मुख्य सामग्रीवर वगळा

फुलांच्या रंगांपासून… मनाच्या रंगांपर्यंत!

उगवतीचे रंग

फुलांच्या रंगांपासून… मनाच्या रंगांपर्यंत!

“फूलों के रंग से, दिल की कलम से

तुझको लिखी रोज पाती…”

देवानंद यांच्या 'प्रेम पुजारी' या चित्रपटातील हे सदाबहार गीत कानावर पडले की मन नकळत फुलांच्या रंगांच्या दुनियेत जाऊन पोहोचतं. फुलं म्हणजेच रंगांचं जणू जिवंत काव्य! कुठे लाल गुलाब, कुठे पिवळी सोनचाफ्याची फुलं, कुठे निळसर जांभळी फुले, कुठे शुभ्र मोगरा… आणि या सगळ्या फुलांमध्ये निसर्गाने आपल्या कुंचल्याने भरलेले मनमोहक रंग!

विविध रंगीबेरंगी फुलं कोणाला आवडत नाहीत? माझ्या बागेतही मी आवडीने काही फुलझाडे लावली आहेत. आपल्याला फुलांचे रंग, फुलांच्या बागा आणि त्यांचा सुगंध भुरळ घालतो. कास पठारावर फुलणारा विविधरंगी फुलांचा सडा पाहण्यासाठी हजारो डोळे आतुर असतात. काश्मीरच्या फुलांच्या बागांमध्ये गेलं की मनाला जणू रंगांचंच एखादं स्वप्न पडतं. वसंत ऋतू आला की निसर्गाची रंगपेटी उघडते आणि धरती एखाद्या नववधूसारखी सजते. एखाद्या निष्णात चित्रकारालाही जमणार नाही, अशी रंगांची उधळण निसर्ग मुक्तहस्ते करत असतो.

पण हा रंगसोहळा पाहताना कधी आपण स्वतःला विचारतो का? निसर्गाने फुलांना एवढे सुंदर रंग दिलेच कशासाठी?

केवळ आपल्याला आनंद देण्यासाठी? छे! तो निसर्गाचा मूळ उद्देश नाहीच. निसर्गाची व्यवस्था अगदी विस्मयकारक आहे. फुलांचे रंग केवळ आपल्या डोळ्यांना सुखावण्यासाठी निर्माण झालेले नाहीत, तर ते फुलांच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. मधमाशा, फुलपाखरे, भुंगे आणि इतर कीटक फुलांकडे आकर्षित व्हावेत, त्यांनी फुलांवर यावं, परागकण एका फुलातून दुसऱ्या फुलापर्यंत न्यावेत आणि त्यातून वनस्पतींची पुढची पिढी निर्माण व्हावी, या अद्भुत व्यवस्थेत रंगांची फार मोठी भूमिका आहे.

कीटक फुलावर येतो आणि त्याच्याकडून अगदी नकळत परागसिंचनाचे पवित्र कार्य घडते. कीटकांप्रमाणेच माणूसही फुलाकडे ओढला जातो. मात्र, निसर्गाने उधळलेल्या सौंदर्याचा आपण केवळ क्षणिक उपभोग घेतो आणि त्या सौंदर्यामागील निसर्गाचा मूळ हेतू विसरून जातो. माणूस ते फूल तोडतो, हातात घेतो, काही वेळ सुवास घेतो आणि मग ते फूल कोमेजून जातं. काही संवेदनशील माणसं मात्र फूल न तोडता, त्याच्या झाडावरच्या डोलण्यातच खरा आनंद शोधतात.

रंगांची दुनिया तरी किती अथांग आहे! रंगांविषयी विचार करताना आणखी एक विलक्षण गोष्ट लक्षात येते—आपल्याला जेवढे रंग दिसतात, तेवढंच हे विश्व मर्यादित अजिबात नाही. आपल्या डोळ्यांचीही एक सीमा आहे. प्रकाशाच्या विस्तीर्ण पट्ट्यातील केवळ एका विशिष्ट भागालाच मानवी डोळे रंगांच्या रूपात अनुभवू शकतात. अतिनील (Ultraviolet) आणि अवरक्त (Infrared) यांसारख्या विद्युतचुंबकीय तरंगांचा अनुभव आपल्या डोळ्यांना थेट रंग म्हणून येत नाही. काही पशू-पक्षी मात्र प्रकाशाच्या अशा तरंगलांबी सहज अनुभवू शकतात, ज्या आपल्याला कधीच दिसत नाहीत.

म्हणजेच आपण जे रंग ‘अस्तित्वात नाहीत’ असं मानतो, ते निसर्गाच्या रंगपेटीत आधीपासूनच असतात; फक्त आपल्या डोळ्यांसाठी त्यांची दारं उघडलेली नसतात! कदाचित त्यातही निसर्गाचा काही खास उद्देश असावा आणि तो आपल्या हिताचाच असावा. आपण आकाशातले सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहतो आणि त्यावर मोहित होतो; पण निसर्गाच्या या विराट रंगविश्वात आपल्या दृष्टीपलीकडेही कितीतरी काही दडलेलं आहे. म्हणूनच निसर्गाकडे पाहताना डोळ्यांपेक्षा मन उघडं ठेवणं अधिक महत्त्वाचं ठरतं.

रंगांशी माणसाचं नातं इतकं घट्ट आहे की आपण प्रत्येक रंगाला नावंही बहाल केली! लाल म्हटलं की केवळ लाल नाही; त्यात डाळिंबी लाल, गुलाबी, कुसुंबी, रक्तवर्णी अशा अनेक छटा. पिवळा म्हटला तरी हळदीचा पिवळा, सोनसळी पिवळा, पिकल्या आंब्याचा रंग. हिरव्या रंगात किती विविधता—पोपटी, पानहिरवा, शेवाळी, मोरपिशी, गडद हिरवा. निळ्यामध्ये आभाळी निळा, मोरपंखी निळा, कृष्णकमळाचा निळसर रंग… आणि आपल्या संस्कृतीत ‘राणी’ हाही एक देखणा रंग ठरला—राणी रंग! स्त्रिया जेव्हा साड्यांची निवड करतात तेव्हा त्यांच्या तोंडून ते विविध रंग ऐकून थक्क व्हायला होते. 

वस्तू, फळं, फुलं, पक्षी आणि निसर्गातील विलोभनीय दृश्यांशी नातं जोडून आपण रंगांना नावं दिली. आंबा फक्त चवीने खायचा नसतो, तो एक रंगही देतो. डाळिंब केवळ फळ नसतं, त्याचा एक अनोखा रंग असतो. मोर फक्त न्याहाळायचा नसतो, त्याच्या पिसाऱ्यातून ‘मोरपिशी’ रंग जन्माला येतो. रंग आणि मानवी भाषा यांचं हे नातं किती समृद्ध आहे!

' फुलाला गंध मातीचा 'असं आपण म्हणतो. निसर्गात केवळ फुलांनाच नव्हे, तर मातीलाही स्वतःचा रंग असतो. हातावर माती घेतली तरी तिच्या विविध छटा जाणवतात. कुठे काळसर, कुठे लालसर, कुठे तांबूस, तर कुठे पिवळसर. प्रदेश बदलला की मातीचा पोत आणि रंग बदलतो; आणि त्या रंगामागे त्या भूमीचा शेकडो वर्षांचा इतिहास दडलेला असतो. आकाशाचा तरी एकच रंग कुठे असतो? प्रभातकाळी गुलाबी-केशरी, दुपारी निळाशार, सांजवेळी तांबूस-सोनेरी आणि रात्रीच्या गर्भात गडद निळा… आकाशात ढग दाटून आले की पुन्हा नव्या रंगांची बरसात! कवीवर्य मंगेश पाडगावकर संध्याकाळच्या रंगांबद्दल म्हणूनच सुंदर ओळ लिहून गेले— “रंगांचा उघडूनिया पंखा, सांज कुणी ही केली!”

हिरवा रंग तर जणू निसर्गाचा अधिकृत आणि प्रातिनिधिक रंग. पण त्यातही एकसारखेपणा कुठे? कोवळ्या पालवीचा हिरवा वेगळा, जुन्या पानांचा वेगळा, पहिल्या पावसातील नव्या तृणांकुरांचा वेगळा, शेवाळाचा वेगळा आणि घनदाट अरण्यातील गूढ हिरवा वेगळा. झाडांच्या पानांगणिक निसर्गाने छटा बदलल्या आहेत. रंगांच्या या असंख्य छटा म्हणजे निसर्गाने निर्मिलेली अशी कविता आहे, जिच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ लाभला आहे.

रंगांची ओळख आणि माणसाचं नातं आदिम काळापासून चालत आलं आहे. गुहेत राहणारा आदिमानवही नैसर्गिक रंगांतून भित्तिचित्रे रेखाटत होता. काळाच्या ओघात चित्रकला प्रगत झाली. चित्रकलेत पारंपरिक लाल, पिवळा आणि निळा हे मूळ रंग मानले गेले; भौतिकशास्त्रात प्रकाशाच्या बाबतीत लाल, हिरवा आणि निळा (RGB) हे प्राथमिक रंग ठरले; तर मुद्रणकलेच्या जगात सायन, मॅजेंटा, पिवळा आणि काळा (CMYK) ही पद्धत स्वीकारली गेली. म्हणजेच ‘मूळ रंग’ ही संकल्पनाही आपण कोणत्या संदर्भात पाहतो, त्यावर बदलत जाते.

पण माणसाच्या अंतर्मनातील रंगांची दुनिया या वैज्ञानिक समीकरणांपेक्षा कितीतरी अधिक विशाल आहे. रंगांची स्वतःची एक स्वतंत्र भाषा असते; रंगही भावना व्यक्त करतात. लाल म्हणजे उत्साह, प्रेम आणि पराक्रम. हिरवा म्हणजे निसर्ग, ताजेपणा आणि समृद्धी. निळा म्हणजे आकाशाची अथांग शांतता आणि विशालता. पिवळा म्हणजे प्रसन्नता, ज्ञान आणि चैतन्य. भगवा म्हणजे त्याग, शौर्य आणि विरक्ती. पांढरा म्हणजे शुचिता, शांतता आणि निर्मळता; तर काळा म्हणजे गूढता, गांभीर्य आणि सामर्थ्य.

आपल्याला पांढरा रंग शांततेचा आणि शुचितेचा वाटून सहज आवडतो; पण काळा रंग मात्र बऱ्याचदा नकोसा किंवा केवळ निषेधाचा का वाटतो? डॉक्टरांचा पांढरा एप्रन, परिचारिकांचा गणवेश यात आपल्याला सेवा, स्वच्छता आणि विश्वासाची भावना दिसते. दुसरीकडे, न्यायालयात वकिलांचा काळा कोट हा न्यायव्यवस्थेतील गांभीर्य, शिस्त आणि औपचारिकतेचं प्रतीक असतो. तरीही आपल्या दैनंदिन बोलण्यात आपण “काळं कृत्य”, “काळा दिवस”, “काळं पाणी ” असे नकारात्मक शब्दप्रयोग सहज करतो. पण यात काळा रंग तरी दोषी कसा असू शकतो? रंगाला स्वतःचा कोणताही चांगुलपणा किंवा वाईटपणा नसतो; त्याला चांगला किंवा वाईट अर्थ देतो तो केवळ माणसाचा दृष्टिकोन! म्हणूनच काळ्या रंगाकडेही पूर्वग्रह बाजूला ठेवून नव्या नजरेने पाहायला हवं.

आपल्या दैवतांच्या रूपांकडे पाहिले तरी हे वास्तव उलगडतं. पंढरीचा विठूराया सावळा आहे. श्रीकृष्णाचा उल्लेख ‘श्यामसुंदर’ असाच आदराने होतो. प्रभू रामचंद्रही सावळ्या वर्णाचे! जशी आमची काळी माती, तशी आमची साधी माणसं आणि तसेच आमचे देवसुद्धा! मग माणसाच्या मनात काळ्या किंवा सावळ्या रंगाबद्दल एवढा संकोच आणि पूर्वग्रह का असावा? कदाचित आता बाह्य रंगांपेक्षा अंतर्मनाची शुद्धता तपासण्याची वेळ आली आहे.

निसर्गाच्या चक्रात केवळ वनस्पतींनाच नव्हे, तर ऋतूंनाही स्वतःचे रंग असतात. वसंताचा रंग म्हणजे नवचैतन्य, उन्हाळ्याचा रंग म्हणजे रखरखीत ऊन आणि तापलेली धरती, पावसाळ्याचा रंग म्हणजे चोहोकडे उसळलेला हिरवाईचा उत्सव, शरदाचा रंग म्हणजे स्वच्छ निरभ्र आकाश आणि हिवाळ्याचा रंग म्हणजे धुक्याची शुभ्र शाल. आणि पहाट? पहाट म्हणजे तर रंगांची विलोभनीय उधळण! क्षितिजावर आधी फिकट प्रकाशाची तिरीप फुटते, हळूहळू त्यात गुलाबी छटा मिसळतात, नारिंगी रंगाची मोहक किनार उमटते, सोनेरी किरणे पसरतात आणि पाहता पाहता अवघं नभ उजळून निघतं.

हेच तर जीवनाचे ‘उगवतीचे रंग’! आणि दिवस मावळताना पश्चिमेकडे पसरणारे रंगही तितकेच भावूक असतात. उगवतीचा रंग मनात नवी आशा, नवा हुरूप पेरतो; तर मावळतीचा रंग दिवसाच्या आठवणी जागवत मनाला एक अनोखी हुरहूर लावून जातो.

मुलं म्हणजे देवाघरची फुलं, म्हणूनच त्यांना रंगांचं उपजत आकर्षण असतं. लहान मुलांच्या हातात रंगीत खडू किंवा पेन्सिली दिल्या की त्यांच्या कल्पकतेला क्षणात पंख फुटतात. मुलांचं मन रंगीत पुस्तके, बागडणारी फुलपाखरे आणि आकाशातील सप्तरंगी कमानीकडे सहज ओढलं जातं. कारण रंग केवळ डोळ्यांना दिसत नाहीत, ते थेट अंतःकरणाला स्पर्श करतात.

घराच्या भिंतींवर प्रसन्न रंग असतील तर मन प्रफुल्लित राहतं; गडद, उदास रंग मनावर सावट आणतात. आपल्या अनेक जुन्या स्मृतींनाही एक विशिष्ट रंग जोडलेला असतो. बालपण विविध रंगांत न्हाऊन निघालेलं असतं; मैत्रीचा रंग वेगळा, प्रेमाचा हळवा रंग वेगळा, विरहाचा रंग वेगळा, यशाचा तेजस्वी रंग वेगळा आणि दुःखाचाही एक उदास, खिन्न रंग असतो. मानवी आयुष्य म्हणजे सुख-दुःखांच्या असंख्य रंगांनी मिळून सिद्ध झालेलं एक देखणं चित्रच आहे.

पण खंत एकाच गोष्टीची वाटते ती म्हणजे धर्मांचेही रंग ठरवून टाकले. हिरवा, भगवा, निळा हे रंग वेगवेगळ्या सामाजिक आणि धार्मिक अस्मितांशी जोडले गेले. रंगांची ही सांस्कृतिक ओळख स्वाभाविक असली, तरी जेव्हा प्रतीक हे माणसापेक्षा मोठं होतं, तेव्हा खरा पेच निर्माण होतो. ‘हिरवा माझा, भगवा तुझा, निळा त्याचा’ म्हणता म्हणता आपण माणसामाणसांत संशयाच्या भिंती उभ्या केल्या.

निसर्गाने मात्र माणसाच्या शरीरात वाहणाऱ्या रक्ताला एकच लाल रंग दिला. हिंदूचं रक्त वेगळं नाही, मुस्लिमाचं वेगळं नाही, बौद्धाचं वेगळं नाही की ख्रिश्चनाचं वेगळं नाही. श्रीमंत आणि गरीबाच्या रक्ताची जातकुळीही एकच. निसर्गाने रक्ताला एकच रंग दिला, पण माणसाने मात्र आपल्या संकुचित सोयीनुसार रंगांवरून माणसांची विभागणी करून टाकली!

एकाच बागेत निसर्गाने गुलाबाला मोगऱ्याचा रंग दिला नाही आणि मोगऱ्याला गुलाबाचा सुगंध दिला नाही; तरीही ते एकमेकांचे शत्रू होत नाहीत, तर एकत्र बहरून बागेची शोभा वाढवतात. विविधतेतलं हे आंतरिक ऐक्य हीच निसर्गाची मूळ भाषा आहे; भेदाभेदांच्या भिंती माणसाच्या अहंकारातून उभ्या राहिल्या आहेत. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात मागितलेले विश्वबंधुत्व या ठिकाणी आठवतं, “भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे…”

फुलांचे रंग वेगवेगळे असले तरी त्यांचा सुगंध माणसांना जोडतो. आकाशाचे रंग बदलले तरी ते सर्वांवर एकाच वात्सल्याने छत्र धरतं. सूर्यकिरणे कोणाची जात-पात पाहत नाहीत, पाऊस घराचा महाल की झोपडी असा भेद करत नाही. मग आपणच रंगांच्या नावाने का वाटले जावे? जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे शब्द म्हणूनच दिशा दाखवणारे आहेत— “वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे…”

निसर्गाशी नातं जोडताना आपण एकरूप होतो, मग स्वतःच्याच बांधवांशी नातं जोडताना ते का तोडतो? फुलपाखरू फुलाचा रंग, जात किंवा त्याची मालकी पाहत नाही; त्याला फक्त मध हवा असतो आणि निसर्गाला परागीभवनाची निरंतरता! माणसालाही असंच निर्मळ जगता आलं तर? तुझा रंग तुझ्याकडे आनंदाने राहू दे, माझा माझ्याकडे अभिमानाने राहू दे; फक्त मनातला कडवट द्वेष वाहून जाऊ दे. कारण बागेला एकाच फुलाच्या रंगाने शोभा येत नाही, आकाशाला एकाच रंगाने पूर्णत्व येत नाही, इंद्रधनुष्याला एका रंगात बांधता येत नाही; आणि मानवतेला माणूस असण्यापलीकडे कोणत्याही बाह्य रंगाची गरज नसते!

असा समजुतीचा सूर उमटेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने “अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग…” असे म्हणता येईल. त्या दिवशी ही वसुंधरा केवळ विलोभनीयच दिसणार नाही, तर ती मनाने एक होऊन सुखी होईल.

फुलांच्या नाजूक रंगांपासून सुरू झालेला हा अंतर्मुख करणारा प्रवास माणसाच्या मनाच्या रंगापर्यंत येऊन थांबतो… आणि मनाच्या क्षितिजावर एकच शाश्वत रंग उजळून निघतो. तो असतो केवळ माणुसकीचा!

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

९/९/२०२६

प्रतिक्रियेसाठी: ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा) 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...