उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १८५
लपावे अती आदरे रामरूपी ।
भयातीत निश्चित ये सस्वरूपी ।
कदा तो जनीं पाहतां ही दिसेना ।
सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना ।।१८५।।
अर्थ : आपण अत्यंत प्रेम आणि आदरपूर्वक रामरूपामध्ये मिसळून जावे. ते रामस्वरूप सर्व प्रकारची भीती आणि चिंता यापासून मुक्त आहे. लोक अशा ( रामस्वरूपात एकाग्र झालेल्या ) व्यक्तीला पाहतात पण तो ( रामस्वरूप झालेला ) कोणास दिसत नाही. कारण तो नेहमीच परमात्मरूपी असतो. त्यामुळे तो वेगळेपणाने उरतच नाही.
( लपणे - एकरूप होणे/मिळून जाणे, रामरूपी - आत्मस्वरूपी/परमात्मरूपात, भयातीत - भयाच्या पलीकडे, सस्वरूपी - आत्मरुपात, कदा - कधीही, भिन्नभावे - वेगळेपणाने/द्वैतपणाने )
विवेचन
या श्लोकात परमात्मरूपात मिसळून गेलेल्या व्यक्तीचे वर्णन समर्थ करतात. परमात्मा सर्वत्र विद्यमान आहे. जसा तो सगळीकडे व्यापून आहे, तसाच तो आत्मस्वरूपात देखील आहे. हा परमात्मा म्हणजेच आत्माराम. या आत्मारामाशी एकरूप होणे म्हणजे ' रामरूपी लपणे.' येथे लपणे हा शब्द कुठल्याही शारीरिक अवस्थेचे निदर्शक नाही. ती एक मानसिक अवस्था आहे. आपल्याला आपल्या स्वस्वरूपाशी एकरूप होता आले पाहिजे. पण तसे होत नाही. देहबुद्धीमुळे आणि मीपणामुळे आपण स्वस्वरूपापासून दूर जातो.
तो परमात्मा जो सर्वत्र भरून आहे, त्याचे मूळ स्वरूप आनंदमय आहे. तोच आपल्या अंतर्यामी आहे. पण आपण आपल्या मूळ स्वरूपाला विसरून गेल्यामुळे जीवनात आपल्याला भय आणि दुःखाचा सामना करावा लागतो. म्हणून समर्थ आपल्याला आत्मस्वरूपी म्हणजेच रामरूपी एक व्हावे असे सांगतात. त्यासाठी त्यांनी ' लपणे ' हा सुंदर शब्द वापरला आहे. एखादी व्यक्ती लपून बसली असेल तर ती आपल्याला दिसत नाही. एखादी लपलेली म्हणजे हरवलेली वस्तू आपल्याला जवळ असली तरी दिसत नाही. लहान मुले सुद्धा लपाछपीचा खेळ खेळतात. लपलेला मुलगा लवकर सापडत नाही. त्या खेळात त्यांना एक वेगळाच आनंद मिळतो. त्याप्रमाणेच आपण आपल्या स्वस्वरुपी लपावे असे समर्थ सांगतात.
हे ' लपणे ' किंवा एकरूप होऊन जाणे कसे असावे ? तर समर्थ म्हणतात,' अती आदरे.' रामाची भक्ती करताना त्यात प्रेम आणि आदर हवा. तरच त्यात एकरूप होता येईल. आपल्या आईवडिलांबद्दल आपल्याला आदर आणि प्रेम वाटते. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करा, त्यांची सेवा करा असे आपल्याला कोणी सांगावे लागत नाही. एखाद्याला आपल्या आईवडिलांबद्दल आदर नसेल तर तो त्यांचा सन्मान करणार नाही. रामाबद्दल असाच आदरभाव हवा. जसे एखाद्या व्यक्तीच्या हृदयात प्रेमानेच घर करता येते, तसेच त्या रामरूपापर्यंत आपल्याला प्रेम आणि आदर यांच्यामुळेच पोहोचता येईल. स्वस्वरूप हे सर्व प्रकारच्या चिंता आणि भय यापासून मुक्त आहे. संसाराची काळजी आणि आसक्ती कमी होत जाणे हे स्वस्वरुपी एकरूप होण्याचे मोठे लक्षण आहे.
श्रीराम हे समर्थांचे आराध्य दैवत होते. त्यामुळे ते रामरुपाशी एकरूप होण्याबद्दल आपल्याला सांगतात. संत मीराबाई श्रीकृष्णाशी एकरूप झाली होती. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी विठ्ठलभक्ती केली. रामकृष्ण परमहंस कालीमातेशी एकरूप झाले होते. आपले दैवत कोणतेही असो, त्याची आपण हृदयमंदिरी प्रतिष्ठापना करावी आणि त्याच्याशी एकरूप व्हावे हाच याचा अर्थ. परमात्मतत्त्वात भेद नाही. ही सगुणाकडून निर्गुणाकडे होणारी वाटचाल आहे. तीच आपल्याला करायची आहे हेच समर्थांचे सांगणे आहे.
अशा प्रकारे स्वस्वरूपाशी संत एकरूप झाले होते. पण त्यांचे हे स्वस्वरुपी मिळून जाणे लोकांच्या समजण्यापलीकडे होते. देहाने ते लोकांमध्ये मिसळत, शिष्यांबरोबर संवाद साधत. पण अंतरंगी रामरूप झालेले असत. त्यामुळे कितीही विपरीत परिस्थिती आली तरी दुःख आणि चिंता यांचा लवलेशही त्यांच्याजवळ नव्हता. एखादी व्यक्ती आपण देहाने पाहिली की आपण त्या व्यक्तीला पाहिले असे आपण समजतो. पण आत्मरूप झालेल्या संतांची अवस्था यापेक्षा वेगळी होती. लोकांना ते देहाने दिसत. पण मनाने ते परमात्मस्वरूपाशी एकरूप झालेले असत. ती त्यांची ' विदेही ' अवस्था होती.
स्वसंवाद
१. संसारातील अडचणींमुळे भयभीत न होता, अंतर्यामी वसलेल्या रामरुपाशी एकरूप होण्याचा मी प्रयत्न करतो का?
२. भगवंताची किंवा सद्गुरूंची भक्ती करताना माझ्यात केवळ मागण्या असतात की मनापासून 'अती आदराचा' व प्रेमाचा उत्कट भाव असतो?
३. मीराबाई, ज्ञानेश्वर माउली किंवा तुकोबारायांप्रमाणे, माझ्या आराध्य दैवताच्या सगुण रूपावर नितांत प्रेम करत करत त्यामागील निर्गुण आत्मतत्त्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न मी करतो का ?
४. संतांच्या 'विदेही' अवस्थेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून, बाह्य व्यवहारात कर्तव्ये पार पाडत असतानाही अंतरंगात द्वैत व अहंकार बाजूला सारून मी ईश्वराशी अखंड ऐक्य साधतो का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
८/९/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा