत अनुभूतीची कास धरून, दृश्य-अदृश्याच्या द्वैतातून मुक्त होत आत्मज्ञानाने ईश्वराला अनुभवण्याची माझी तळमळ आहे का ?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२०/९/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...