उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १५७
बहू शास्त्र धुंडाळिता वाड आहे ।
जया निश्चयो येक तो ही न राहे ।
मती भांडती शास्त्रबोधें विरोधे ।
गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे ।।१५७।।
अर्थ : विविध विषयांच्या ज्ञानशाखांचा विस्तार फार मोठा आहे. त्यांच्यामध्ये परस्परांत एकमत नाही. त्या त्या विषयातील विद्वान त्यांच्या मतांमध्ये एकवाक्यता नसल्याने आपसात भांडतात. खरे ज्ञान झाले म्हणजे मनाची गती खुंटीत होते म्हणजे थांबते.
( शास्त्र - विविध ज्ञानशाखा, धुंडाळणे - शोध घेणे, वाड - मोठे/विस्तृत, साहे - एकमत असणे, मती - निरनिराळे विद्वान, शास्त्रबोध - शास्त्रांचे ज्ञान, विरोधे - मतमतांतरे, ज्ञानबोध - खऱ्या ज्ञानाचा प्रकाश, प्रबोध - जागृती, गती खुंटणे - बुद्धी कुंठित होते )
विवेचन
या जगामध्ये निरनिराळ्या ज्ञानशाखांचा प्रचंड विस्तार झाला आहे. त्यांच्यामध्ये एकवाक्यता किंवा एकमत नाही. अनेक प्रकारची तत्त्वज्ञाने आहेत. त्यांच्यात एकवाक्यता नाही. त्यांच्यातील विद्वान आपापसात भांडत असतात म्हणजे एकमेकांच्या मतांचे खंडन करण्यात धन्यता मानतात. पण जेव्हा एखाद्याला खरे ज्ञान होते तेव्हा तो आपली बुद्धी बाजूला ठेवतो.
सध्याच्या जगात ज्ञानाचा प्रचंड विस्फोट झाला आहे असे आपण पाहतो. निरनिराळ्या ज्ञानशाखा, उपशाखा त्यांचा प्रचंड विस्तार झालेला दिसतो. तत्वज्ञाने सुद्धा विविध प्रकारची आहेत. हे सगळे शिकायचे तर आपल्याला अनेक जन्म देखील कमी पडतील. बरे शिकून कितपत उपयोग होईल ? कारण या सगळ्या ज्ञानशाखांमध्ये परस्परविरोध आहे. एकवाक्यता नाही. एखादा तत्वज्ञानी एक सांगतो, तर दुसरा वेगळेच सांगतो. या सगळ्या मतमतांच्या गलबल्यात सामान्य माणूस गोंधळून जातो. विपश्यना, कुंडलिनी जागृती, सुदर्शन क्रिया, क्रिया योग, प्रजापिता ब्रह्माकुमारी असे विविध प्रकारच्या साधना मार्गाचे लोक आपापल्या मताचा एवढा प्रचार करताना दिसतात की सामान्य माणसाला नेमके काय करावे ते कळत नाही. एकाच गुरूच्या अनुयायांत दोन पंथ पडतात. गुरूंची शिकवण बाजूला राहून दोघे आपापसात भांडत बसतात.
स्वामी विवेकानंदांनी विविध ज्ञानशाखांचे अध्ययन केले होते. विविध तत्वज्ञाने, विविध ग्रंथ वाचले. त्यांचा वैचारिक गोंधळ उडाला. ते म्हणाले," एवढ्या अफाट वाचनातून एकच गोष्ट माझ्या लक्षात आली. ती म्हणजे एवढ्या वाचनाची आवश्यकता नाही." श्रीरामकृष्णांनी तर काहीच वाचले नव्हते. ज्ञानेश्वरीचा प्रचंड अभ्यास असणारे लोक आहेत, ज्ञानेश्वरी पाठ असणारे आहेत, ज्ञानेश्वरीवर प्रवचने देणारे आहेत. पण संत नामदेव म्हणतात," नामा म्हणे ग्रंथ सोपा ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ।।" या अनुभवाच्या पातळीवर वरील ज्ञानेश्वरीचे विविध अभ्यासक कितपत उतरतील हा प्रश्नच आहे.
तेव्हा सगळेच वाचावे, सगळेच शिकावे अशी आवश्यकता नसते. खरे ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान नव्हे. ते आत्म्याचे आणि परमात्म्याचे ज्ञान असते. जेव्हा खरे ज्ञान होते तेव्हा बुद्धी बाजूला ठेवावी लागते. कारण ते ज्ञान म्हणजे अनुभूती असते. समर्थ म्हणतात," गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे " खरे ज्ञान झाले की बुद्धी कुंठित होते. तिला बाजूलाच ठेवून साधना, मनन, चिंतन करावे लागते. ज्याप्रमाणे रामकृष्ण परमहंसांच्या मार्गदर्शनाने स्वामी विवेकानंदांना साधनेचा योग्य मार्ग सापडला, तसेच आपल्यालाही संतांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करायला हवी. तेव्हाच खरे ज्ञान होईल.
स्वसंवाद
१. विविध ग्रंथ, मते आणि पंथांच्या गलबल्यात गोंधळून न जाता, मी माझ्या साधनेचा आणि श्रद्धेचा एकच निश्चित मार्ग धरून चालतो का?
२. संत नामदेवांनी सांगितल्याप्रमाणे ("एक तरी ओवी अनुभवावी"), मी केवळ पुस्तकी ज्ञान किंवा प्रवचने ऐकण्यात मग्न राहतो, की संतांच्या शिकवणीची प्रत्यक्षात 'अनुभूती' घेण्याचा प्रयत्न करतो?
३. शास्त्रांच्या आणि तात्त्विक वादांच्या अखंड चक्रात बुद्धीची धावपळ थांबवून, खऱ्या आत्मज्ञानासाठी मी मनाला शांत आणि अंतर्मुख करतो का?
४. स्वामी विवेकानंदांप्रमाणे संतांच्या आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा अहंकार आणि संशय बाजूला ठेवून साधना करण्याची माझी तयारी आहे का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१४/८/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा