उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १८७
भुते पिंड ब्रह्माण्ड हे ऐक्य आहे ।
परी सर्व ही सस्वरूपी न साहे ।
मना भासले सर्व काही पहावे ।
परी संग सोडूनि सूखी रहावे ।।१८७।।
अर्थ : पंचमहाभूते, सर्व प्राणी आणि हे विश्व यात एकरूपता आहे. परंतु शाश्वत अशा आत्मस्वरूपात त्यांना अस्तित्व नाही. आपल्याला डोळ्यांनी आणि मनाने जे जे दिसेल ते सर्व पाहावे परंतु मनाने त्यात गुंतले नाही म्हणजे आपण सुखी राहू.
( भुते - पंचमहाभूते, पिंड - सर्व सजीव प्राणी, ब्रह्माण्ड - विश्व, ऐक्य- एकरूपता, सस्वरूपी - मूळ आत्मरुपात, न साहे - टिकत नाही/सामावू शकत नाही, भासले - अनुभवास आले, संग - आसक्ती )
विवेचन
मनाचे श्लोक आपल्या जाणिवा विशाल करतात. या श्लोकातही आपले आत्मस्वरूप या सगळ्या विश्वापेक्षा वेगळे कसे आहे याची जाणीव समर्थ आपल्याला करून देतात. या १८७ व्या श्लोकापासून ते १९३ व्या श्लोकापर्यंत समर्थ आपल्याला देहाची आसक्ती सोडण्यास सांगतात. या सातही श्लोकातील शेवटचा चरण ' परी संग सोडूनि सूखी रहावे ' हा आहे. पिंडी ते ब्रह्माण्डी ' असे आपण म्हणतो. या श्लोकात समर्थ आपल्याला तेच सांगत आहेत. भुते म्हणजे पंचमहाभूते. पृथ्वी, आप, वायू, अग्नी आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत. या विश्वातील सर्व प्राणिमात्र, सर्व चेतन आणि अचेतन वस्तूत त्यांचा वास आहे. वेगवेगळ्या प्रमाणात ती प्रत्येक जीवात आणि वस्तूत अस्तित्वात आहेत. सभोवतालचा निसर्ग, भोवतालची माणसे, प्राणी या सगळ्यांमध्ये किती विविधता आपल्याला दिसते. पण या विविधतेत एकता आहे. म्हणून समर्थ म्हणतात जे जे भासते, अनुभवाला येते, ते ते सगळे कौतुकाने पहा. पण त्यात ऐक्य आहे याचे भान ठेवा. आपल्या शरीरात देखील या पंचमहाभूतांचे अस्तित्व आहे. तात्पर्य काय तर पंचमहाभूते, सर्व सजीव प्राणी आणि हे ब्रह्माण्ड यात त्यामुळे एकरूपता आहे. म्हणून या विश्वापासून आपण वेगळे नाही. ' हे विश्वची माझे घर ' हे या अर्थाने देखील खरे आहे.
पण हे सांगत असताना समर्थ म्हणतात की असे जरी असले तरी आपले आत्मस्वरूप या सर्व गोष्टींपासून मुक्त आहे. पंचमहाभूतांची धाव या जड देहापर्यंतच आहे. अविनाशी असे जे आत्मतत्त्व आहे, ते या सर्वांपासून वेगळे आहे. त्याला या भौतिक जगाचे कोणतेही नियम लागू होत नाहीत. हे आत्मतत्त्व अत्यंत सूक्ष्म असून आपल्या आकलनाच्या पलीकडे ते आहे. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी निरंतर साधना, नामस्मरण आणि सद्गुरुंच्या कृपेची आवश्यकता असते.
समर्थ म्हणजे मानवाच्या कल्याणाची आस असलेली माउली आहे. सामान्य माणसाच्या मनाचा त्यांचा अभ्यास उत्तम आहे. आपण सामान्य माणसे हे भोवतालचे जग, निसर्ग पाहणार आणि तेच आपल्याला खरे वाटणार हे ते जाणतात. म्हणून ते सांगतात की जे जे आपल्याला दिसते, अनुभवास येते ते ते पहावे. पण त्यात अडकून पडू नये. आपले मूळ स्वरूप वेगळे आहे याची जाणीव ठेवावी. देहबुद्धीमुळे आपण देह म्हणजेच मी आहे असे समजतो. देहाची सुखदुःखे आपलीच समजतो. आपण मनाने या देहबुद्धीला, या विश्वाला घट्ट धरून ठेवले आहे. साहजिकच जी जी संकटे येतात त्यामुळे आपण दुःखी होतो. एखादी मनासारखी घटना घडली म्हणजे आपण आनंदी होतो. परंतु ही सुखदुःखे खरे म्हणजे देहापुरती मर्यादित आहेत. आपला देह, हे विश्व आणि या विश्वातील यच्चयावत गोष्टी नाशिवंत आहेत. माझं घर, माझी माणसे या सगळ्या गोष्टी आपल्याला देहबुद्धीमुळे प्रिय वाटतात. पण त्यांचा संग म्हणजे सहवास अंतिमतः दुःखच देणारा आहे. म्हणूनच ' जगी सर्व सुखी असा कोण आहे ?' असा प्रश्न समर्थांनी आपल्या मनाला केलाच आहे.
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपल्या २९ मार्चच्या प्रवचनात या सगळ्या गोष्टींचे फार सुरेख स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणतात," जशी आपल्या देहाची रचना तशीच सर्वसृष्टीची रचना आहे. देहामधले पंचकोश सृष्टीमध्ये देखील आहेत. फरक एवढाच की देहामध्ये ते मूर्त आहेत आणि सृष्टीमध्ये अमूर्त स्वरूपात आहेत. भगवंताला एकट्याला करमेना म्हणून तो एकाचा अनेक झाला. त्याचा हा गुण माणसाने घेतला. आपण हौसेसाठी आपला व्याप वाढवतो. पण फरक हा की भगवंताने व्याप वाढवला तरी त्यामध्ये तो साक्षीत्वाने राहिला आणि आपण मात्र व्यापामध्ये सापडलो. भगवंत सुखदुःखाच्या पलीकडे राहिला पण आपण मात्र दुःखात राहिलो. व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही. व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षीत्वाने राहायला शिकले पाहिजे."
कोरोना कालावधीत आपल्यावर फार मोठे संकट ओढवले होते. मानवजातीच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला होता. माणसे मृत्यूला कवटाळत होती. आयसीयु मध्ये असलेली माणसे आपली असूनही परकी झाली होती. कोणी कोणाचे नाही. सगळे इथेच सोडून जावे लागते. हा फार मोठा धडा कोरोनाने आपल्याला दिला.
आपले आत्मस्वरूप हे अविनाशी आणि आनंदस्वरूप आहे. हे लक्षात घेऊन या देहात, सभोवतालच्या विश्वात, गुंतून राहू नये. आपण जेव्हा मनाने त्यांचा संग सोडू आणि आपल्या आत्मस्वरूपी रममाण होऊ, तेव्हा चिरंतन आनंदाची प्राप्ती आपल्याला होईल. आपण सुखी होऊ.
स्वसंवाद
१. 'पिंडी ते ब्रह्माण्डी' या न्यायाने सर्व सजीव-निर्जीवांमध्ये एकाच तत्त्वाचे अस्तित्व ओळखून, मी सर्वांप्रती समभाव आणि आदर बाळगतो का?
२. पंचमहाभूतांनी बनलेला हा नश्वर देह म्हणजेच 'मी' या संकुचित देहबुद्धीत अडकण्याऐवजी, देहापलीकडील शाश्वत व अलिप्त आत्मतत्त्वाची मला जाणीव आहे का?
३. गोंदवलेकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे संसाराचा व्याप सांभाळताना मी त्याकडे साक्षीत्वाने पाहायला शिकतो का ?
४. नातेसंबंध, भौतिक संपत्ती आणि सुखदुःखांचा अवाजवी 'संग' (मानसिक आसक्ती) बाजूला सारून, अंतरीच्या आत्मस्वरूपात रममाण होऊन मी खरे सुख अनुभवतो का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१०/९/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा