मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १५९

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १५९ 

जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची ।

तया भोजनाची रुची प्राप्त कैंची ।

अहंभाव ज्या मानसीचा विरेना ।

तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना ।।१५९।।

अर्थ : अहंकाररूपी माशी जर एखाद्याच्या ज्ञानरूपी भोजनात असेल तर त्याला त्या भोजनाची रुची ( गोडी ) कशी प्राप्त होणार ? ज्या व्यक्तीचा ज्ञानीपणाचा अहंकार नष्ट होत नाही, त्याला ज्ञानरूपी अन्न पचणार नाही. 

( मक्षिका - माशी, भक्षणे - खाणे, जाणीव- ज्ञानाचा अहंकार/मीपणा, अहंभाव - ज्ञानाचा गर्व, मानसीचा - मनात असणारा, विरेना - नष्ट होत नाही, जिरेना - पचत नाही )

विवेचन 

या श्लोकात आणि पुढील आणखी तीन श्लोकांमध्ये समर्थ अहंकार हा माणसाचा मोठा दोष कसा आहे ते वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सांगत आहेत. समर्थांचा मानवी मनाचा अभ्यास फार मोठा आहे. मनुष्याच्या प्रगतीत कोणकोणते अडथळे येऊ शकतात याचे अचूक ज्ञान त्यांना आहे. त्यांच्या मते अहंकार हा ज्ञानप्राप्तीतील मोठा अडथळा आहे. तो कसा ते स्पष्ट करण्यासाठी रोजच्या व्यवहारातील सोपे उदाहरण समर्थ देतात. समजा एखाद्या मनुष्याने सुग्रास असे जेवण केले पण जेवताना एखादी माशी त्याच्याबरोबर एखाद्या घासात पोटात गेली तर केवढा अनर्थ होतो ! ती माशी असते छोटीच पण त्यामुळे मळमळते, उलटी होते. मग अन्नाची रुची म्हणजे गोडी मिळणे तर दूरच पण ते ओकून टाकावे लागते. 

इथे माशी हे अहंकाराचे रूपक आहे. खूप ज्ञान प्राप्त केले पण त्याचा अहंकार झाला तर त्या ज्ञानाचा काही उपयोग नसतो. जसे माशी पोटात गेल्यामुळे अन्न पचत नाही, तसेच अहंकार असेल तर ते ज्ञान पचत नाही. ज्ञान सुद्धा अन्नासारखे पचावे लागते, आत्मसात व्हावे लागते. आचरणात आणावे लागते. पण अहंकारामुळे माणसाचा मीपणा वाढत जातो. गर्वाचा फुगा फुगत जातो. हा गर्वाचा फुगा कधीतरी फुटल्याशिवाय राहत नाही. उथळ पाणी असणारी नदी खळखळाट करीत वाहते पण पाण्याने भरलेला डोह शांत असतो. तद्वत खरा ज्ञानी हा नम्र असतो. 

गंमत अशी आहे की खरा ज्ञानी माणूस मी अज्ञानी आहे असे म्हणतो. तर ज्याला आपल्या ज्ञानाचा गर्व झाला आहे तो मी किती विद्वान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो. अत्यंत बुद्धिमान असा शास्त्रज्ञ आईन्स्टाईन म्हणत असे की या विश्वाचा अफाट पसारा पाहता माझे ज्ञान वाळूच्या एखाद्या कणाइतके सुद्धा नाही. ज्ञानेश्वरांसारखे संत देखील आपल्या विषय प्रतिपादनात कमालीची नम्रता राखतात. आपण जे काही बोलतो आहोत ते केवळ गुरुकृपेमुळेच अशी त्यांची भावना असते.

पण अहंकारी माणसाच्या लक्षात ही गोष्ट येत नाही. अहंकारामुळे त्याची देहबुद्धी आणखीनच पुष्ट होते. देहाची सुखदुःखे तो आपलीच सुखदुःखे समजू लागतो. त्याचे मन चंचल असते. ज्याला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याचे चित्त स्थिर असावे लागते. आपल्या चित्तात अहंकार, मद, मोह, मत्सर इ .विकारांना थारा देऊन उपयोग होत नाही. याबाबत एक सुंदर कथा आहे. परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी एक मनुष्य एका संतांकडे जातो. त्यांना तो आपल्याला उपदेश करण्याची विनंती करतो. तेव्हा साधुमहाराज म्हणतात,' आणखी एक महिन्याने माझ्याकडे ये. आणि येताना एकटा ये." तसे तर तो यावेळीही एकटाच आलेला असतो. पण साधुमहाराजांपुढे अधिक न बोलता तो निघून जातो. परत एका महिन्याने येतो. त्यावेळीही पुन्हा त्याला साधुमहाराज तेच सांगतात. तो पुन्हा काही दिवसांनी येतो. तेव्हाही साधुमहाराज म्हणतात, " मी तुला एकटे यायला सांगितले होते ना ?" तेव्हा तो मनुष्य गयावया करून म्हणाला, " महाराज, मी एकटाच तर आलो आहे." तेव्हा साधुमहाराज म्हणतात," एकटाच कुठे आहेस ? अहंकार, काम, क्रोध आदी षड्विकार बरोबर आहेत."  तेव्हा तो मनुष्य गुरूंच्या पायावर कोसळतो आणि म्हणतो ," महाराज, त्यातून मुक्त होण्यासाठीच तर तुमच्याकडे आलो आहे." मग सद्गुरू त्याचा स्वीकार करतात. 

समर्थ तर आपले सर्वात मोठे गुरु ! या श्लोकात समर्थ आपल्याला हेच सांगू इच्छितात की तुम्हीही अहंकार आणि इतर विकार टाकून द्या. म्हणजे आत्मज्ञानाचा मार्ग तुमच्यासाठी खुला होईल आणि अंतिम सत्याकडे तुमची वाटचाल सुरू होईल.

स्वसंवाद 

१. मी मिळवलेले ज्ञान, शिक्षण किंवा पदवी यामुळे माझ्यात नम्रता येत आहे, की अन्नात माशी पडावी तसा 'जाणतेपणाचा अहंकार' माझ्या मनात निर्माण होत आहे?

२. आईन्स्टाईन किंवा संतांप्रमाणे मी माझ्या ज्ञानाची मर्यादा ओळखून नम्र राहतो, की उथळ पाण्यासारखा व्यर्थ पांडित्याचा बडेजाव मिरवतो?

३. साधूंच्या कथेप्रमाणे, देवाकडे किंवा गुरूंकडे जाताना मी माझे षड्विकार (काम, क्रोध, अहंकार, मत्सर) बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने 'एकटा' (निरहंकारी) होऊन लीन होतो का?

४. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, ज्ञानाचे केवळ प्रदर्शन न मांडता ते ज्ञान माझ्या आचरणात 'पचवून' आत्मसात करण्याचा मी प्रयत्न करतो का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१६/८/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...