मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १६६

उगवतीचे रंग

​मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १६६ 

अहंकार विस्तारला या देह्याचा ।

स्त्रियापुत्रमित्रादिके मोह त्यांचा ।

बळे भ्रांति हे जन्मचिंता हरावी ।

सदा संगती सज्जनाची धरावी ।।१६६।।

अर्थ : देहाच्या  अहंकाराचा आणि मीपणाचा विस्तार होऊन मनुष्य आपली पत्नी, मुलेबाळे, मित्र, नातेवाईक यांच्या मोहात अडकतो. पण अज्ञानामुळे झालेली ही भ्रांती म्हणजे गैरसमज आहे. तो प्रयत्नपूर्वक नाहीसा करून पुन्हा पुन्हा जन्माला येण्याची चिंता दूर करावी. यासाठी आत्मबुद्धी स्थिर झालेल्या संतांची संगत करावी. 

( विस्तारला - व्यापला/पसरला, मोह- अज्ञानातून निर्माण झालेली आसक्ती, भ्रांती - गैरसमज )

विवेचन 

देहबुद्धी आणि अहंकार या दोन गोष्टींवर समर्थ या श्लोकातून पुन्हा भाष्य करीत आहेत. यापूर्वीच्या श्लोकांमधून हा विषय येऊन गेलेला असला तरी आत्महिताच्या गोष्टी पुन्हा पुन्हा मनावर बिंबवाव्या लागतात. म्हणून पुनरुक्तीचा दोष पत्करूनही समर्थ वेगवेगळ्या शब्दात याबद्दल आपल्याला सांगत आहेत. मायेच्या प्रभावामुळे माणूस स्वतःला ओळखत नाही. मी म्हणजेच देह अशी त्याची पक्की समजूत असते. या मीपणातूनच अहंकाराची निर्मिती होते. हा मीपणा इतका वाढतो की पत्नी, मुलेबाळे, नातेवाईक, मित्र यांचा मोह पडतो. ते आपलेच वाटू लागतात. अज्ञानामुळे ही भ्रांती निर्माण होते. त्यांच्यासाठी आयुष्यभर संपत्तीची जमवाजमव, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे, त्यांची सुखदुःखे आपलीच मानणे या सर्व गोष्टी नैसर्गिकरित्या घडत जातात. अर्थातच या सर्व गोष्टी देहाच्या आसक्तीमुळे निर्माण होतात. 

पण एकवेळ कधीतरी अशी येते की आपले कोणी नाही हे लक्षात येते. त्यावेळी डोळे उघडतात.  प्रसिद्ध कवी ग. दि. माडगूळकर आपल्या एका कवितेत म्हणतात -

लळा-जिव्हाळा शब्दच खोटे, माश्या मासा खाई

 कुणी कुणाचे नाही राजा कुणी कुणाचे नाही 

पिसे तनसडी काड्या जमवी चिमणी बांधी कोटे 

दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे

 बळावता बळ पंखामधले पिल्लू उडुनी जाई 

रक्तही जेथे सूड साधते तेथे कसली माया? 

कोण कुणाची बहीण भाऊ पती पुत्र वा जाया 

सांगायाची नाती सगळी जो तो अपुले पाही.

पण हे सगळे फार उशिरा कळते. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. म्हणून हे सगळे माझे आहेत हा भ्रम नाहीसा होणे आवश्यक आहे. तो प्रयत्नपूर्वक अभ्यासाने दूर करायला हवा. स्वतःचे खरे स्वरूप समजून घ्यायला हवे. त्यासाठी संतच आपल्याला मदत करू शकतात. म्हणून संतांची संगत करावी असे समर्थ सांगतात. 

स्वसंवाद 

१. देहाच्या आणि नात्यांच्या अहंकारात अडकून मी संसारालाच माझे सर्वस्व मानतो, की या नश्वर बंधनांपलीकडच्या आत्मस्वरूपाचा विचार करतो ?

२. गदिमांच्या गीताप्रमाणे, संसारातील नाती शेवटी देहापुरतीच मर्यादित आहेत याचे भान ठेवून मी अनासक्त (अलिप्त) राहण्याचा सराव करतो का?

३. नात्यांमधील मोहाची ही 'भ्रांती' दूर करण्यासाठी आणि जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवण्यासाठी मी संतविचारांचा आधार घेतो का?

४. संसाराचा पश्चात्ताप आयुष्याच्या शेवटी होण्याआधीच, वेळीच सावध होऊन संतांच्या शिकवणीनुसार आचरण करण्याची माझी तयारी आहे का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

२१/८/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...