मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १८०

उगवतीचे रंग

​मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १८०

गुरू पाहता पाहता लक्ष कोटी ।

बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी ।

मनी कामना चेटकें धातमाता ।

जनीं वेर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ।।१८०।।

अर्थ : समाजामध्ये अक्षरशः कोट्यवधी प्रकारचे गुरू आढळतात. त्यांच्याजवळ विविध प्रकारचे मंत्र आणि मोठी मंत्रशक्ती असते. परंतु त्यांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या वासना ठाण मांडून बसलेल्या असतात. त्यांच्या पूर्ततेसाठी ते अनेक नको त्या गोष्टी करतात आणि खऱ्याखोट्या गोष्टी सांगून लोकांना फसवतात. अशी व्यक्ती गुरू म्हणवून घेण्यासाठी लायक नसून ती कधीही मोक्षप्राप्ती करून देऊ शकत नाही. 

( लक्ष कोटी -  अनेक प्रकारचे/कोट्यवधी, बहुसाल - विविध प्रकारचे, मंत्रावळी -उपासनेचे विविध मंत्र, कामना - वासना, चेटकें - करणी, धातमाता - कपट/फसवणूक/किमया/युक्त्या, मुक्तिदाता - मोक्ष देणारा )

विवेचन 

सद्गुरू कोणाला म्हणावे, त्यांची लक्षणे कोणती हे सांगणारे १८० ते १८३ हे चार  श्लोक आहेत. त्या मालिकेतील हा पहिला श्लोक. समर्थ ज्या काळात होऊन गेले त्या काळात स्वतःला गुरू म्हणवून घेणाऱ्या साधूंचा बाजार भरला होता. स्वतःला गुरू म्हणवून घेणे आणि भोळ्याभाबड्या लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन आपले भले करून घेणे, आपली वासनापूर्ती करून घेणे हेच त्यांचे काम होते. पण आजच्या काळातही समर्थांचे शब्द तेवढेच वास्तव सांगणारे आहेत. आज आपल्या समाजात कधी नव्हे तेवढे स्वतःला गुरू म्हणवून घेणाऱ्यांचे पीक आले आहे. म्हणून समर्थ म्हणतात ' गुरू पाहता पाहता लक्ष कोटी.' असे नाना प्रकारचे कोट्यवधी गुरू आज समाजात अस्तित्वात असून लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. 

समर्थांच्या काळात तर अघोरी साधना करणाऱ्या साधूंची मोठीच चलती होती. अशा अघोरी विद्येच्या साहाय्याने ही मंडळी काही सिद्धी प्राप्त करून घेत असत. त्यांच्याजवळ काही सिद्ध मंत्र असत. त्यामुळे त्या सिद्धी किंवा मंत्रांच्या आधारावर ते लोकांना चमत्कार दाखवत. त्यांच्याजवळ अशा साधनेतून प्राप्त झालेली शक्ती देखील होती. आजही अशा प्रकारचे साधू विद्यमान आहेत. 

सर्वसामान्य माणूस संसारतापाने पोळलेला असतो. अनेक प्रकारच्या चिंता, ताणतणाव आणि आजारपण इ.नी तो त्रस्त असतो. अशा परिस्थितीत आपल्या समस्यांवर कोणी उपाय सांगितला, कोणी दुःखातून मुक्त करतो आहे असे दिसले की सामान्य माणसे तिकडे धाव घेतात. त्यांना शांतता हवी असते. मग असे बाबा ' गुरू ' बनून त्यांच्या असहायतेचा फायदा घेतात. त्यांना काही चमत्कार दाखवतात. हातचलाखी करून हवेतून एखादी वस्तू काढून दाखवतात. सामान्य माणसावर याचा तात्काळ प्रभाव पडतो. मग ते त्यांना त्यांच्या समस्यांतून मुक्त करील असा एखादा मंत्र देतात. रक्षा, गंडे, तोडे इ. देतात. दक्षिणेच्या नावाखाली त्यांच्याकडील पैसा काढून घेतात.

आपल्याला आता ' शक्तिमान ' गुरू मिळाला आहे म्हणून सर्वसामान्य माणसे निर्धास्त होतात. परंतु ज्याला ते गुरू समजत असतात, त्याच्या अंतर्यामी नाना प्रकारच्या वासना ठाण मांडून बसलेल्या असतात याची त्यांना कल्पना नसते. कांचन आणि कामिनीची कामना त्यांच्या अंतरंगात असते. असे स्वतःला गुरू म्हणवून घेणारे मग आपल्याकडे येणाऱ्या लोकांना भुलवण्यासाठी अनेक खऱ्याखोट्या गोष्टी रचून सांगतात. त्यांच्या आश्रमातील थाटमाट, चमकदार वक्तृत्व, टिळा इ. गोष्टींचा लोकांवर प्रभाव पडतो. त्यांचे चेले देखील त्यांच्या प्रसिद्धीसाठी हातभार लावतात. आजकाल राजकीय व्यक्तींना देखील अशा गुरूंची आवश्यकता भासते. एखादा प्रभावी राजकीय नेता त्यांचा शिष्य झाला की त्यांच्या प्रसिद्धीला आणखी बहर येतो. 

परंतु इथेच समर्थ आपल्याला सावधगिरीचा इशारा देतात. स्वतःला गुरू म्हणवून घेणाऱ्या व्यक्ती कदाचित काही ऐहिक समस्यांवर उपाय सांगू शकतील. परंतु अशा व्यक्ती ' गुरू ' म्हणवून घेण्यासाठी पात्र नसतात. गुरूच्या सान्निध्यात येणाऱ्या व्यक्तींच्या वासना कमी झाल्या पाहिजेत. संसारातील आसक्ती कमी झाली पाहिजे. परमेश्वर प्राप्तीची ओढ लागली पाहिजे. परंतु होते उलटेच ! जो स्वतःच वासनांतून मुक्त झालेला नाही, अशी व्यक्ती गुरू म्हणून इतरांना काय मार्गदर्शन करणार ? तो स्वतः मोक्षमार्गाचा अधिकारी नसल्याने इतरांना कसा मोक्षाप्रत नेणार ? तात्पर्य, अशा साधूंपासून दूरच राहावे असे समर्थांचे सांगणे आहे. 

स्वसंवाद 

१. मी गुरूंचा शोध केवळ माझ्या प्रापंचिक अडचणी, आजारपण किंवा ऐहिक संकटांतून सुटण्यासाठी करतो, की आत्मोद्धारासाठी?

२. एखाद्या व्यक्तीच्या बाह्य चमत्कारांना, हातचलाखीला किंवा मंत्रशक्तीला भुलून मी तिला लगेच 'सद्गुरू' मानण्याची चूक तर करत नाही ना?

३. ज्याच्या सान्निध्यात गेल्यावर माझ्या अंतरीची विषयांसंबंधीची आसक्ती कमी होते आणि ईश्वराची ओढ वाढते, त्यालाच मी खरा सद्गुरू मानतो का?

४. समर्थांच्या इशाऱ्यानुसार, स्वतः वासनांच्या विळख्यात अडकलेल्या आणि संपत्ती-प्रसिद्धीची हाव धरणाऱ्या दांभिक गुरूंपासून मी स्वतःला सावध ठेवतो का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

३/९/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...