उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १५६
म्हणे जाणता तो जनीं मूर्ख पाहे ।
अतर्कासि तर्की असा कोण आहे ।
जनीं मीपणें पाहतां पाहवेना ।
तया लक्षिता वेगळे राहवेना ।।१५६।।
अर्थ : मी परमात्म्याला जाणले आहे असे म्हणणारा मनुष्य जगात मूर्ख असतो. परमात्मा हा तर्काच्या पलीकडे असल्याने त्याला कोणी तर्काने जाणू शकत नाही. मीपणाने पाहायला गेले तर तो दिसत नाही. जो त्याला पाहतो तो त्यापासून वेगळा राहूच शकत नाही.
( अतर्कासि - तर्काच्या पलीकडे असणारा, पाहवेना - पाहता येत नाही, लक्षिता - पाहिल्यावर/अनुभवल्यावर )
विवेचन
या श्लोकात समर्थ परब्रह्माचे स्वरूप वर्णन करतात. परब्रह्म ही अशी गोष्ट आहे की जेव्हा एखादा साधक ते पाहतो तेव्हा तो वेगळा असा उरतच नाही. पण या जगात अशीही काही माणसे आहेत की ती मी परब्रह्म पाहिल्याचा दावा करतात. समर्थ अशा माणसांची गणना मूर्खांत करतात. परमेश्वर किंवा परमात्मा हा तर्काच्या पलीकडे आहे. याचा अर्थ असा की बुद्धीच्या साहाय्याने, तर्काच्या साहाय्याने त्याला जाणता येत नाही. या भौतिक जगातील वस्तूंविषयी आपण तर्क करू शकतो. तर्काने काही गोष्टी जाणता येतात. अनेक शास्त्रे तर्कावरच आधारित आहेत. पण जिथे परमेश्वराबद्दल वेद ' नेति नेति ' म्हणतात तिथे आपली तर्कबुद्धी उपयोगाची ठरत नाही. त्याचप्रमाणे मीपणाने पाहू म्हटले तर त्याला पाहता येत नाही. मीपणा जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत त्याच्यापर्यंत पोचणे अशक्य. आणि हे परमात्म तत्त्व असे आहे की जो त्याला पाहतो तो वेगळा राहूच शकत नाही.
यातील काही गोष्टी नीट समजून घेऊ या. मी परमेश्वर किंवा परब्रह्म पाहिल्याचा दावा काही जण करतात. ते स्वतःला साधुसंत म्हणवून घेतात. अशा अनेक बुवा, बाबांचे पीक समाजात येते. सुशिक्षित लोक देखील त्यांच्या दिखाव्याला भुलून त्यांच्या मागे जातात. पण अशा लोकांच्या नादी लागल्याने शेवटी पश्चातापच हाती येतो. याची अनेक उदाहरणे सध्या आपल्याला बातम्यांमधून पाहायला मिळतात. समर्थांनी अशा लोकांवर सरळ प्रहार केला आहे. परमेश्वर पाहिला किंवा परब्रह्म पाहिले असे सांगणारे लोक मूर्ख आहेत असे समर्थ म्हणतात. समर्थांसारख्या संतांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगून ठेवलेले सत्य अजूनही आमच्या गळी उतरत नाही हे आमचे केवढे दुर्दैव !
आपण या दृश्य अशा जगात जन्मलो. दृश्य जगत आपल्याला खरे वाटते. त्यातील ज्या गोष्टींचे आपल्याला कुतूहल वाटते, त्या आपण देहाच्या साहाय्याने, तर्काच्या साहाय्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु परब्रह्म तत्त्व हे तर्काच्या पलीकडे आहे. त्यामुळे ते तर्काने किंवा बुद्धीच्या साहाय्याने जाणता येत नाही. ' जाणीव नेणीव भगवंती नाही ' या अभंगात ज्ञानेश्वर माउली म्हणतात,"तेथील प्रमाण नेणवे वेदांसी । ते जीवजंतूंसि केंवि कळे ।।"
बाह्य जगतातील वस्तू पाहणारा आपल्या समोर जेव्हा एखादी वस्तू पाहतो, तेव्हा ती वस्तू आणि तो वेगळा असतो. त्या वस्तूशी तो एकरूप होऊ शकत नाही. जेव्हा आपण परमेश्वराला पाहतो किंवा पाहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आत्मा देहापासून वेगळा होऊन परमात्म्याशी एकरूप होतो. परमेश्वराला पाहणे म्हणजे त्याच्याशी एकरूप होऊन जाणे. मग पाहणारा वेगळा उरतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात,' देव पाहावयासी गेलो, तेथे देवची होऊनि ठेलो " म्हणून समर्थ म्हणतात," तया लक्षिता वेगळे राहवेना." पण जोपर्यंत ' मीपणाची जाणीव ' शिल्लक उरते, तोपर्यंत अज्ञानच असते. हा मीपणा नाहीसा होऊन ' तो तूच आहेस ' अशा प्रकारची परमात्म्याकडे पाहण्याची दिव्य दृष्टी केवळ संतच देऊ शकतात. आपण गुरुदत्ताची आरती करतो तेव्हा," मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनीं श्रीदत्त ध्यान ' असे म्हणतो. ही ' मी तू पणाची ' बोळवण होण्यासाठी साधना, विवेक आणि वैराग्य या त्रयीचा मार्ग अनुसरावा लागतो. हरिनामाचा सतत जप करणे आणि संतांना शरण जाणे हाच त्यावरील उपाय आहे.
स्वसंवाद
१. मी स्वतःला फार ज्ञानी समजून "मला देव कळला आहे" अशा सूक्ष्म अहंकारात किंवा भ्रमात तर जगत नाही ना?
२. समाजात अध्यात्माचा आव आणणाऱ्या आणि 'ईश्वर पाहिल्याचा' खोटा दावा करणाऱ्या बाह्य अवडंबराला मी भुलून जात नाही ना?
३. संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ("तेथे देवची होऊनि ठेलो"), ईश्वराला जाणण्यासाठी माझा 'मीपणा' विरघळवून त्याच्याशी एकरूप होण्याची माझी तयारी आहे का?
४. तर्काच्या आणि कोरड्या बुद्धीच्या पलीकडे जाऊन, संतांनी दाखवलेला साधना, विवेक आणि वैराग्याचा मार्ग आचरणात आणण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१४/८/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा