उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १५३
नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्वज्ञाने ।
समाधान काही नव्हे तानमाने ।
नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें ।
समाधान ते सज्जनाचेनि योगे ।।१५३।।
अर्थ : शरीराचे ज्ञान करून घेतले किंवा तत्वज्ञान जाणून घेतले तरी त्यायोगे समाधान मिळत नाही. संगीतादी कलांचे ज्ञान करून घेतल्याने ते मिळत नाही. योगमार्गाचे आचरण किंवा यज्ञयाग केल्याने देखील ते समाधान मिळत नाही. संतांच्या सहवासात खरे समाधान प्राप्त होते.
( पिंड - शरीर, तत्वज्ञान - परमेश्वरासंबंधीचे ज्ञान, तानमान - संगीतादी ललित कला, योग - अष्टांग योग, याग - यज्ञ, भोगत्यागें - देहाच्या सुखांचा त्याग करून )
विवेचन
खरे समाधान कशाने प्राप्त होते ते समर्थ या श्लोकात सांगतात. माणूस आयुष्यभर सुखाच्या मागे असतो. समाधानाचा शोध घेत असतो. त्यासाठी विविध गोष्टी शिकण्याचा, जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण खरे समाधान त्याच्यापासून दूरच राहते. समर्थ म्हणतात पिंडज्ञान म्हणजे आपल्या शरीराचे ज्ञान करून घेतले तर समाधान मिळेल असे आपल्याला वाटते. आपले शरीर पाच प्रकारच्या कोशांनी बनलेले आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. हे कोश एकापेक्षा एक असे अधिकाधिक सूक्ष्म होत जातात. त्यामध्ये शरीर, मन, बुद्धी इ. चा विचार केला जातो. तत्वज्ञान हे शरीराच्या बाहेर असणाऱ्या सृष्टीचा विचार करते. सृष्टीची उत्पत्ती, त्याचा क्रम, मूळ प्रेरणा इ. चा विचार करते. या सगळ्या गोष्टी जरी कोणी जाणून घेतल्या तरी त्याला त्यातून चिरंतन समाधान लाभत नाही.
अत्यंत निष्णात अशा डॉक्टरांना देखील शरीर आणि मनोव्यापाराचे पुरेसे ज्ञान झालेले असते असे म्हणता येत नाही. रोग्याच्या आजाराचे योग्य निदान करण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या ते करवून घेतात. बऱ्याच वेळा त्यातूनही त्यांना योग्य निदान करता येत नाही. त्यामुळे त्यांचे उपचार हे प्रयोग ठरतात. काही लोक संगीत, गायन-वादन इ. कला शिकून घेतात. जन्मभर त्यांची आराधना करतात. पण त्यांनाही समाधान लाभते असे नाही. अगदी प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेले कलाकार देखील एकमेकांचा द्वेष करताना दिसतात. ईश्वरी तत्त्वापासून ते दूरच असतात.
काही लोक योगमार्गाचे आचरण करतात. शरीराचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी आवश्यक अशी योगासने, प्राणायाम ते शिकून घेतात आणि इतरांना शिकवतात. परंतु यम, नियम आदी योगाची आठ अंगे आहेत, त्यापासून ते दूरच राहतात. यम, नियम, प्रत्याहार, धारणा, ध्यान इ. गोष्टींचा अवलंब क्वचितच होतो. काही लोक परमेश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञयागादी गोष्टींचे आयोजन करतात. पण या गोष्टींना नियमांचे बंधन असते. त्यामुळे त्या यथासांग होतीलच असे सांगता येत नाही. तसेच बऱ्याच वेळा अशा प्रकारचे यज्ञ ऐहिक सुखसमृद्धीसाठी किंवा काहीतरी हेतू मनात धरून केले जातात. त्यामुळे यज्ञातून जी चित्तशुद्धी व्हायला हवी ती होत नाही.
काही लोक संसारतापाने वैतागतात आणि त्यांना स्मशानवैराग्य येते. उपभोगांच्या वस्तूंचा ते त्याग करतात. पण त्यांचे वैराग्य आतून आलेले नसते. त्यामुळे ते आतून असमाधानी असतात. त्यातून चिडचिड, संताप निर्माण होतो. काहींना आपल्या त्यागाचा अहंकार होऊन ते त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. आपण त्यागी आहोत असे सांगून लोकांची दिशाभूल केली जाते. अशा प्रकारे समाधानासाठी लोक नाना प्रकार करतात.
पण खरे समाधान कुठे गवसेल ते समर्थ शेवटच्या चरणात सांगतात. ते संतांच्या सहवासातच प्राप्त होते. कारण संत खरोखरच निरिच्छ असतात. त्यांना प्रसिद्धी, पैसा इ.ची हाव नसते. ईश्वराशी ते जोडले गेलेले असतात. त्यांच्या सहवासात गेले की आपला अहंकार गळून पडतो, आपले ज्ञान किती कुचकामी आहे याची जाणीव होते. खऱ्या समाधानाची प्राप्ती तेच करून देऊ शकतात. हा मार्ग खडतर आहे पण खात्रीचा असतो. श्रीरामचरितमानसातील अयोध्याकांडात संत गोस्वामी तुलसीदास म्हणतात, "जे गुर चरन रेनु सिर धरहीं। ते जनु सकल बिभव बस करहीं॥" जे लोक आपल्या मस्तकी गुरुचरणाची पावन धूळ किंवा अगदी एखादा कणही धारण करतात, ते सकळ सुखाचे अधिकारी होतात. स्वतः श्रीराम म्हणतात की याचे उदाहरण मी स्वतः आहे. गुरुकृपेनेच मला सर्व प्रकारचे सामर्थ्य, ऐश्वर्य प्राप्त झाले आहे. गुरूंची महती स्पष्ट करणारे यापेक्षा सुंदर उद्गार दुसरे कोणते असू शकतील !
स्वसंवाद
१. मी बाह्य ज्ञान, कला, योग किंवा भौतिक गोष्टींच्या अभ्यासातच समाधानाचा शोध घेतो, की खऱ्या शाश्वत समाधानासाठी संतांच्या आणि सद्गुरूंच्या विचारांचा आधार घेतो?
२. माझे वैराग्य किंवा त्याग हा आतून आलेला आहे, की तो केवळ तात्कालिक (स्मशानवैराग्य) असून मला माझ्या त्यागाचा सूक्ष्म अहंकार तर होत नाही ना?
३. योगासने किंवा पूजा-अर्चा करताना मी केवळ बाह्य उपचारांमध्ये गुंतून राहतो, की संतांनी सांगितलेली मनाची चित्तशुद्धी आणि निरिच्छता बाळगण्याचा प्रयत्न करतो?
४. श्रीरामचरितमानसात श्रीरामांनी सांगितल्याप्रमाणे, गुरुंच्या/संतांच्या चरणी लीन होऊन आत्मज्ञान आणि खरे समाधान प्राप्त करण्याची नम्रता माझ्या ठायी आहे का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
५/८/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा