मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १८९

उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १८९ 

मही निर्मिली तो देव वोळखावा ।

जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा ।

तया निर्गुणालागी गूणीं पहावे ।

परी संग सोडूनि सूखें रहावे ।।१८९।।

अर्थ : ज्याने ही पृथ्वी निर्माण केली आहे त्या देवाला ओळखावे. त्याचे ज्ञान झाल्याबरोबर जीवाला तात्काळ मोक्षप्राप्ती होते. परमेश्वर जरी निर्गुण निराकार असला तरी त्याला सगुणात पहावे. दृश्य जगात मनाने न गुंतता स्वानंदात राहावे. 

( मही - पृथ्वी/सृष्टी/विश्व, तत्काळ - ताबडतोब, गुणी - सगुणात,  )

विवेचन 

आधीच्या श्लोकात समर्थांनी आपल्याला देहभान हे आत्मज्ञानाच्या साहाय्याने नष्ट करावे हे सांगितले. या श्लोकात ते आपल्याला परमेश्वराकडे पाहण्याची दृष्टी देतात. आपण आपल्याभोवतीचे हे जग पाहतो तेव्हा बऱ्याच वेळा ते कोणी निर्माण केले असावे असा प्रश्न आपल्याला पडतो. या श्लोकात समर्थांनी ' मही ' हा शब्द वापरला आहे. मही याचा अर्थ पृथ्वी. परंतु हा शब्द येथे तेवढ्याच मर्यादित अर्थाने वापरलेला नाही. त्यात आपल्या भोवताली असणारे विश्व, सूर्य, चंद्र, तारे आदी सर्व गोष्टींचा समावेश आहे. कारण या सर्वांचा निर्माता एकच परमेश्वर आहे. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की ही सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली. कोणी असेही म्हणतो की परमेश्वर या सृष्टीचा निर्माता आहे. तसे पाहिले तर वरवर ही सर्व विधाने बरोबर आहेत. परंतु त्याबरोबरच आपण हे लक्षात घेतले पाहिजे की या सृष्टीचा निर्माता हा निर्गुण निराकार असा परमेश्वर आहे. 

एखादी वस्तू जेव्हा आपण पाहतो, तेव्हा तिचा निर्माता कोणीतरी असतोच. म्हणजे कार्यकारण भाव आला. मग हे दृश्य जग देखील कोणाच्या तरी कल्पनेतून निर्माण झाले असले पाहिजे. ते काही आपोआप निर्माण झालेले नाही. परमेश्वराच्या संकल्पातून हे विश्व निर्माण झालेले आहे. हा परमेश्वर स्वयंभू आहे. स्वयंभू म्हणजे स्वतःच स्वतःचे कारण असणारा. त्याला कोणी निर्माण केले नाही. अशा या स्वयंभू आणि निर्गुण निराकार परमेश्वराचे दर्शन किंवा अनुभूती आली की जीव तात्काळ मोक्ष पावतो. मोक्ष पावतो म्हणजे जीव जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. अर्थात तो परमेश्वर आत्माराम रूपाने प्रत्येक जीवात व्याप्त आहे. पण त्याचे ज्ञान समर्थांसारखे साक्षात्कारी संत किंवा गुरू आपल्याला देतात. 

परमेश्वर जरी निर्गुण असला तरी त्याची धारणा करणे कठीण आहे. म्हणून समर्थ म्हणतात, ' निर्गुणाला सगुणात पाहावे.' आपल्याला एकदम निर्गुणाला जाणता येणार नाही. आपला प्रवास हा सगुणाकडूनच निर्गुणाकडे होतो. ' निर्गुणाला सगुणात पाहावे ' या समर्थांच्या सांगण्याचा अर्थ असाही घेता येतो की निर्गुणाचे जरी ज्ञान झालेले असले तरी त्याला सगुणात देखील पाहावे. ज्ञानेश्वर माउलींनी म्हटल्याप्रमाणे ' जे जे भेटे भूत, ते  ते मानिजे भगवंत ' ही आपल्या मनाची धारणा व्हायला हवी. जर तो सर्वत्र व्याप्त आहे, तर सर्व प्राणिमात्रात तो आत्मरूपाने अस्तित्वात आहेच. मंदिरातील मूर्तीत देखील तो आहेच. म्हणून समर्थ निर्गुणाला सगुणात पाहावे असे म्हणत आहेत. मात्र या देहाशी असलेले मनाचे तादात्म्य तोडल्याशिवाय आपल्याला आत्मस्वरूपाचे ज्ञान होणे शक्य नाही. म्हणून समर्थ आपल्याला तो ' संग सोडूनि सूखें रहावे ' असे सांगत आहेत. 

स्वसंवाद 

१. या अफाट विश्वातील नश्वर वस्तूंमध्येच अडकून राहण्याऐवजी, ही सृष्टी निर्माण करणाऱ्या त्या 'मूळ निर्मात्याचा' (परब्रह्माचा) शोध घेण्याची माझी धडपड आहे का?

२. ज्ञानेश्वर माउलींच्या 'जे जे भेटे भूत...' या वचनानुसार, निर्गुण ईश्वराचे रूप प्रत्येक सजीव-निर्जीव प्राणिमात्रामध्ये पाहण्याचा समभाव मी ठेवतो का?

३. मंदिरातील मूर्ती किंवा सगुण रूपाची भक्ती करताना, त्या रूपामागील निराकार व अविनाशी आत्मतत्त्वाशी एकरूप होण्याचा माझा प्रयत्न असतो का?

४. समर्थांच्या शिकवणीप्रमाणे, या क्षणभंगुर देहाचा आणि दृश्य जगाचा मानसिक 'संग' (आसक्ती) बाजूला सारून अखंड आत्मसुखात रमण्याची माझी तयारी आहे का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१४/९/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...