मुख्य सामग्रीवर वगळा

नात्यांचं महावस्त्र – भाग नऊ : काका

 उगवतीचे रंग

नात्यांचं महावस्त्र – भाग नऊ : काका ( कुटुंबाचा भक्कम आधारस्तंभ )

'नात्यांचं महावस्त्र' या लेखमालेचे आतापर्यंत आठ भाग झाले आहेत. त्यात पहिली सुरुवात अर्थातच विश्वातील सर्वात महत्त्वाचे नाते म्हणजे आईपासून झाली. नंतर क्रमाक्रमाने बाबा, आजी, आजोबा, मामा, मावशी आणि आत्या या नात्यांचा विस्तार आपण पाहिला. हे सगळे नात्यांचे एकेक रेशमी पदर आहेत. ते उलगडण्याचा आणि त्यांची झळाळी दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. असाच एक समृद्ध पदर म्हणजे काका. त्यांच्याबद्दलच आज जाणून घेऊ या.

'काका' म्हटलं की वडिलांसारखीच माया करणारी एक प्रेमळ व्यक्ती डोळ्यांसमोर येते. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. घरात अनेक माणसे असत. त्यात वडील, काका आदी मायेची माणसे एकत्र असत. एकत्र शेती करणे, व्यवसाय करणे, आई-वडिलांकडे लक्ष देणे या गोष्टी ते आपुलकीने करीत असत. कधी आवश्यकतेनुसार एखादा भाऊ नोकरीनिमित्त शहरात गेला, तर दुसरा भाऊ शेती किंवा व्यवसाय सांभाळत असे; पण त्यांच्या प्रेमात कधी अंतर पडत नव्हतं. अशा वेळी काकांचं हे नातं रक्ताच्या पलीकडे जाऊन प्रेम, कर्तव्य आणि माणुसकी यांचं सुंदर प्रतीक बनतं. अशी नाती कुटुंबाला समृद्ध बनवतात.

आमची गावाकडे थोडीशी शेती होती. माझे वडील त्यांची शहरातील नोकरी सोडून शेती करण्यासाठी गावाकडे आले आणि तेथेच स्थायिक झाले. माझे दोन्ही काका नोकरीनिमित्त शहरात होते. एक काका मोठे आणि दुसरे लहान; माझे वडील मधले. काका कधी कधी सुट्टी मिळाली की गावी येत असत. काका आले की आम्हाला कोण आनंद व्हायचा! मग काकांबरोबर दोन-चार दिवस मजा असायची. कधी सुट्टीत काकांकडे राहायलाही जायचो.

काकांच्या प्रेमाचे अनेक प्रसंग आजही आठवतात. त्यांनी शहरात राहूनही खेड्यात राहणाऱ्या आणि शेतीत राबणाऱ्या माझ्या वडिलांना वेळोवेळी मदत केली. कारण शेती थोडी असल्याने फार पैसा पदरात पडत नव्हता. कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ! पीक चांगले आले तर बाजारात भाव पडलेले असायचे. अशा वेळी काका पैसे पाठवून मदतीचा हात देत. एकदा तर माझे वडील खूप आजारी झाले होते. आमचं गाव म्हणजे एक छोटं खेडं असल्याने वैद्यकीय उपचारांची सोय नव्हती. तेव्हा काका गावी येऊन वडिलांना आपल्या सोबत घेऊन गेले. त्यांना चांगल्या दवाखान्यात दाखल केले, त्यांची शुश्रूषा केली. असे अनेक प्रसंग आहेत. त्यामुळे काका म्हणजे मदतीचा हात, काका म्हणजे प्रेम या गोष्टी मनात पक्क्या झाल्या. पण काकांनी प्रेम लावले तसेच संस्कारही केले, शिस्तही लावली. त्यांच्याजवळून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणून नात्यांच्या महावस्त्रातील अतिशय महत्वाचा असा हा पदर आहे. माझ्या वडिलांनी देखील त्यांच्या पुतण्यांवर जीवापाड प्रेम केलं. त्यांच्या आजारपणात त्यांच्या जवळ राहून सुश्रुषा केली.

मला दोन भाऊ, दोघेही माझ्यापेक्षा लहान. त्यामुळे माझ्या मुलांना लहानपणापासून त्यांचे प्रेम लाभले. त्यामुळे काका म्हणजे त्यांची अतिशय जिव्हाळ्याची व्यक्ती. घरात कुठलेही कार्य असो, काका सगळ्या प्रसंगात खंबीरपणे उभे राहायचे. एखादी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली की मी निश्चिंत असायचो. सायकल शिकवणारे, पहिल्यांदा पोहायला घेऊन जाणारे, जत्रेत फिरवणारे किंवा छोटीशी चूकही समजावून सांगणारे काका माझ्या मुलांच्या बालपणाच्या आठवणींचं केंद्र आहेत. माझी मुलगी जेव्हा जीवावरच्या आजारातून उठली, तेव्हा या दोन्ही भावांच्या डोळ्यातील पाणी मी पाहिले आहे. तिच्या लग्नात माझ्यासारखेच पाणी या दोघांच्या डोळ्यांत तिला सासरी पाठवताना होते. अशा वेळी नात्याची खोली, उबदारपणा आणि महत्त्व जाणवते.

अनेक भारतीय कुटुंबांत काकाला वडिलांप्रमाणेच आदराचे स्थान दिले जाते. काका हे केवळ नातं नसतं, तर ती कुटुंबाची एक भक्कम ढाल असते. दुर्दैवाने ऐनवेळी कुटुंबातील कर्ता पुरुष म्हणजे मुलांचे वडील जग सोडून गेले, तर विस्कटलेल्या घराला सावरणारे आणि वडिलांची जागा घेऊन पुतण्या-पुतणीचा स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळ करणारे अनेक काका आपण समाजात पाहिले आहेत. मुलांचे शिक्षण, त्यांचे संस्कार आणि त्यांच्या पायावर उभे राहीपर्यंत स्वतःचे सुख बाजूला ठेवून कर्तव्य निभावणारे काका हे ' पितृतुल्य ' असण्याचे खरेखुरे प्रमाण असतात.

आपल्या संस्कृतीत 'काका' हे संबोधन रक्ताच्या नात्यापलीकडेही आदराने दिलं गेलं आहे. एखाद्या अनोळखी आणि वयस्कर व्यक्तीला आपण ' काका ' म्हणून प्रेमाने आणि आदराने हाक मारू शकतो. मग ती व्यक्ती देखील आपल्याशी आपुलकीने बोलते आणि त्या अनोळखी व्यक्तीशी आपला सहज संबंध प्रस्थापित होतो.

समाजासाठी आणि राष्ट्रासाठी झटणाऱ्या थोर व्यक्तींना समाजाने प्रेमाने 'काका' किंवा 'काकासाहेब' म्हणून गौरवले आहे. वारकरी संप्रदायातील थोर संत गोरोबा कुंभार यांना आपण आदराने 'गोरोबा काका' म्हणतो, तर संपूर्ण जीवन समाजासाठी अर्पण करून स्वदेशीचा पुरस्कार करणारे गणेश वासुदेव जोशी 'सार्वजनिक काका' म्हणून ओळखले जातात. थोर गांधीवादी विचारवंत व लेखक काका कालेलकर, स्वातंत्र्यलढ्यातील नेते व साहित्यिक काकासाहेब गाडगीळ, टिळकांचे विश्वासू सहकारी व झुंजार पत्रकार काकासाहेब खाडिलकर, तसेच बालकांवरील प्रेमापोटी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे 'चाचा (काका) नेहरू' म्हणूनच जनमानसात अमर झाले. अगदी आमच्या चाळीसगावमध्येही वैद्यकीय सेवेसोबतच शैक्षणिक कार्य करणारे, अगदी वाघ, सिंहासारख्या वन्य प्राण्यांवर जिवापाड प्रेम करत पुण्याच्या पेशवे पार्कला स्वतः पाळलेली 'सोनाली सिंहीण' देणारे डॉ. वा. ग. पूर्णपात्रे यांनाही सर्वजण आदराने 'काका' म्हणूनच ओळखत असत.

इतिहासात राघोबादादांसारखी क्वचितच काही व्यक्तिमत्त्वे दिसतात ज्यांनी काकाच्या प्रेमळ नात्याला कलंक लावला आहे; पण सांस्कृतिक परंपरेत काका हे प्रेम, संरक्षण आणि कर्तव्याचं प्रतीकच आहे. आपल्या संस्कृतीत काका म्हणजे नेहमीच कुटुंबाचा आधारवड आणि समाजाचा मार्गदर्शक राहिला आहे. आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एकत्र राहणं कमी झालं असलं, तरीही काका या नात्याबद्दलची आत्मीयता, जिव्हाळा आणि आदर तितकाच जिवंत आहे. नात्यांच्या या भरजरी महावस्त्रातील 'काका' नावाचा पदर कुटुंबाला सुरक्षिततेची ऊब, एकतेची ताकद आणि प्रेमाचा आधार देतो. हा पदर जेवढा जपला जाईल, तितकीच आपली नाती अधिक घट्ट, समृद्ध आणि सुंदर होत जातील.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१५/८/२०२६

प्रतिक्रियेसाठी: ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...