मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १६२

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १६२ 

अहंतागुणे नीति सांडी विवेकी ।

अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी ।

परी अंतरी सर्व ही साक्ष देते ।

प्रमाणांतरे बुद्धि सांडूनि जाते ।।१६२।।

अर्थ : अहंकाराच्या प्रभावामुळे विवेकी माणूस देखील नीतीचा मार्ग सोडून देतो. तरीदेखील अनीतीच्या जोरावर तो  सर्व लोकात वाहवा मिळवतो. पण असे असले तरी त्याचे मन त्याला आपण खरे कसे आहोत याची साक्ष देतेच. नीतीच्या मार्गाने वागावे हे जे शास्त्रात म्हटले आहे, त्याकडे दुर्लक्ष करून त्याची बुद्धी अनीतीच्या मार्गाकडे वळते. 

( विवेकी - विचारी माणूस, अनीतीबळे - अनीतीच्या जोरावर, श्लाघ्यता - स्तुती/वाहवा, लोकी - जनमानसात, अंतरी - मनात, साक्ष देणे - खरे काय आहे ते सांगणे, प्रमाणांतरे - नीती नियम/शास्त्राधार )

विवेचन 

अहंकारामुळे माणसाचे कसे नुकसान होते ते सांगणारा या पाच श्लोकांच्या मालिकेतील हा अंतिम श्लोक. ज्ञात इतिहासाचा कोणताही कालखंड पाहिला तरी समाजात सज्जन विचारांची माणसे आणि दुर्जन यांचे मिश्रण आढळून येते. भलेही प्रमाण कमी जास्त असेल. समर्थ ज्या काळात वावरले तो काळ म्हणजे साधारण साडेतीनशे वर्षांपूर्वीचा काळ होता. या काळात भ्रष्ट लोकांचे प्रमाण वाढले होते. हे महाभारत काळातही आपल्याला आढळते. सज्जन माणसेही होतीच पण त्यांचे प्रमाण कमी होते. आणि आजच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर मोजकीच सज्जन आणि प्रामाणिक माणसे आणि भ्रष्ट माणसे मात्र मोठ्या प्रमाणावर आहेत. अशा काळात सज्जनांचे जगणे कठीण होऊन बसते. 

भ्रष्टाचारालाच शिष्टाचार मानणारी माणसे ज्या समाजात मोठ्या प्रमाणात असतात, त्या समाजातील सज्जन व्यक्तीदेखील बऱ्याचदा सदाचाराचा मार्ग सोडून भ्रष्ट मार्गाचा अवलंब करतात. सगळेच असे करतात तर मी का करू नये असे समर्थन करून ते स्वतःच्या अनीतीच्या मार्गाची भलावण करतात. थोडक्यात म्हणजे नीतीचा मार्ग त्यांनी सोडून दिलेला असतो. परंतु माणसाचे मन सर्वसाक्षी असते. आपण करतो ते चांगले की वाईट याची साक्ष त्याचे मनच त्याला देत असते. काही माणसे आपल्या मनाचा किंवा आतील आवाज ऐकतात आणि पुन्हा सदाचाराचा मार्ग अवलंबतात.

परंतु ज्यांची मने कोडगी झाली आहेत अशी माणसे आपल्या मनाचा आवाज ऐकत नाहीत. ते भ्रष्टाचाराचा मार्ग सुरूच ठेवतात. आज आपल्या आजूबाजूला पाहिले तर असे दिसते की बरेच शासकीय अधिकारी, नेते, व्यापारी, बिल्डर्स आदी मंडळी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून अमाप संपत्ती कमावतात. त्यांच्याकडे सत्ता आणि पैसा असल्याने समाजात ते उजळ माथ्याने मिरवतात. समाजही त्यांच्या गैरकृत्यांकडे दुर्लक्ष करून त्यांची वाहवा करतो. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जाणारे नेते सुटून बाहेर आले की त्यांचे चेले त्यांचा जयजयकार करतात. हे सगळे समाजाच्या अधोगतीचे लक्षण आहे. 

अनीतीने वागणाऱ्यांना त्यांचे मन सांगत असते की तू हे जे काही करतोस ते बरोबर नाही. लोकांना तू फसवू शकशील पण स्वतःला नाही फसवू शकत. पण ही मंडळी एवढी निर्ढावलेली असते की आपली सद्सद्विवेकबुद्धी काय सांगते याकडे ते दुर्लक्ष करतात. नीतिधर्माने आपल्याकडे कसे वागावे हे सांगितले आहे. पण त्या गोष्टी ते धुडकावून लावतात. तुकाराम महाराज म्हणतात, " जोडोनियां धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. " चांगल्या, योग्य मार्गानेच धन कमवावे आणि त्याचा लोभ न बाळगता सर्वांच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग करावा. पण संतांचा हा उपदेश आम्ही सोयीस्करपणे विसरतो आणि वर आणखी आपण जे काही करतो ते योग्य कसे आहे याचे स्पष्टीकरण देत फिरतो. हे सगळे अहंकारापायी होते. म्हणून अहंकाराला आपल्या अंतःकरणात थारा देऊ नये असे समर्थ सांगतात. 

स्वसंवाद 

१. समाज काय करतो किंवा बाकीचे कसे वागतात याच्या आहारी जाऊन, मी माझ्या स्वतःच्या सदाचाराचा आणि नीतीचा मार्ग तर सोडत नाही ना?

२. समाजात अनीतीने वागणाऱ्यांची मिळणारी तात्पुरती वाहवा आणि प्रतिष्ठा पाहून, माझे मन भ्रष्ट मार्गाकडे आकर्षित तर होत नाही ना?

३. तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे ("जोडोनियां धन उत्तम व्यवहारे"), माझी उपजीविका आणि संपत्ती मिळवण्याचे मार्ग पूर्णपणे प्रामाणिक व नैतिक आहेत का?

४. एखादी अयोग्य कृती करताना माझ्या अंतर्मनाने दिलेली 'साक्ष' (मनाचा आतील आवाज) मी ऐकतो, की अहंकारापायी त्याकडे दुर्लक्ष करतो?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१९/८/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...