मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १९२

उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १९२ 

मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे ।

दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचे ।

तया खूण ते हीण दृष्टांत पाहे ।

तेथे संग निसंग दोनी न साहे ।।१९२।। 

अर्थ : जे आपल्या मनाच्या आकलनाच्या पलीकडे आहे आणि  जे आपल्या स्थानापासून कधीही ढळत नाही असे परमेश्वराचे स्वरूप आहे. त्या सर्वोत्तमाचे ध्यान त्याच्याशी एकरूप होऊन करावे लागते. त्याचे स्वरूप खुणेने सांगायचे म्हटले तर दृष्टांत अपूर्ण पडतो. परब्रह्माच्या ठिकाणी संग आणि निःसंग अशा दोन्ही कल्पना टिकत नाहीत.

( ढळे - आपल्या जागेवरून हलत नाही, दुजेवीण - अभिन्नपणे/एकरूपाने, सर्वोत्तम - परमेश्वर, खूण - संकेत, हीन - अपूर्ण/गौण/तोकडे, निःसंग - अलिप्तता  )

विवेचन 

या श्लोकात समर्थ आपल्याला परब्रह्माचे स्वरूप सांगत आहेत. परब्रह्म नेमके आहे तरी कसे हे जाणून घेण्याची साधकाला उत्सुकता असते. पण परब्रह्माचे स्वरूप हे अनाकलनीय आहे हे इथे समर्थ आपल्याला सांगत आहेत. त्याच्याकडे कसे पाहायचे ते देखील पुढील दोन ओळीत त्यांनी सांगितले आहे. पहिल्या ओळीत समर्थ म्हणतात की परब्रह्म हे आपल्या मनाला कळू शकत नाही. म्हणजेच मनाने ते जाणून घेता येत नाही. याच ओळीत ते म्हणतात की ते कधीही ढळत नाही. ढळत नाही म्हणजे जागेवरून हलत नाही किंवा बाजूला होत नाही. एखादी गोष्ट आपल्या जागेवरून केव्हा ढळू शकते ? तर तिला ढळण्यासाठी मोकळी जागा असली तर ! पण जिथे सर्व चराचरात परब्रह्मच आहे, तिथे त्याच्याविना रिक्त जागा तरी कुठे असणार ? तात्पर्य म्हणजे ते अचल, अढळ आहे.

 ' ना ढळे ' या शब्दाचा दुसराही एक अर्थ घेता येतो. तो म्हणजे ' न आढळे.' जे कुठे आढळत नाही अशी गोष्ट म्हणजे परब्रह्म. परब्रह्माचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म असल्याने मानवी इंद्रियांच्या कक्षेत ते येत नाही. म्हणून ते ' न आढळे.' 

मग अशा या परब्रह्माला जाणून घ्यायचे तरी कसे ? त्याचे उत्तर समर्थ पुढील दोन ओळीत देतात. त्या पुरुषोत्तमाला जाणून घ्यायचे तर तिथे वेगळेपण काय कामाचे ? म्हणून समर्थ म्हणतात," दुजेवीण ते ध्यान सर्वोत्तमाचे." याचाच अर्थ असा की त्याला पाहायचे तर पाहणारा आणि ज्याला पाहायचे तो असे एकरूप होऊन गेले पाहिजे. तिथे दुजेपण नकोच. ' देव पहाया गेलो, देवचि होऊनि ठेलो.' अशी ही अवस्था असते. 

त्यासाठी अहंकाराचा त्याग केला पाहिजे. देह म्हणजे मी नाही. माझे मूळ स्वरूप म्हणजे अविनाशी आत्मा आहे. ही जाणीव जसजशी दृढ होत जाईल, तसतशी देहबुद्धी कमी होत जाईल. आपला आत्मा हा परमात्म्याचा एक अंश आहे. तो आपल्यातच आहे. गजानन महाराजांचा मंत्र ' गण गण गणात बोते ' या मंत्राचा अर्थ असा आहे. पहिला गण म्हणजे जीव. दुसरा गण म्हणजे शिव. गणात म्हणजे हृदयात आणि बोते म्हणजे पहा. हे जिवा त्या शिवाला आपल्या हृदयातच पहा.जेव्हा जीव-शिवाचे मिलन होते, तेव्हा दुजेपण राहातच नाही. द्वैत संपते. अद्वैतच अनुभवास येते. 

पण असे हे परब्रह्म खुणेने दाखवायचे म्हटले तर दाखवता येत नाही. त्याच्यापुढे सगळे दृष्टांत किंवा दाखले गौण ठरतात. कारण त्याचे स्वरूप अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याची तुलना करणार तरी कोणाबरोबर ? परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की जेव्हा आपण त्याच्याशी एकरूप होऊन जाऊ, तेव्हा आपण वेगळे उरतच नाही. मग ' संग ' आणि ' निःसंग ' या दोन्ही गोष्टींना काही अर्थ राहत नाही. कारण साधक त्यापलीकडे गेलेला असतो. 

स्वसंवाद 

१. परब्रह्म केवळ बुद्धीने किंवा तर्काने समजून घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, ते मनाच्या पलीकडचे व अढळ आहे हे ओळखून मी लीन होतो का?

२. तुकोबारायांच्या 'देव पहाया गेलो, देवचि होऊनि ठेलो' या अनुभूतीप्रमाणे, ध्यानात 'मी' आणि 'परमेश्वर' हे द्वैत विसरून मी त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो का?

३. 'गण गण गणात बोते' या शिकवणीनुसार, बाह्य जगात परमेश्वराला शोधण्याऐवजी स्वतःच्या हृदयातील 'शिवाचे' (आत्मतत्त्वाचे) दर्शन घेण्याची माझी साधना सुरू आहे का?

४. ज्या परब्रह्माला जगातील कोणताही दाखला पुरत नाही, त्या अथांग स्वरूपात विलीन होऊन संग-निःसंग या सर्व संकल्पनांच्या पलीकडे जाण्याची माझी अंतरी तळमळ आहे का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१७/९/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...