उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १७८
जया मानला देव तो पूजिताहे ।
परी देव शोधूनि कोण्ही न पाहे ।
जगीं पाहता देव कोट्यानकोटी ।
जया मानली भक्ति जे तेचि मोठी ।।१७८।।
अर्थ : आपल्याला जो देव आवडतो, त्याचीच आपण आराधना करतो. पण खरा देव कोणीच शोधून पाहत नाही. लोकांच्या दृष्टीने पाहिले तर जगात कोट्यवधी देव आढळतात. ज्याला ज्या देवाची भक्ती आवडते, तो त्याच देवाची भक्ती श्रेष्ठ मानतो.
( मानला - आवडला, कोट्यानकोटी - असंख्य/कोट्यवधी )
विवेचन
समर्थ आपल्याला मागील काही श्लोकांमधून खऱ्या देवाचा शोध घेण्यास सांगत आहेत. त्या मालिकेतील हा चौथा श्लोक. या श्लोकातून समर्थांनी लोकांच्या मानसिकतेवर अचूक बोट ठेवले आहे. ते म्हणतात की ज्याला जो देव आवडतो, तो त्याचीच पूजा किंवा आराधना करतो. अर्थात यात फार वावगे काही आहे असे वरवर पाहता आपल्याला वाटणार नाही. पण जेव्हा समर्थांच्या या श्लोकाचा आपण खोलवर विचार करतो, तेव्हा त्यातील अर्थ लक्षात येतो.
ज्या व्यक्तीला परमार्थात प्रगती करायची आहे, त्याने तर या श्लोकातील मथितार्थ जाणून घ्यायला हवा. आपण बऱ्याच वेळा एखादी व्यक्ती धार्मिक आहे असे म्हणतो. धार्मिक असणे आणि पारमार्थिक असणे यात फरक आहे. धार्मिक व्यक्ती पूजापाठ, कर्मकांड यात व्यस्त असते. आपल्याला आवडणाऱ्या किंवा इच्छित फळ देणाऱ्या देवालाच सर्वस्व मानून ती आपले आयुष्य घालवत असते. परमार्थ म्हणजे परम अर्थ. परम म्हणजे सर्वोच्च. त्यापेक्षा दुसरे काही श्रेष्ठ असू शकत नाही. पारमार्थिक व्यक्ती जी उपासना करीत असते, ती त्याला मोक्षमार्गाकडे घेऊन जाणारी असते. पुढील विवेचनावरून हे आणखी नीट लक्षात येईल.
या जगात तामस, राजस आणि सात्विक प्रवृत्तीचे लोक असतात. जशी त्यांची प्रवृत्ती असते, तसाच त्यांचा देवही असतो. त्या देवाला ते मानतात. तामसी वृत्तीचे लोक अपेयपान करणे, मांस भक्षण करणे, अघोरी उपासना करणे इ. गोष्टीत धन्यता मानतात. ते मग आपल्या आवडीप्रमाणेच त्यांच्या देवाला कोंबडे, बकरे कापून त्यांचा बळी देणे, तोच नैवेद्य त्याला दाखवणे आणि अंतिमतः तोच प्रसाद मानून भक्षण करणे यातच धन्यता मानतात. आणि आपण फार धार्मिक आहोत असे दाखवतात. प्रत्यक्षात ते त्यांची आवड अप्रत्यक्षरीत्या देवाच्या नावावर जोपासत असतात. अशा लोकांना आपले आदर्श मानणाऱ्या लोकांना कधीही परमेश्वराचे दर्शन होऊ शकत नाही किंवा ते मोक्षमार्गाचे अधिकारी होऊ शकत नाहीत.
दुसरा प्रकार राजस वृत्ती असणाऱ्या लोकांचा. ते देवाला नवस बोलतात. त्यांचे काम झाले तर सोन्याचे दागिने, सोन्याचा मुकुट, सिंहासन इ. अर्पण करतात. देवाशी एक प्रकारचा सौदाच हे लोक करतात. त्यांचे देवही तशा प्रकारचे. जिथे या सगळ्या गोष्टी सर्वमान्य होतात. अर्थात वर म्हटल्याप्रमाणे प्राण्यांचे बळी देणे किंवा ज्याने ही सृष्टी निर्माण केली त्यालाच लाच म्हणून सोने, चांदी, पैसे इ. अर्पण करणे यातील काहीही कोणताही देव मागत नाही. पण आम्ही मात्र त्याला नवस बोलत असतो. तो पावला की देव नवसाला पावणारा आहे, जागृत आहे असे समजून त्याच्यापुढे मागण्या मागणारी रांग लागते. असे देव असंख्य आहेत.
पण मला अन्य काही नको. फक्त देव हवा, त्याची कृपा हवी असे खरोखर किती जणांना वाटते ? ज्यांना असे वाटते ती माणसे सात्विक प्रवृत्तीची असतात. त्यांची उपासना देखील तशाच प्रकारची असते. श्रीराम, श्रीकृष्ण, पांडुरंग, श्री दत्तात्रय, श्री महादेव, दुर्गादेवी आदी दैवते आणि त्यांच्या मंदिरात केली जाणारी उपासना ही अशा प्रकारची असते. आपण सज्जनगड, नृसिंहवाडी, औंदुंबर, शेगाव किंवा गोंदवले अशा ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी अशा प्रकारची सात्विक उपासना पाहायला मिळते. लोक नामस्मरण, ध्यानधारणा पूजा, अर्चा इ. करीत असतात.
परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे. तो सत्त्व, रज आणि तम् या त्रिगुणांच्या पलीकडे आहे. अर्थात गुणातीत आहे. ते परम तत्त्व आहे. सर्व चराचरात त्याचा वास आहे. त्याला प्राप्त करून घ्यायचे असेल तर मनातील वासना, अहंकार इ. गोष्टी टाकून देऊन सतत बाहेर धाव घेणाऱ्या मनाला आतमध्ये वळवावे लागेल. परमेश्वर आत्मारामाच्या रूपाने सर्व प्राणिमात्रांच्या ठायी विद्यमान आहे. त्या आत्मारामाचा शोध म्हणजे खऱ्या परमेश्वराचा शोध. तो कोणी घेत नाही ही समर्थांची खंत आहे. ज्ञानेश्वर माउली म्हणतात," एक तत्त्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी." तेव्हा परमेश्वराचे नामस्मरण करीत आपण वाटचाल सुरु ठेवावी.
स्वसंवाद
१. मी ईश्वराची भक्ती केवळ ऐहिक गोष्टींच्या प्राप्तीसाठी करतो का की मला परमेश्वर हवा आहे म्हणून करतो ?
२. मी केवळ बाह्य कर्मकांडात रमून स्वतःला 'धार्मिक' मानतो, की अंतर्मुख होऊन आत्मोद्धाराची वाट धरणारा खरा 'पारमार्थिक' होण्याचा प्रयत्न करतो?
३. जगात कोट्यवधी देवांची व बाह्य रूपांची पूजा करताना, सर्वांच्या ठायी वसलेल्या त्या एकाच 'अविनाशी आत्माराम' परब्रह्माचा शोध मी घेतो का?
४. ज्ञानेश्वर माऊलींच्या वचनानुसार, सर्व प्रकारच्या भेदाभेदांपलीकडे जाऊन अखंड व एकाग्र चित्ताने ईश्वराचे नामस्मरण करण्याची माझी वृत्ती आहे का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२/९/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा