उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १९१
देहेबुद्धीचा निश्चयो ज्या टळेना ।
तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना ।
परब्रह्म ते मीपणें आकळेना ।
मनीं शून्य अज्ञान हे मावळेना ।।१९१।।
अर्थ : मी म्हणजे देहच आहे हा समज ज्याच्या अंतःकरणात दृढ आहे, त्याला परमेश्वराचे ज्ञान होणे कधीही शक्य नाही. जोपर्यंत मीपणाची धारणा दृढ आहे तोपर्यंत परमेश्वराचे ज्ञान होणार नाही. एवढेच नव्हे तर अज्ञान जे मुळातच अस्तित्वात नाही, ते देखील मनातून जाणार नाही.
( ज्ञान - आत्मज्ञान/ब्रह्मज्ञान, कल्पांतकाळी - विश्वाच्या अंतापर्यंत, आकळेना - समजत नाही, शून्य - जे मुळात अस्तित्वात नाही ते, मावळेना - नष्ट होत नाही )
विवेचन
मनुष्य जीवनाचे अंतिम ध्येय आपले मूळ स्वरूप जाणून घेणे हे आहे. जो विचार करू शकतो, तो माणूस. प्राणी विचार करू शकत नाहीत. माणसाजवळ उन्नत अवस्थेतील मन आहे. ' मनस ' या संस्कृत धातूपासून ' मनुष्य ' हा शब्द तयार झाला आहे. माणूस आणि पशु यांच्यातील मुख्य फरक म्हणजे पशूंना फक्त देहाचा विचार म्हणजे देहबुद्धी असते. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार गोष्टींपलीकडे त्यांची जाणीव जात नाही. परंतु माणूस त्यापलीकडे जाऊन योग्य काय, अयोग्य काय याचा निर्णय घेऊ शकतो. आपण कोण आहोत आणि कशासाठी जन्माला आलो आहोत याचा विचार तो करू शकतो.
परंतु होते काय की जन्माला आल्यापासून देह म्हणजे मीच आहे ही जाणीव त्याच्यात दृढ होत जाते. आपल्या अवतीभवती वागणारी माणसे तो पाहतो. तो त्यांच्यासारखेच वागण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे देहबुद्धी आणि प्रपंचाची जाणीव आणखी घट्ट होत जाते. जोपर्यंत एखादा सुयोग्य गुरु मिळत नाही, तोपर्यंत ही देहबुद्धी आणखी दृढ होत जाते. स्वामी विवेकानंदांची तरुणपणीच रामकृष्ण परमहंसांशी भेट झाली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे स्वामी विवेकानंदांना देहबुद्धी दूर होऊन आपल्या सत्य स्वरूपापर्यंत पोहोचता आले.
पण आपल्यासारख्या सामान्य माणसात जोपर्यंत ही देहबुद्धी आहे, तोपर्यंत आपल्याला कधीही परब्रह्माचे ज्ञान होऊ शकणार नाही असे समर्थ म्हणतात. त्यासाठी त्यांनी ' कल्पांतकाळी ' हा शब्द वापरला आहे. कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुग अशी चार युगे मानली जातात. या चार युगांची एक हजार आवर्तने म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि आणखी एक हजार आवर्तने म्हणजे त्याची एक रात्र. ब्रह्मदेवाचा असा दिवस आणि रात्र याला ' कल्पांत ' असे म्हटले जाते. जोपर्यंत परमेश्वराचे किंवा आत्मस्वरूपाचे ज्ञान होत नाही तोपर्यंत या कालावधीत माणसाचे कोट्यवधी जन्म आणि मृत्यू होतील. त्याला प्रचंड दुःखाचा सामना करावा लागेल.
देहबुद्धी आणि मीपणा या गोष्टी जोडीने असतात. हे मी केले, ते मी केले. माझ्यामुळेच या सर्व गोष्टी होत आहेत. मी नसतो तर अमुकतमुक झाले नसते अशा प्रकारचा अहंकार माणसाच्या मनात असतो. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात,"कर्तेपण रामाकडे द्यावे." आपण मात्र सगळ्या गोष्टींचे श्रेय आपल्याकडे घ्यायला तयार असतो आणि अपयशाचे खापर दुसऱ्याच्या माथी फोडतो. म्हणून जोपर्यंत ' मी ' जात नाही तोपर्यंत ईश्वराचे ज्ञान होणार नाही.
आत्म्याच्या दृष्टीने विचार केला तर आत्मा हा स्वयंप्रकाशित आहे. तिथे अज्ञानाचा अंधकार नाहीच. पण आपल्या देहबुद्धीमुळे आपल्याला त्याचे ज्ञान होत नाही. हा ज्ञानाचा अभाव म्हणजेच अज्ञान. म्हणून देहबुद्धी आणि मीपणाचा त्याग करून स्वस्वरूपाचे ज्ञान करून घ्यावे. त्यासाठी गुरूंचे मार्गदर्शन आणि साधना किंवा सातत्याने नामस्मरणाचा आश्रय घ्यावा.
स्वसंवाद
१. आहार, निद्रा, भय आणि मैथुन या केवळ देहाच्या गरजांमध्येच गुरफटून न राहता, 'मी कोण आहे?' याचा शोध घेण्याची जाणीव माझ्या अंतरात जागी आहे का?
२. कर्माचे यश स्वतःकडे घेऊन अपयशाचे खापर इतरांवर फोडण्याऐवजी, गोंदवलेकर महाराजांच्या शिकवणीनुसार सर्व कर्तेपण रामाला सोपवण्याची माझी मानसिक तयारी आहे का?
३. अनेक जन्मांच्या चक्रात आणि कल्पांताच्या फेऱ्यात भरकटत न राहता, या मानवी जन्मात देहभानाचा पाश तोडून शाश्वत आत्मज्ञानाकडे वळण्याची मला तळमळ आहे का?
४. परब्रह्माच्या दर्शनात अडथळा ठरणारा सूक्ष्म 'मीपणा' आणि देहबुद्धी विरघळवण्यासाठी, मी संतांच्या मार्गदर्शनाखाली अखंड नामस्मरणाची कास धरतो का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१६/९/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा