उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १६४
मने कल्पिला वीषयो सोडवावा ।
मने देव निर्गूण तो ओळखावा ।
मने कल्पिता कल्पना ते सरावी ।
सदा संगती सज्जनाची धरावी ।।१६४।।
अर्थ : मनाने निर्माण केलेल्या कल्पनांपासून स्वतःला म्हणजे मनाला बाजूला करावे. निर्गुण निराकार असलेल्या परमेश्वराची मनानेच ओळख पटवून घ्यावी. मनाने केलेली कल्पना मनानेच बाजूला सारावी. या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी आत्मसाक्षात्कारी व्यक्तीची संगत करावी.
( निर्गुण - परमेश्वराचे अमूर्त, अव्यक्त आणि सर्वसाक्षी रूप, वीषयो - भौतिक सुखांचे व वासनांचे विषय, कल्पिता - कल्पना करणे, सरावी - नाहीशी व्हावी )
विवेचन
' सदा संगती सज्जनाची धरावी ' हे सांगणाऱ्या श्लोकमालिकेतील हा दुसरा श्लोक. हे जग परमेश्वराने निर्माण केले आहे. या ईश्वरनिर्मित जगात आपण राहतो आणि आपल्याबरोबर सृष्टीतील इतर सजीव, निर्जीव देखील वास करतात. पण प्राणी आणि वनस्पती मात्र केवळ ईश्वरनिर्मित जगात राहतात. मानवाने या जगातही आपल्या स्वतःच्या विचारांनी स्वतंत्र जग निर्माण केले आहे. त्यामुळे ईश्वरनिर्मित जग जरी असले तरी तो स्वतःच्या कल्पनेतून त्या ठिकाणी वेगळी सृष्टी निर्माण करतो. ही सृष्टी जशी दृश्य असते म्हणजे घरे, इमारती, गाड्या इ. गोष्टी तशीच त्याच्या कल्पनेतून निर्माण झालेले विचार आणि कल्पना यांच्याही जगात तो मनाने रमतो.
आपल्या इच्छा, आकांक्षा आणि आपले मनोविकार किंवा मनातील कल्पना या आपल्याच विचारातून निर्माण झालेल्या असतात. आपले स्वतःचे घर असावे, गाडी, बंगला असावा, सर्व वैभव आपल्याला प्राप्त व्हावे या कल्पना माणसाच्या मनात आधी निर्माण होतात. त्यानंतर त्यांच्या पूर्ततेसाठी तो आयुष्यभर झटत असतो. आपल्या शेजाऱ्याकडे अमुक एक गाडी आहे. आपल्याकडे त्यापेक्षा अधिक चांगली हवी. त्याच्याकडे अमुक इतकी जमीन, बंगला आहे, पैसा आहे. मग आपल्याकडे त्यापेक्षा अधिक नको का ? या विचाराने माणूस झपाटला जातो. त्या स्पर्धेपायी मग भलेबुरे मार्गही तो अवलंबतो. आणि ज्या सुखासाठी तो आयुष्यभर झटत असतो, ते सुख क्षणिक असते. ते चिरकाल टिकणारे नाही याचा अनुभव येऊन तो दुःखी होतो.
यासाठीच समर्थ म्हणतात,' मने कल्पिला वीषयो सोडवावा.' आपल्या मनानेच त्या दृश्याची कल्पना केलेली असते. मनाच्या साहाय्यानेच हे बंधन सोडवावे. एखादी वस्तू दोराने बांधलेली असेल, तर दोर सोडला की ती मोकळी होते. पण एखाद्या कल्पनेला आपल्या मनानेच घट्ट धरून ठेवले असेल तर ती कशी सोडवणार ? त्यासाठी मनाचा दोर मनानेच सोडायला हवा.
किती पैसा मिळाला म्हणजे आपण सुखी होऊ ? याचे काही ठराविक उत्तर देता येत नाही. प्रपंचासाठी पैसा आवश्यक असतो. प्रपंच सहज सुखाचा होईल एवढा पैसा असला म्हणजे पुरे. पण हे समजणाऱ्यासाठी आहे. ज्याला कुठे थांबायचे हे कळत नाही, तो उरफोड करत सारखा पैशाच्या मागे धावत राहतो. माणसाची हाव आयुष्यभर संपत नाही. अशा प्रकारचे विषय किंवा कल्पना मनुष्य मनानेच निर्माण करत असतो आणि सुख नावाच्या मृगजळाचा शोध घेत धावत राहतो. पण मृगजळाने कोणाची तहान भागली आहे का ? पण कल्पना माणसाच्या विचार आणि विवेकशक्तीला पांगळे करते.
आपण जसे पाहू तसे जग आपल्याला दिसते. दृष्टी तशी सृष्टी. आज माझ्याकडे पैसा आहे, सत्ता आहे तर जग मला मान देईल. मला मान देणारी माणसे मला चांगली वाटतील. पण माझ्याकडील वैभव गेले की तीच माणसे मला सोडून जातील. कालपर्यंत मला चांगली म्हणणारी माणसे मला दोषही द्यायला कमी करणार नाहीत. ही जगाची रीत आहे. ही माणसे माझी, हे माझे मित्र, हे शत्रू या सगळ्या गोष्टी आपल्या कल्पनेने आपण निर्माण केलेल्या असतात. त्याच अंतिमतः आपल्याला दुःख देतात. वृद्धापकाळी मुले विचारत नाहीत. या गोष्टी आपल्याला दुःख देतात त्या आपण केलेल्या अपेक्षांमुळे. या अपेक्षा म्हणजेच कल्पना कोण निर्माण करते ? अर्थात आपले मन. म्हणून मनानेच त्या सोडून द्याव्या. तुम्ही म्हणाल हे सगळे ऐकायला छान वाटते पण करायला तेवढेच कठीण आहे. अगदी बरोबर आहे.
मग यावर उपाय काय ? तर समर्थ म्हणतात ' कल्पनेनेच कल्पना बाजूला सारावी.' म्हणजे नेमकं काय करायचं ? तर या वाईट कल्पनांच्या जागी चांगल्या कल्पनांना स्थान द्यायचे. कल्पनाच करायची तर ती परमेश्वराच्या स्वरूपाची का करू नये ? ती कल्पना जरी असली तरी ती आपल्याला बाधक होत नाही. दुःख देत नाही. मन जेव्हा परमेश्वराच्या चिंतनात गुंतते, तेव्हा नको असलेले विचार आपोआपच कमी होतात. मन शुद्ध, निर्मळ होत जाते.
म्हणून समर्थ म्हणतात आपल्या अंतरात वसलेल्या निर्गुण देवाला ओळखायला शिका. त्यासाठी देहबुद्धी सोडून मन आत्मबुद्धीकडे लावावे लागेल. आपण देह नसून आत्मा आहोत हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा विषयांसाठी बाहेर धाव घेणारे आपले मन सुखाचा शोध अंतर्यामी घेण्यास सुरुवात करील. समर्थांचा सगुणाला अजिबात विरोध नाही. सगुणाची उपासना करण्यासाठीच तर त्यांनी गावोगावी श्रीराम आणि मारुती यांची मंदिरे उभारली. पण परमेश्वराचे स्वरूप निर्गुण निराकार आहे हे आपण ओळखून असावे. आपल्याला सुरुवात सगुणापासून करून निर्गुणापर्यंत पोहोचायचे आहे हे लक्षात ठेवावे हाच त्यांच्या सांगण्याचा हेतू आहे.
हे सगळे सहज होणारे नाही. यासाठी सज्जनाची म्हणजे ज्याला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला आहे अशा संतांची संगत करावी असे समर्थ म्हणतात. साथ करावी असे न म्हणता संगत करावी असे समर्थ म्हणतात. ' साथ ' आणि ' संगत ' हे शब्द समानार्थी वाटले तरी त्यात थोडा फरक आहे. साथ ही देहाची असते. तर संगत मनाने करायची असते. सज्जन कुठे शोधायचे ? ते कसे ओळखायचे ? आजच्या काळात ते आपल्याला ओळखता येतील का ? हे प्रश्न कठीण आहेत. पण जेव्हा ' संगत ' या शब्दाचा वरील अर्थ आपण लक्षात घेऊ तेव्हा आपल्याला कळेल की अशा आत्मसाक्षात्कारी संतांचा शोध घेण्यासाठी आपल्याला घराबाहेर पडण्याची आवश्यकता नाही. संतांचे साहित्य आपल्याकडे उपलब्ध असते. ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा यासारखे साहित्य वाचणे म्हणजे संतांच्या संगतीत राहणेच आहे. त्यांचा बोध, उपदेश लक्षात घेऊन वाटचाल करावी. पुढील मार्गदर्शन आपोआप मिळत जाईल.
स्वसंवाद
१. माझ्या दुःखाचे कारण बाह्य परिस्थिती आहे, की माझ्याच मनाने कल्पिलेली अपेक्षा, स्पर्धा आणि विषयांची हाव हे आहे?
२. भौतिक सुखांच्या मृगजळामागे आयुष्यभर धावण्याऐवजी, मनातील अनावश्यक कल्पना बाजूला सारून मी चित्त ईश्वराच्या चिंतनात लावतो का?
३. सगुणाच्या भक्तीत रममाण होतानाच, माझ्या अंतर्यामी वसलेल्या त्या निर्गुण-निराकार परमात्म्याला ओळखण्याची दृष्टी मी विकसित करतो का?
४. संतांच्या प्रत्यक्ष भेटीचा अट्टाहास धरण्याऐवजी, ज्ञानेश्वरी, दासबोध किंवा गाथा या ग्रंथांच्या वाचनातून संतांची खरी 'मानसिक संगत' मी धरतो का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१९/८/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा