उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग २०२
मना गूज रे तुज हे प्राप्त जालें ।
परी अंतरी पाहिजे यत्न केले ।
सदा श्रवणें पाविजे निश्चयासी ।
धरी सज्जनसंगती धन्य होसी ।।२०२।।
अर्थ : हे मना, परमात्म्याच्या स्वरूपाचे हे रहस्य तुला सांगितले आहे. परंतु आपल्या अंतर्यामी त्याची अनुभूती येण्यासाठी तुला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील. परमात्मा प्राप्तीच्या निश्चयासाठी तुला सत्संग किंवा सद्विचारांचे श्रवण करणे आवश्यक आहे. त्यासाठी हे मना तू सज्जनाची संगत करावीस. त्याने तू धन्य होशील.
( गूज - गूढ/रहस्य, अंतरी - अंतर्यामी/मनामध्ये, यत्न - प्रयत्न, श्रवणें - चांगले विचार ऐकणे, पाविजे - पावशील/प्राप्त होशील, निश्चय - निर्धार, सज्जनसंगती - संत/साधुपुरुषांचा सहवास )
विवेचन
आधीच्या दोन श्लोकांमध्ये समर्थांनी आपल्याला परमात्म्याच्या दर्शनाचे गूढ सांगितले. खरे तर परमात्म्याचे दर्शन किंवा अनुभूती हा बोलण्याचा विषय नाही. ती अनुभवण्याची गोष्ट आहे. तरी देखील आपल्या साधकांचे कल्याण व्हावे हा हेतू मनात धरून समर्थांनी परमात्म्याचे दर्शन झाल्यावर काय होते हे सांगितले. २०० व्या श्लोकात ते म्हणतात," तो गे तो चि तो राम सर्वत्र पाहे.' एकदा आत्मदर्शन किंवा परमात्म्याचे दर्शन झाले किंवा अनुभूती आली की साधकाला सर्वत्र परमेश्वराचेच रूप प्रत्ययास येते. तर २०१ या श्लोकात ते म्हणतात की असे झाले की द्वैत म्हणून काही उरतच नाही.
पण समर्थ साधकाच्या मनातील सर्व शंकांचे समाधान या श्लोकात करीत आहेत. ते म्हणतात," हे मना, मी तुला परमात्म दर्शनाची अत्यंत गुह्य किंवा गुप्त गोष्ट सांगितली. " पण तुला हे प्राप्त करण्यासाठी स्वतःला प्रयत्न करावे लागतील." हे प्रयत्न म्हणजे अंतर्यामी आपल्या वृत्तीचा बदल घडवून आणायचा आहे. आतापर्यंत आधीच्या श्लोकातून समर्थांनी परमार्थाचा शुद्ध विचार वेगवेगळ्या प्रकारे आपल्यासमोर ठेवला. तो आत्मसात करायला हवा. अंतर्यामी त्याची अनुभूती यायला हवी. त्यासाठी चिकाटीने दीर्घकाळ प्रयत्न करावे लागतील.
समर्थांनी हे जे सांगितले आहे, त्याला साधनेची जोड द्यावी लागेल. सातत्याने नामस्मरण, गुरूंच्या उपदेशाचे स्मरण आणि पालन या गोष्टी कराव्या लागतील. त्यातूनच अंतरात पालट घडून येईल. आपण घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो. पण प्यायचे काम घोड्याचे आहे. तसेच समर्थ माउलीने आपल्याला या परमार्थाच्या सरोवराच्या काठी आणून सोडले आहे. ते पाणी प्राशन करण्यासाठी आपल्याला स्वतःलाच हालचाल करावी लागेल.
पण बऱ्याच वेळा आपण कंटाळून साधन सोडून देतो. माणसाचे विचार बदलत असतात. म्हणून समर्थ म्हणतात," घडीघडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा..." तो निश्चय दृढ व्हावा यासाठी सद्गुरू कृपा आवश्यक असते. परमार्थ मार्गावर सातत्याने दृढ प्रयत्नांची कास धरावी लागते. संपूर्ण श्रद्धेने साधन करावे लागते. त्यासाठी मनाचा आणि बुद्धीचा निश्चय आवश्यक असतो. हा निश्चय सत्संग श्रवणातून होतो, चांगल्या विचारांचे श्रवण केल्याने होतो. चांगल्या विचारांनी आपल्या अंतरंगात बदल होतो. परमार्थ मार्गावर चालण्याचा निश्चय दृढ होतो.
मग या सत्संगासाठी किंवा चांगले विचार कानावर पडण्यासाठी काय करावे ? याचेही उत्तर समर्थ अंतिम चरणात देतात. ते म्हणजे ' धरी सज्जनसंगती धन्य होसी.' सज्जनांचा संग करावा. आता ' सज्जन ' म्हणजे नेमके कोण हे समर्थांनी आधीच्या श्लोकांमध्ये विस्तृतपणे सांगितले आहे. सज्जन याचा अर्थ संत किंवा साधुपुरुष असा अपेक्षित आहे. आधीच्या श्लोकांमध्ये आपण पाहिले की केवळ बाह्य स्वरूपावरून साधू, संत किंवा गुरु यांना ओळखता येणार नाही. अशी व्यक्ती खऱ्या अर्थाने हरिभक्त आहे का, ते परमार्थाव्यतिरिक्त इतरच काही बोलतात का, साधन करण्याचे सांगण्याऐवजी दुसरेच काही करायला सांगतात यासारख्या गोष्टींवरून ती व्यक्ती खरोखरच गुरू म्हणून पात्र आहे का हे ठरवता येते. अशा साक्षात्कारी व्यक्तीचा संग आपण करावा असे समर्थ म्हणतात. त्यांच्या संगतीत ' विमल, शुद्ध विचारांचे ' श्रवण घडते. परमार्थाचा निश्चय दृढ होतो. शेवटी आत्मज्ञान होऊन साधक धन्य होतो.
स्वसंवाद
१. सद्गुरूंनी आणि संतांनी सांगितलेले परमार्थाचे गुह्य ज्ञान केवळ ऐकण्यापुरते न ठेवता, ते प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी मी स्वतः अंतरी प्रामाणिक प्रयत्न करतो का?
२. घोड्याला पाण्याकाठी नेल्यावर त्याने स्वतः पाणी प्यावे, तद्वत सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालून नामस्मरण व साधनेचे अमृत मी स्वतः आचरणात आणतो का?
३. संसारातील अडचणींमुळे किंवा आळसामुळे परमार्थातील निश्चय ढळू नये म्हणून, मी नित्यनेमाने सत्संग आणि सद्विचारांच्या श्रवणाची कास धरतो का?
४. 'धरी सज्जनसंगती धन्य होसी' या समर्थांच्या शिकवणीनुसार, बाह्य भपक्याला न भुलता खऱ्या संत-सज्जनांचा सहवास धरून माझे जीवन धन्य करण्याचा मी प्रयत्न करतो का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२६/९/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा