उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १५१
खरे शोधिता शोधिता शोधताहे ।
मना बोधिता बोधिता बोधताहे ।
परी सर्वही सज्जनाचेनि योगे ।
बरा निश्चयो पाविजे सानुरागें ।।१५१।।
अर्थ : सत्याचा प्रयत्नपूर्वक शोध घेतला तर शोध लागतो. एखादी गोष्ट मनाला पुन्हा पुन्हा समजावली ( बोध केला ) तर ती समजते. पण हे सर्व संतांच्या सहवासाने घडून येते. संतांच्या सहवासाने आपल्या निश्चयाला बळकटी येते आणि परब्रह्माबद्दल प्रेम निर्माण होते.
( सानुरागें - प्रेमाने युक्त )
विवेचन
परमेश्वराचा शोध आपण सगळेच घेत असतो. पण तो कशा रीतीने प्राप्त होईल हे समर्थ या श्लोकात आपल्याला सांगताहेत. कोणताही शोध ही एका दिवसात होणारी गोष्ट नाही. त्यासाठी वर्षानुवर्षांची साधना, कष्ट आणि परिश्रम करावे लागतात. आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी सुखाची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. विमानाने दूरचा प्रवास सोपा झाला. एकाच दिवसात किंवा काही तासात परदेशात पोचता येते. टीव्ही, मोबाईलच्या माध्यमातून जगात घडणाऱ्या अनेक घडामोडी घरबसल्या बघता येतात. पण या सगळ्या शोधांसाठी वैज्ञानिकांनी तहान-भूक विसरून परिश्रम केले आहेत. काही संशोधकांनी तर आपले अख्खे आयुष्य खर्ची घातले आहे. अनेक रोगांवर उपचार शोधून काढताना, लशींचा शोध लावताना त्यांनी आपली सुखदुःखे बाजूला ठेवली आहेत.
ऐहिक जगतातील शोधासाठी जर एवढे आयुष्य खर्ची घालावे लागते तर परमेश्वराच्या शोधासाठी अनेक जन्म खर्ची पडल्यास नवल नाही. वैज्ञानिकांना आपले संशोधन करताना अनेक वेळा अपयशाला तोंड द्यावे लागते. पण ते निराश होऊन आपले संशोधन सोडून देत नाहीत. निश्चयपूर्वक ते सुरूच ठेवतात. शोधता शोधता एखादा शोध लागतो. प्रयत्नच केले नाही तर शोध लागणार नाहीत. त्याचप्रमाणे एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी ती वारंवार पहावी लागते, ऐकावी लागते. त्यावर मनन, चिंतन करावे लागते. तेव्हा कुठे त्या गोष्टीचा बोध होतो. विद्यार्थ्याला परीक्षेत उत्तम यश मिळवायचे असेल तर केवळ भराभर वाचून पुढे जाता येत नाही. जे काही वाचले किंवा शिकले त्याचे आकलन व्हावे लागते. एखादी गोष्ट समजत नसेल तर ती पुन्हा पुन्हा समजावून घ्यावी लागते. त्यासाठी योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे लागते.
साधना मार्गावर वाटचाल करणाऱ्यांनी देखील विविध धार्मिक ग्रंथ वाचून आपल्या मनाचा गोंधळ करण्यापेक्षा भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध किंवा तुकाराम गाथा यापैकी निष्ठेने एखाद्या ग्रंथाचे अध्ययन करून त्यातील शिकवण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यातूनच संतांच्या शिकवणुकीचा बोध आपल्याला होऊ शकेल.
परमेश्वराचा शोध घेणे ही गोष्ट देखील अशीच परिश्रमपूर्वक प्राप्त होणारी आहे. त्याचा न कंटाळता, न थकता शोध घ्यावा लागतो. संतांच्या शिकवणीतून बोध घ्यावा लागतो. संतांच्या सहवासातूनच परमेश्वर प्राप्तीचा मार्ग सापडतो. तेच समर्थ आपल्याला ' सर्वही सज्जनाचेनि योगे ' या शब्दांनी सांगत आहेत. व्यवहारातील एखादी गोष्ट समजण्यासाठी आपल्याला तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे लागते. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन महत्त्वाचे असते. परमार्थ मार्गावरील अनुभवी व्यक्ती म्हणजे संत. त्यांच्या चरणी विनम्र होऊन त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. त्यांचा सहवास लाभेल अशा प्रयत्नात असावे. सद्गुरुंकडून केवळ अनुग्रह घेतला म्हणजे झाले असे होत नाही. त्यासाठी त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालावे लागते. हा मार्ग खडतर पण श्रेयस्कर असतो. आपले अंतिम हित करणारा असतो.
सद्गुरुंच्या सहवासात अभिमान, मीपण गळून पडते. मनातील संशय नाहीसे होतात. परमेश्वरावर अनुराग म्हणजे प्रेम जडते. परमेश्वर ज्ञान किंवा भक्तीने प्राप्त होऊ शकतो पण त्यामध्ये प्रेम हवे, अनुराग हवा. सर्वोपचारांनी परमेश्वराची पूजा केली पण त्यात जर प्रेम किंवा जिव्हाळा नसेल तर ती पूजा म्हणजे केवळ एक उपचार ठरतो. परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्यामध्ये अनुकूल असा बदल संतांच्या सहवासाने घडून येतो. कारण संतांना आपल्या कल्याणाचा अपार कळवळा असतो. संतांबद्दल बोलताना पसायदानात ज्ञानेश्वर माउली म्हणतात, " चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वाही सदा सज्जन । सोयरे होतु ।।
स्वसंवाद
१. शास्त्रज्ञांप्रमाणे किंवा विद्यार्थ्यांप्रमाणे, मी माझ्या अध्यात्मिक वाटचालीत आणि आत्मशोधात अपयशाने खचून न जाता 'निश्चयपूर्वक' प्रयत्न चालू ठेवतो का?
२. माझे मन वारंवार भलतीकडे भटकत असताना, मी संतांच्या विचारांचा आणि ग्रंथांचा सराव करून मनाला रोज पुन्हा पुन्हा सोप्या भाषेत 'बोध' करतो का?
३. मी ईश्वरभक्ती किंवा साधना केवळ एक कोरडा नियम/उपचार म्हणून करतो, की त्यामध्ये संतांनी सांगितलेला खरा 'अनुराग' (निस्सीम प्रेम व जिव्हाळा) असतो?
४. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात सांगितल्याप्रमाणे, संतांच्या आणि सत्पुरुषांच्या सहवासात राहून माझ्या मनातील अहंकार, संशय आणि मीपणा विरघळवण्याचा मी प्रयत्न करतो का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
४/८/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा