मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १८८

उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १८८ 

देहेभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे ।

विदेहीपणें भक्तिमार्गेचि जावें । 

विरक्तीबळे निंद्य सर्वे तजावे ।

परी संग सोडूनि सूखी रहावे ।।१८८।।

अर्थ : ज्ञानरूपी शस्त्राचा वापर करून मी म्हणजे देह आहे ही जाणीव नष्ट करावी. देहबुद्धी नष्ट करून भक्तिमार्ग अनुसरावा. आसक्ती रहित होऊन निंद्य अशा सर्व गोष्टींचा त्याग करावा. मनाने या दृश्य जगताशी असलेल्या संबंधाचा त्याग करून सुखी राहावे. 

( देहेभान - मी देह आहे ही जाणीव, ज्ञानशस्त्रे - आत्मज्ञानाच्या साहाय्याने, खुडावे - तोडून टाकावे, विदेहीपणे - देहाचे भान विसरणे, भक्तिमार्ग -स्वस्वरूपाची जाणीव, विरक्ती - आसक्तीचा त्याग, निंद्य - त्याज्य गोष्टी, संग - सहवास )

विवेचन 

आधीच्या श्लोकात समर्थांनी पंचमहाभूते, सर्व प्राणिमात्र आणि हे विश्व यात एकरूपता आहे असे आपल्याला सांगितले. या दृश्य जगात आपण वावरत असल्यामुळे आपली देहबुद्धी प्रबळ असते. हे दृश्य जगत आपल्याला खरे वाटते. मी म्हणजेच देह आहे ही भावना प्रबळ होते. जोपर्यंत आपण या देहाशी असलेला संबंध मनाने तोडत नाही, तोपर्यंत स्वस्वरूपाचे ज्ञान आपल्याला होणार नाही. मग ही देहबुद्धी कशी नष्ट करता येईल ? त्याचे उत्तर समर्थ आपल्याला या श्लोकात देत आहेत. एखादी गोष्ट नष्ट करायची असेल तर कुठल्यातरी साधनाचा किंवा शस्त्राचा वापर करावा लागतो. इथे समर्थ आपल्या हाती एक शस्त्र देत आहेत. हे शस्त्र म्हणजे ज्ञान. हे ज्ञान म्हणजे अर्थातच आत्मज्ञान. मी म्हणजे हा देह नसून मी आत्मा आहे ही जाणीव सदैव जागृत ठेवावी. अशी मनाला सवय लागली की त्या योगाने आपली देहबुद्धी हळूहळू नष्ट होऊ लागते. 

जन्मापासून आपण मायेच्या पसाऱ्यात गुंतत जातो. मी, माझे नातेवाईक, माझी मुलेबाळे, पैसा, घर या सगळ्या गोष्टीत आपण स्वतःला इतके अडकवून घेतो की या गोष्टींनाच सर्वस्व मानून बसतो. परंतु शेवटी आयुष्याच्या अखेरीस जाणीव होते की ज्या ज्या गोष्टी मी माझ्या म्हणत होतो, त्या म्हणजे भ्रम होता. माझे असे काही नाही. परंतु अशा वेळी पश्चात्तापाखेरीज हाती काही राहत नाही. म्हणून समर्थ म्हणतात वेळीच सावध व्हा. आपले देहभान मी आत्मा आहे या ज्ञानशस्त्राच्या साहाय्याने नष्ट करा. 

समर्थ त्यासाठी आपल्याला भक्तिमार्गाचा अवलंब करायला सांगतात. त्यासाठी परमेश्वराचे एकनिष्ठ भक्त व्हावे लागेल. भक्त कोण तर जो परमेश्वरापासून कधीही विभक्त होत नाही तो भक्त. हा भक्त होण्यासाठी मनाने स्वतःच्या देहापासून विभक्त व्हावे लागेल. स्वतःच्या आत्मस्वरूपी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा लागेल. संतांच्या मार्गदर्शनाच्या साहाय्यानेच हे शक्य होईल. 

वर पहिल्या परिच्छेदात म्हटले आहे की आपण संसारात गुंतत जातो. इतके की तो खरा नसूनही खरा वाटतो. म्हणून त्यापासून अलिप्त होता आले पाहिजे. ही अलिप्तता म्हणजेच विरक्ती. जेव्हा मी म्हणजे देह नाही, हे दृश्य जगत भासमान आहे, भ्रामक आहे अशी जाणीव जेव्हा पक्की होईल तेव्हा या दृश्य जगाबद्दलची आसक्ती कमी होईल. मग आपल्या स्वस्वरूपाच्या अनुसंधानाच्या आड येणाऱ्या ज्या ज्या म्हणून वाईट किंवा त्याज्य गोष्टी आहेत, त्यांचा त्याग करावा लागेल. विरक्तीबळानेच हे शक्य होईल. 

केवळ संन्यासीच विरक्त असतात असे नाही. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संसारात राहून देखील आसक्तिरहित होण्याचा अभ्यास करता येतो. साक्षीभावाने घडणाऱ्या घटनांकडे पाहता येते. चिखलात राहूनही कमळ जसे त्यापासून अलिप्त असते, तशीच वृत्ती आपल्यालाही ठेवावी लागेल. आद्य शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे 

मनोबुद्ध्यहङकार चित्तानि नाहं
न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥

"मी हा भौतिक देह किंवा मनाचे विचार नसून, मी शुद्ध, नित्य आणि आनंदस्वरूप 'आत्मा' आहे."  मी चैतन्य आणि आनंदस्वरूप शिव आहे. 

म्हणूनच समर्थ म्हणतात की या देहाचा संग सोडून सुखी राहावे.

स्वसंवाद 

१. नश्वर देहाच्या सुखदुःखांनाच माझे सुखदुःख मानण्याऐवजी, 'मी देह नसून शुद्ध आत्मा आहे' या ज्ञानशस्त्राने मी देहभानाचा पाश तोडण्याचा प्रयत्न करतो का?

२. भगवंताची भक्ती करताना केवळ बाह्य उपचार न करता, संतांच्या शिकवणीनुसार देहाच्या आसक्तीपासून मनाने 'विभक्त' होऊन ईश्वराशी एकरूप होण्याचा माझा सराव आहे का?

३. चिखलात उमलणाऱ्या कमळाप्रमाणे, संसारात राहूनही कर्तव्ये पार पाडत असताना वाईट वृत्ती व मोहाचा त्याग करण्यासाठी मी अंतरी 'विरक्तीचे बळ' वाढवतो का?

४. आद्य शंकराचार्यांच्या 'चिदानन्दरूपः शिवोऽहम्' या अनुभूतीचा ध्यास घेऊन, दृश्य जगाचा व देहाचा मानसिक संग सोडून अखंड आत्मिक सुखात रममाण होण्याची माझी तळमळ आहे का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१४/९/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...