उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १६३
देहेबुद्धीचा निश्चयो दृढ झाला ।
देहातीत ते हित सांडीत गेला ।
देहेबुद्धि ते आत्मबुद्धी करावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ।।१६३।।
अर्थ : अज्ञानामुळे मी देहच आहे असा दृढ निश्चय होतो. त्यामुळे देहाच्या पलीकडे असणारे आत्महित त्याला साधता येत नाही. आपल्या देहबुद्धीचा त्याग करून तिला आत्मबुद्धी करावी (मी केवळ देह नसून एक आत्मा आहे ही जाणीव दृढ करावी). परंतु हे आत्महित साधण्यासाठी नेहमी सज्जनांचा म्हणजे आत्मसाक्षात्कारी संतांचा सहवास करावा.
(देहेबुद्धि - हा देह म्हणजे मी ही भावना, देहातीत - देहाच्या पलीकडे असणारे आत्मस्वरूप, आत्मबुद्धी - मी केवळ देह नसून आत्मा आहे ही भावना, सज्जन - आत्मसाक्षात्कारी व्यक्ती/संत)
विवेचन
१६३ ते १६९ हे सात श्लोक संतसंगतीचा महिमा स्पष्ट करणारे श्लोक आहेत. यापूर्वीही या अर्थाचे श्लोक येऊन गेले आहेत, पण या सात भागात त्यांची आणखी व्यापकता आणि महत्त्व समर्थांनी स्पष्ट केले आहे. एखादी चांगली गोष्ट मनावर बिंबवण्यासाठी ती पुन्हा पुन्हा सांगावी लागते, तसेच हे आहे.
या दृश्य जगाशी आपला संबंध जन्मापासून येतो. त्यापूर्वीही जन्मोजन्मीचे संस्कार आपल्या मनावर दृढ असतात. त्यामुळे हे दृश्य जगत खरे मानून चालण्याचा आपला स्वभाव नैसर्गिकरीत्या झालेला असतो. हे जग पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. आपला देहसुद्धा त्यांचाच एक भाग आहे. त्यामुळे आपली देहबुद्धी बलिष्ठ असते. हा देह म्हणजेच मी असे आपल्याला वाटू लागते. देहाच्या सुखदुःखांना आपण आपले सुखदुःख मानू लागतो. परंतु आपण म्हणजे केवळ देह नाही. त्यापलीकडेही काही असे आहे की ज्याचा आपल्याला विसर पडतो.
देहाच्या पलीकडे आत्मा आहे. या आत्मस्वरूपाचे विस्मरण आपल्याला होते. आपला आत्मा हा परमात्म्याचा एक अंश आहे. आत्म्याचे परमात्म्याशी मिलन यातच जीवनाचे सार्थक आहे. हेच अध्यात्म आणि हाच परमार्थ. परमार्थ अजून वेगळा नाही. पण हा जो आत्महिताचा विचार आहे तो देहबुद्धी बलवान असल्यामुळे आपण करीत नाही.
देहबुद्धी सोडण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक निष्ठेने करावे लागतात. व्रतवैकल्ये, सणवार, वारी, उपासतपास या सगळ्या गोष्टी देहबुद्धीपासून दूर जाता यावे म्हणूनच करायच्या असतात. सर्व संतांनी मोठी साधना करून देहबुद्धीच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे देहाची सुखदुःखे त्यांना बाधली नाहीत.
साखरखेर्ड्याचे प्रल्हाद महाराज रामदासी यांनी आयुष्यभर गुरूंचा उपदेश पाळला. गुरुआज्ञा त्यांनी प्राणापलीकडे जपली. १९७५ मध्ये त्यांना प्रोस्टेटचा आणि हर्नियाचा होऊ लागला. त्यांचे यशस्वी ऑपरेशनही झाले परंतु त्यानंतर उत्तरोत्तर त्यांची प्रकृती खालावत गेली. ते दररोज रामनामाचा साठ हजार जप करीत. त्या अवस्थेतही त्यांच्या जपामध्ये खंड पडलेला नव्हता. इंदोरचे सुप्रसिद्ध वैद्य एकदा त्यांची प्रकृती तपासण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी नाडी परीक्षा केली असताना महाराजांच्या नाडीतून रामनामाचा ध्वनी ऐकू येतो असे त्यांनी सांगितले. कारण त्यांनी गुरूंनी दिलेला उपदेश प्राणापलीकडे जपला होता. ते देहबुद्धीच्या पलीकडे गेले होते. त्यांची आत्मबुद्धी जागृत होती.
बाह्य जगतातील सर्व गोष्टी आपल्याला खऱ्या वाटतात. त्याकडे आपले लक्ष सहज जाते. एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी फारसे कष्ट पडत नाहीत. परंतु बाहेर असणारी नजर अंतर्यामी वळवण्यासाठी मात्र जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी देहबुद्धीचा त्याग करून आत्मबुद्धीचा मार्ग स्वीकारावा लागतो. मी देही नसून विदेही आहे याची सतत मनाला आठवण करून द्यावी लागते. देहाकडून मन आत्म्याकडे वळवावे लागते. एखादे हरवलेले मूल ज्याप्रमाणे आईला शोधते, तसेच आत्म्याचे परमात्म्याशी मिलन झाल्याशिवाय समाधान मिळत नाही. ज्याची आई हरवली आहे अशा मुलाला खेळणी, खाऊ असे काहीही नको असते, तसेच हे आहे. पण हे एवढे सोपे नाही. ही साधना आहे. संतच आपल्याला याबाबतीत उत्तम मार्गदर्शन करू शकतात. म्हणूनच समर्थ आपल्याला 'सदा संगती सज्जनाची धरावी' असे कळकळीने सांगत आहेत.
स्वसंवाद
१. मी केवळ माझ्या देहाची सुखदुःखे, बाह्य रूप आणि गरजा यांनाच सर्वस्व मानून वावरतो, की देहापलीकडच्या 'आत्मतत्त्वाचा' विचार करतो?
२. आई हरवलेल्या बालकाप्रमाणे, या नश्वर जगातील खेळण्यांच्या (भौतिक सुखांच्या) मोहात न पडता, परमात्म्याशी मिलन होण्याची खरी तळमळ माझ्यात आहे का?
३. रोजच्या धावपळीत बाहेर भटकणाऱ्या मनाला देहाकडून अंतर्यामी आत्म्याकडे वळवण्यासाठी मी जाणीवपूर्वक वेळ देतो का?
४. देहबुद्धीचा त्याग करून 'आत्मबुद्धी' जागृत व्हावी यासाठी मी संतांच्या शिकवणीचा आणि सत्संगाचा आधार घेतो का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१९/८/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा