उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १६१
अहंतागुणे सर्व ही दुःख होते ।
मुखे बोलले ज्ञान ते व्यर्थ जाते ।
सुखी राहता सर्व ही सुख आहे ।
अहंता तुझी तू चि शोधूनि पाहे ।।१६१।।
अर्थ : अहंकार हे सर्व दुःखाचे मूळ आहे. अहंभाव असलेल्या व्यक्तीने केलेला उपदेश व्यर्थ ठरतो. ज्याला अहंभाव दूर सारता आला, त्याला जीवनात सर्व प्रकारचे सुख मिळते. म्हणून हे मना, तुझ्या अहंकाराचा तूच शोध घे.
( अहंतागुणे - अहंकाराच्या प्रभावाने )
विवेचन
या श्लोकात देखील समर्थ अहंकारामुळे माणसाचे कसे नुकसान होते त्याचे वर्णन करतात. अहंतागुण किंवा अहंकार हे सर्व दुःखाचे मूळ आहे हे समर्थ पुन्हा आपल्या मनावर ठसवतात. अहंकारातून मने तुटतात. तर संवादाने मने जुळतात. अहंकारी माणूस स्वतःला श्रेष्ठ समजत असतो. आपले श्रेष्ठत्व कधीही कमी होऊ नये असे त्याला वाटत असते. ही भावना पुढे चालून आपले श्रेष्ठ स्थान आपण गमावून बसू का अशी भीती मनात निर्माण करते. भीतीपोटी काळजी माणसाला घेरून टाकते. सततच्या काळजीमुळे अनेक प्रकारच्या दुःखांना सामोरे जावे लागते. तात्पर्य अहंकार हा सर्व दुःखांचे कारण ठरतो.
ज्ञानी व्यक्ती आपल्या ज्ञानाने नम्र झालेली असते. आपल्या मर्यादांची जाणीव तिला असते. ज्ञान हे किती अमर्याद आहे याची जाणीव अशा व्यक्तीला असल्यामुळे ती साहजिकच नम्र होते. पण अहंकारी व्यक्ती ज्ञान हे अथांग आहे हे लक्षात घेत नाही. किंवा माहीत असूनही त्या गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करते. अशी व्यक्ती बऱ्याचदा उत्तम ज्ञानी असते किंवा उत्तम वक्ताही असू शकते. पण शब्द जेव्हा हृदयाच्या खोलीतून येतात, तेव्हा त्यात नम्रतेचा ओलावा असतो. म्हणून खऱ्या ज्ञानी माणसांचे चार शब्द ऐकण्यासाठी देखील लोक आसुसलेले असतात. पण अहंकारी व्यक्तीच्या शब्दांना अहंकाराचा दर्प येतो. असे शब्द समोरच्या व्यक्तींवर फार प्रभाव टाकू शकत नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात अशा व्यक्तींनी बोललेले ज्ञान व्यर्थ जाते. संत नामदेव म्हणतात,"अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझिया विष्णुदासां भाविकांसी ।।"
सुखी व्हायचे असेल तर आपला अहंकार टाकून देणे आणि नम्र होणे हाच योग्य मार्ग आहे.
विद्यां ददाति विनयं, विनयाद् याति पात्रताम्।
पात्रत्वात् धनमाप्नोति, धनात् धर्मं ततः सुखम्॥
असे हितोपदेशात म्हटले आहे. विद्येमुळे नम्रता प्राप्त होते. नम्रतेमुळे पात्रता आणि योग्यता अंगी बाणते. योग्यतेमुळे संपत्ती प्राप्त होते. संपत्तीतून धर्म आणि परोपकार घडून सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते. म्हणून समर्थ म्हणतात हे मना, अहंता अत्यंत वाईट आहे. आपल्यामधील अहंकाराचा तूच शोध घे.
स्वसंवाद
१. अहंकार हे सर्व दुःखांचे मूळ आहे हे मला मनापासून पटले आहे का?
२. माझ्या ज्ञान आणि यशामुळे माझ्यात खरी नम्रता येत आहे, की मी इतरांवर श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या आणि स्वतःचे स्थान गमावण्याच्या सुप्त भीतीत वावरतो?
३. संत नामदेवांप्रमाणे, माझ्या भक्तीत आणि साधनेत 'अहंकाराचा वाराही न लागो' अशी निर्मळ प्रार्थना मी मनापासून करतो का?
४. समर्थांनी सांगितल्याप्रमाणे, इतरांमधील दोष शोधण्याऐवजी माझ्या स्वतःच्या अंतर्मनात दडून बसलेल्या सूक्ष्म अहंकाराचा शोध घेणे मला आवश्यक वाटते का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१७/८/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा