उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १८३
जनीं भक्त ज्ञानी विवेकी विरागी ।
कृपाळु मनस्वी क्षमावंत योगी ।
प्रभु दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे ।
तयाचेनि योगे समाधान बाणे ।।१८३।।
अर्थ : भक्ती, ज्ञान, विवेक आणि वैराग्य यांनी संपन्न असलेला क्षमाशील, मनावर नियंत्रण असलेला आणि करुणसंपन्न असलेला, योगी, इंद्रियांचा स्वामी असलेला, सदैव सावध असणारा, विद्वान आणि चातुर्य अंगी असणारा असा जो पुरुष आहे तो गुरुपदासाठी पात्र समजावा. त्याच्या सहवासात समाधान लाभते.
( विरागी - वैराग्यसंपन्न, कृपाळू - करुणासंपन्न, मनस्वी - मनावर नियंत्रण असलेला, क्षमावंत - क्षमाशील, प्रभु - स्वामी/मालक, दक्ष - सावध, वित्पन्न/व्युत्पन्न - विद्वान/बहुश्रुत, चातुर्य - व्यवहार चातुर्य/लोकव्यवहाराची विलक्षण जाण )
विवेचन
या श्लोकात सद्गुरू कसा असतो किंवा कसा असावा त्याचे वर्णन समर्थ करतात. या श्लोकात सद्गुरूची बारा लक्षणे समर्थ सांगतात. पहिल्या तीन ओळीत प्रत्येकी चार लक्षणे समर्थांनी सांगितली आहेत. साधकाने आपल्या सद्गुरूची निवड करताना वरील लक्षणांनी ते युक्त आहेत की नाही याची खात्री करून घ्यावी. जी सद्गुरूची लक्षणे समर्थ सांगत आहेत, त्या मार्गावर पुढे साधकालाही वाटचाल करायचीच असते. त्यामुळे त्याने देखील आपल्या अंगी या गोष्टी बाणवण्याचा प्रयत्न करावा.
सद्गुरूचे पहिले लक्षण म्हणजे तो भक्त असावा. सद्गुरुला परब्रह्माचे किंवा आत्मस्वरूपाचे ज्ञान झालेले असते. परंतु भक्तीचा आदर्श आपल्या शिष्यांपुढे तसेच समाजापुढे ठेवण्यासाठी तो भक्तिमार्गाचे अनुसरण करून आदर्श घालून देतो. कारण समाजाला आणि साधकाला निर्गुण निराकार अशा परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी सगुणापासूनच सुरुवात करावी लागते. या दृष्टीने समर्थांचे जीवन पाहण्यासारखे आहे. त्यांनी स्वतः तर सगुण साकाराची उपासना केलीच पण शक्तीचे आणि भक्तीचे दैवत असलेल्या हनुमंताची मंदिरे आणि आपले आराध्य दैवत असलेल्या श्रीरामाची मंदिरे उभारली. लोकांसमोर भक्तीचा अनोखा आदर्श निर्माण केला.
सद्गुरू ज्ञानी असावा. हे त्याचे दुसरे लक्षण. केवळ भावनिक स्तरावरील भक्ती उपयोगाची नाही. आपल्या शिष्यांच्या शंकांचे समाधान करता येण्यासाठी त्याचे विविध ग्रंथांचे अध्ययन झालेले असावे. समर्थांनी केवढा प्रचंड अभ्यास केला होता हे दासबोधाची सुरुवात केवळ पाहिली तरी लक्षात येते. दासबोधाच्या प्रथम स्तवनपर दशकात समर्थांनी ज्या ग्रंथांचा उल्लेख केला आहे ते पाहिले तरी त्यांच्या अफाट अध्ययनाची प्रचिती येते. सद्गुरुजवळ विवेक असावा. हा तिसरा गुण किंवा लक्षण. विवेक म्हणजे योग्य अयोग्य, श्रेयस प्रेयस , आत्म अनात्म या गोष्टींमधील फरक लक्षात आलेला असतो. त्यानुसारच त्यांचे वागणे असते. त्यांचे विवेकपूर्ण वागणे हा त्यांनी शिष्यांसमोर उभा केलेला आदर्श असतो. चौथी गोष्ट म्हणजे सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत वैराग्य असावे. ऐहिक गोष्टींची आसक्ती, देहबुद्धी पूर्णपणे नष्ट झालेली असावी. आहे त्या परिस्थितीत ते समाधानी असतात. ' सोने आणि रूपे आम्हां मृत्तिकेसमान ' असे तुकाराम महाराज म्हणतात ते उगीच नाही.
सद्गुरूचे पाचवे लक्षण म्हणजे तो कृपाळू असावा. त्याच्याजवळ असलेले ज्ञान त्याने कृपावंत होऊन आपल्या शिष्यांना आणि समाजाला भरभरून द्यावे. सर्वच संतांनी अशा प्रकारे कृपाळू होऊन आपल्यावर अनंत उपकार केले आहेत. खरा सद्गुरू हा कृपासिंधू असतो. कृपेचा मेघ होऊन तो बरसतो. ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा आदी सर्व संत वाङ्मय म्हणजे संतांनी कृपाळू होऊन समाजावर केलेले अनंत उपकार आहेत. पिढ्यांपिढ्यांचे पोषण हे ग्रंथ करीत आले आहेत. सद्गुरूंचे सहावे लक्षण म्हणजे तो मनस्वी असावा. मनस्वी या शब्दाचे अनेक अर्थ होतात. तो मनावर ताबा असलेला, दृढ निश्चयी आणि विशाल हृदयी असावा. आपल्या वासना आणि विकारांवर त्याचा ताबा असल्याने तो अत्यंत बाणेदार आणि तेजस्वी असतो.
सद्गुरूंचे सातवे लक्षण म्हणजे तो क्षमाशील असावा. त्याला जरी आत्मस्वरूपाचे ज्ञान झालेले असले तरी आपले शिष्य हे अज्ञानी आहेत याची जाणीव त्याला असते. त्यांच्याकडून चुका होण्याची शक्यता आहे. तो अशा वेळी उदार अंतःकरणाने त्यांना क्षमा करतो. आपल्या शिष्यांचे हित कशात आहे याचे त्याला ज्ञान असते. त्यामुळे प्रसंगी तो त्यांची परीक्षा घेतो, त्यांना कठोर शिक्षा देखील करतो. पण त्याच्या अंतःकरणात शिष्याबद्दल प्रेमच असते. आठवे लक्षण म्हणजे सद्गुरू हा योगी असतो. तो मनाने परमेश्वराशी जोडलेला असतो. ' योगः कर्मसु कौशलं ' असे म्हटले जाते. त्याप्रमाणे तो आपले कार्य कुशलतेने करीत असतो.
सद्गुरूच्या अंगी असणारे नववे लक्षण म्हणजे तो प्रभू म्हणजे स्वामी असतो. आपल्या वासना आणि विकारांवर त्याचे नियंत्रण असल्याने तो इंद्रियांचा स्वामी असतो. प्रभू या शब्दाचा आणखी एक अर्थ म्हणजे नेता होतो. असा सद्गुरू कुशल संघटक असतो. तो नेता होऊन समाजाला आणि शिष्यांना मार्गदर्शन करतो. समर्थांनी असे महंत, शिष्य यांचे संघटन केले. मठ उभारले. ' मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ' हा संदेश दिला. सद्गुरूच्या अंगी असणारा दहावा गुण म्हणजे तो सर्व बाबतीत अत्यंत दक्ष असतो. ' अखंड सावधानतेचा ' उपदेश तर समर्थांनी केलाच आहे. अवतीभवती घडणाऱ्या घटना या बाबतीत तो सावध राहून निर्णय घेतो. त्याचप्रमाणे अखंड सावधान असल्याने मोहाचे किंवा स्तुतीचे क्षण ओळखून त्यापासून तो कटाक्षाने दूर राहतो. सद्गुरूजवळ असणारा अकरावा गुण म्हणजे व्युत्पन्नता. अर्थात तो विद्वान असावा. विविध शास्त्रे, धर्मग्रंथांचा त्याचा अभ्यास असावा. आपल्या विषयात किंवा क्षेत्रात तो निष्णात असावा. संत ज्ञानेश्वर असे व्युत्पन्न असल्याने पैठणच्या सभेत धर्ममार्तंडांचे समाधान करू शकले. असा गुरु आपल्या शिष्यांचेही समाधान करू शकतो.
शेवटचा महत्त्वाचा बारावा गुण म्हणजे सद्गुरूचे अंगी चातुर्य असावे. व्यवहार चतुर असण्यावर समर्थांचा भर आहे. भोळसट व्यक्तीला लोक सहज फसवू शकतात. सामान्य माणसाला रोजचे जीवन जगताना देखील व्यवहार चातुर्याची आवश्यकता असते. परमार्थी असणे म्हणजे भोळसट असणे नव्हे. ' आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थविवेका ' असे समर्थांनी दासबोधात सांगितले आहे. सद्गुरुला माणसांची पारख असली पाहिजे. माणसे जोडताना, त्यांचे संघटन करताना आणि त्यांच्यावर कार्याची जबाबदारी सोपवताना त्याचे हे चातुर्य अत्यंत महत्त्वाचे ठरते. कारण विघातक प्रवृत्तीची माणसे जर गोळा झाली तर ती त्याच्या कार्यात अडथळे निर्माण करतील. आपल्या कार्यास लायक अशा व्यक्तींची निवड त्याला करता आली पाहिजे. समर्थांनी आपले कार्य पुढे नेतील असेच शिष्य तयार केले. त्यासाठी आधी पारख करून त्यांची निवड केली.
समर्थांनी सांगितलेले वरील गुण अंगी असणारी व्यक्ती खरोखरच सद्गुरुपदासाठी लायक असते. असा गुरु आपल्या शिष्यांचे समाधान करू शकतो. त्याच्या सहवासात शिष्यांना देखील समाधान लाभते.
स्वसंवाद
१. गुरूंची निवड करताना मी केवळ त्यांच्या बाह्य रूपाला न पाहता, समर्थांनी सांगितलेल्या भक्ती, ज्ञान, विवेक आणि वैराग्य या कसोट्यांवर त्यांचे जीवन तपासून पाहतो का?
२. सद्गुरूंच्या शिकवणीनुसार, मी परमार्थ करताना व्यवहारात भोळसट न राहता 'अखंड सावधानता' आणि 'चातुर्य' बाळगण्याचा प्रयत्न करतो का?
३. शिष्यांच्या चुका मोठ्या मनाने पोटात घेणाऱ्या आणि त्यांना प्रेमाने सन्मार्गावर आणणाऱ्या सद्गुरूंच्या क्षमाशील वृत्तीची मला जाणीव आहे का?
४. ज्यांच्या केवळ सहवासाने अंतरातील वासना, विकार आणि चंचलता शांत होऊन मन 'समाधानाने' तृप्त होते, अशा आत्मज्ञानी सद्गुरूंप्रती माझे संपूर्ण समर्पण आहे का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
७/९/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा