उगवतीचे रंग
अपराजित योद्धा : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे
इतिहासाच्या पानांवर काही व्यक्तींची नावे वाचली की मनात आदराचे स्थान निर्माण होते; काहींच्या कर्तृत्वाने अभिमानाची भावना जागी होते; तर काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांच्याविषयी वाचताना आपल्याला स्वतःच्या क्षमतांचा आणि मर्यादांचा नव्याने विचार करावासा वाटतो. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे याच तिसऱ्या प्रकारात मोडणारे असामान्य व्यक्तिमत्त्व!
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची भक्कम मुहूर्तमेढ रोवली आणि धर्मवीर छत्रपती संभाजीराजांनी आपल्या बलिदानाने स्वराज्याची अस्मिता जिवंत ठेवली. त्या महान परंपरेनंतर मराठ्यांच्या मनात आत्मविश्वासाचे प्राण फुंकणारा, स्वराज्याचा विस्तार महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून उत्तर हिंदुस्थानापर्यंत नेणारा आणि दिल्लीच्या तख्ताच्या दाराशी मराठ्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारा रणधुरंधर म्हणजेच श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे.
बाळाजी विश्वनाथ जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या भेटीसाठी गेले, तेव्हा त्यांनी बाजीरावांनाही आपल्या सोबत नेले होते. त्या वेळी बाजीरावांचे वय होते अवघे एकोणीस वर्षे. पण इतक्या कमी वयातही त्यांची राजकारणाची जाण, परिस्थितीचे आकलन आणि भविष्यातील संधी ओळखण्याची दृष्टी विलक्षण होती. उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेचा विस्तार करता येईल का, त्यासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत, कोणती परिस्थिती मराठ्यांच्या बाजूने आहे, याचा अंदाज त्या कोवळ्या वयातही या तरुणाने घेतला होता.
नेता जन्माला यावा लागतो तो असा ! नेतृत्वाचे गुण बाजीरावांच्या अंगी मुळातच होते. पुढे परिस्थितीच्या निरीक्षणातून, अनुभवातून आणि सततच्या संघर्षातून त्या गुणांना अधिकाधिक पैलू पडत गेले.
१८ ऑगस्ट १७०० रोजी जन्मलेला हा तरुण पुढे अवघ्या वीस वर्षांचा असताना आपल्या कर्तृत्वाने पेशवेपदावर आरूढ झाला. १७२० ते १७४० या जवळजवळ वीस वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचे मुख्य प्रधान म्हणून जबाबदारी सांभाळली.
अनेक अनुभवी सरदार आणि मुत्सद्दी असताना एका वीस वर्षांच्या तरुणाच्या खांद्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवणे ही साधी गोष्ट नव्हती. पण शाहू महाराजांना या तरुणाच्या कर्तृत्वावर विश्वास होता. बाजीराव या पदाला न्याय देऊ शकतील, याची त्यांना खात्री होती.
आजच्या काळात वयाच्या विसाव्या वर्षी फारसा अनुभव गाठीशी नसताना एखाद्या तरुणावर अशी एखादी मोठी जबाबदारी सोपवली तर आपण क्षणभर थबकू. त्या काळात मराठा साम्राज्याची पेशवाई म्हणजे केवळ सन्मानाचे पद नव्हते; ती होती संकटांची, राजकीय संघर्षांची आणि युद्धांची धगधगती मशाल. ही मशाल बाजीरावांनी आपल्या कोवळ्या खांद्यावर घेतली आणि संकटांना पाहून ते कधीही मागे सरकले नाहीत. उलट त्यांनी त्या आगीचेच तेज केले!
बाजीरावाच्या भोवतीचे वलय इतके मोठे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला की एकामागून एक अनेक पदर उलगडत जातात. घाटातून जाताना एक डोंगररांग बाजूला झाली की तिच्या पलीकडे लगेच दुसरी डोंगररांग दिसते ना, अगदी तसे!
बाजीराव अस्सल शिपाईगडी होता. पण तो केवळ तलवार चालवणारा योद्धा नव्हता. त्याच्याजवळ राजकारणाची जाण होती, माणसांची पारख होती, परिस्थितीचा अचूक अंदाज होता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उद्याचा दिवस आजच पाहण्याची दृष्टी होती.
आजच्या भाषेत आपण त्याला व्हिजन म्हणतो. त्याच्याकडे ती होती. म्हणूनच पेशवेपद मिळाल्यानंतर त्यांनी केवळ लढाया केल्या नाहीत; तर मराठा सामर्थ्याचा विस्तार करण्याची एक व्यापक दिशा निश्चित केली.
त्यांच्या यशाची मला तीन सूत्रे दिसतात. अचूक योजना, योग्य माणसांची निवड आणि विद्युतगतीच्या हालचाली. योजना अशी असायची की शत्रूला आपण काय करणार आहोत हे समजण्याआधीच ती प्रत्यक्षात आलेली असे. माणसे अशी की स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून न राहता योग्य व्यक्तींना संधी देऊन त्यांच्याकडून सामर्थ्य उभे करायचे. आणि हालचाल अशी की शत्रूने तलवार उपसावी तोपर्यंत बाजीराव कुठे आहेत, हेच त्याला कळू नये !
त्यांच्या युद्धपद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे शत्रूच्या बलाढ्य बाजूवर थेट आघात न करता त्याची दुर्बल बाजू शोधून त्यावर प्रहार करणे. पालखेडची मोहीम याचे अद्भुत उदाहरण.
निजामाकडे मोठे सैन्य, तोफा आणि भरपूर साधनसामग्री होती. बाजीरावांकडे तुलनेने हलके आणि वेगवान घोडदळ. पण युद्ध म्हणजे केवळ सैन्याची संख्या आणि शस्त्रास्त्रांची ताकद यांचा हिशेब नसतो; शत्रूला कुठे आणि कधी लढायला भाग पाडायचे, हा खरा प्रश्न असतो.
बाजीरावांनी तो प्रश्न सोडवला. त्यांनी निजामाच्या सैन्याला आपल्या मनाप्रमाणे फिरवले, त्याच्या हालचालींना गोंधळात टाकले, त्याच्या पुरवठ्याच्या मार्गांवर परिणाम केला आणि अखेरीस पालखेड येथे त्याला अशा परिस्थितीत आणले की निजामाला तह स्वीकारावा लागला. युद्धकलेच्या दृष्टीने पालखेडच्या मोहिमेचे महत्त्व एवढे मोठे आहे की ब्रिटिश फील्ड मार्शल बर्नार्ड मॉन्टगोमेरी यांनी तिचे वर्णन “A masterpiece of strategic mobility” असे केले आहे.
किती विलक्षण गोष्ट आहे! शत्रूला हरवण्यासाठी नेहमी त्याच्यावर तलवार चालवावीच लागते असे नाही; कधी कधी त्याला आपल्या हर प्रकारे आपल्या टप्प्यात आणणे हाच एक प्रकारचा विजय असतो. बाजीराव हे जाणत होते. त्यांनी जिथे लढाई जिंकण्याची शक्यता कमी होती, तिथे हट्टाने लढाई स्वीकारली नाही. युद्धभूमीची निवडसुद्धा त्यांच्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग होती.
शत्रूच्या सामर्थ्याशी भिडण्यापेक्षा त्याच्या दुर्बलतेवर प्रहार करायचा, हा त्यांच्या युद्धविचाराचा गाभा होता. म्हणूनच त्यांच्या तलवारीपेक्षा त्यांची बुद्धी अधिक वेगवान होती!
माळवा, धार, औरंगाबाद, पालखेड, गुजरात, उदयपूर, दिल्ली, भोपाळ... बाजीरावांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज महाराष्ट्रापुरता राहिला नाही. तो उत्तर हिंदुस्थानात घुमू लागला.
१७३७ मध्ये तर मराठ्यांनी थेट दिल्लीच्या दिशेने धडक मारली. मुघल साम्राज्याच्या राजधानीपर्यंत मराठा सैन्याने केलेली ही झपाट्याची स्वारी त्या काळच्या राजकारणाला हादरा देणारी होती. दिल्ली ! ज्या तख्ताकडे पाहून अनेक राजे थरथरत होते, त्या तख्ताच्या दारापर्यंत मराठ्यांचे घोडदळ पोहोचले. ही केवळ लष्करी कामगिरी नव्हती. ती होती मानसिक विजयाची घोषणा. मराठे आता केवळ सह्याद्रीच्या डोंगरकपारीतील योद्धे राहिलेले नाहीत; ते हिंदुस्थानच्या राजकारणातील निर्णायक शक्ती आहेत, हा संदेश या धडकेने सर्वदूर पोहोचला.
बाजीरावांच्या आयुष्यातील आणखी एक मोठा पैलू म्हणजे माणसे जोडण्याची त्यांची विलक्षण हातोटी. स्वतःच्या शौर्यावर विसंबून राहणारा नेता एकटा मोठा होऊ शकतो; पण साम्राज्य मोठे करण्यासाठी त्याला इतरांच्या सामर्थ्याची ओळख असावी लागते. मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, पवार, गायकवाड, फत्तेसिंह भोसले आणि चिमाजीअप्पा अशा अनेक कर्तबगार हातांना योग्य वेळी योग्य काम देत बाजीरावांनी मराठा सामर्थ्याचा विस्तार केला.
माणसाची जात-पात न पाहता त्याच्यातील कर्तृत्व ओळखण्याची त्यांची दृष्टी होती. ज्याच्यात शौर्य, निष्ठा आणि नेतृत्वगुण आहेत, त्याला संधी देण्याची त्यांची हातोटी होती. त्यामुळे विविध समाजघटकांतील कर्तबगार माणसांना मराठा सत्तेच्या विस्तारात सहभागी करून घेता आले.
समर्थ रामदासांनी “सलगी देणे” या शब्दांत माणसे जोडण्याचे जे तत्त्व सांगितले, त्याचे एक राजकीय-लष्करी रूप बाजीरावांच्या नेतृत्वात दिसते.
त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या प्रतिनिधीनेही बाजीरावाच्या या सामर्थ्याची कबुली दिली होती—पेशवे आपल्या फौजांचे मनसुबे करतात, म्हणून त्यांचे नाव लौकिक आहे आणि फौजही त्यांच्या पदरी आहे; आपण मात्र घरी बसलो, अशी त्या आशयाची त्याची खंत होती.
काय सांगावे! दुसऱ्याच्या सामर्थ्याची कबुली शत्रूच्या तोंडून मिळणे, याहून मोठे प्रमाणपत्र कोणते?
बाजीरावांचा आणखी एक गुण म्हणजे त्यांचा कृतीप्रधान स्वभाव.
महादोबा पुरंदरे यांनी शाहू महाराजांशी बोलताना म्हटलेले वाक्य किती बोलके आहे—
“आमच्या खावंदांचा दंडक—करावे फार आणि बोलावे थोडे...”
किती मोठे नेतृत्वसूत्र आहे हे!
आज आपण कृतीपेक्षा तिची चर्चा अधिक करतो. योजना करण्यापूर्वी बैठक, बैठकीपूर्वी अजेंडा, अजेंड्यानंतर समिती आणि समितीनंतर पुन्हा बैठक! बाजीरावांच्या काळात मात्र करावे फार आणि बोलावे थोडे हे सूत्र होते !त्यांच्या कर्तृत्वाला जाहिरातीची गरज नव्हती. कारण पराक्रमाला स्वतःचा आवाज असतो.
त्यांची जरब कशी होती, याचे एक उदाहरण बाणकोटच्या सुभानजी शिंदे यांच्या संदर्भातील पत्रातून दिसते. काम अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे लक्षात येताच बाजीरावांनी त्यांना अक्षरशः खरडपट्टी काढली. पत्रातील भाषेची तीव्रता पाहिली की त्या काळच्या पेशव्याची आपल्या अधिकाऱ्यांकडून असलेली अपेक्षा आणि कामाबद्दलची कठोर शिस्त जाणवते.
“सिपायेगिरी कैशास करिता?”
हा प्रश्न केवळ सुभानजींना नव्हता. तो प्रत्येक जबाबदारी स्वीकारणाऱ्या माणसाला विचारता येईल असा प्रश्न आहे.
जबाबदारी घेतली आहे तर काम झाले पाहिजे. नाहीतर पद कशासाठी? हीच बाजीरावांची कार्यसंस्कृती होती. पण या कठोरतेच्या मागे गर्व नव्हता. अहंकार नव्हता. स्वतःच्या पराक्रमाचा डंका पिटण्याची वृत्ती नव्हती. खरा योद्धा आपल्या तलवारीचे वजन स्वतः सांगत फिरत नाही. त्याच्या तलवारीने इतिहास बोलतो.
बाजीरावांच्या बाबतीतही तसेच झाले. बाजीरावांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे बुंदेलखंडातील राजा छत्रसाल बुंदेला यांना दिलेली मदत. वृद्ध छत्रसाल मोहम्मद खान बंगशच्या संकटात सापडले होते. त्यांनी बाजीरावांकडे मदतीची विनंती केली. बाजीरावांनी विलंब न करता आपल्या घोडदळासह बुंदेलखंडाकडे धाव घेतली आणि बंगशच्या सैन्याचा पराभव केला. छत्रसालांनी कृतज्ञतेपोटी बाजीरावांना प्रदेश बहाल केला आणि मस्तानीशी त्यांचा संबंध जोडला गेला. पुढे बाजीराव-मस्तानीचे नाते मराठा इतिहासातील अत्यंत चर्चेचा आणि भावनिक विषय ठरले.
परंतु त्या प्रसंगाकडे केवळ वैयक्तिक नात्याच्या दृष्टीने पाहण्यापेक्षा त्यामागील बाजीरावांची कर्तव्यनिष्ठा, वेगवान निर्णयक्षमता आणि दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
आपल्या सुमारे वीस वर्षांच्या कारकीर्दीत बाजीरावांनी चाळीसहून अधिक लढाया लढल्या आणि एकही लढाई गमावली नाही, अशी त्यांची युद्धकारकीर्द सांगितली जाते. त्यांच्या विजयामागे केवळ तलवारीचे सामर्थ्य नव्हते; त्यामागे होते अचूक नियोजन, वेगवान हालचाल, योग्य वेळेची निवड आणि शत्रूच्या मनोवृत्तीचा अचूक अंदाज.
बाजीरावांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत शिस्तबद्ध, ऋजू आणि कृतीप्रधान होते. उंचपुरे, रुबाबदार व्यक्तिमत्त्व, पिळदार शरीरयष्टी, तेजस्वी कांती आणि साधा पोशाख ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणून वर्णने आढळतात. स्वतःचे काम स्वतः करण्यावर त्यांचा भर असे.
‘करावे फार आणि बोलावे थोडे’ हीच जणू त्यांची कार्यसंस्कृती होती.
बाजीराव आणि त्यांचे धाकटे भाऊ चिमाजीअप्पा यांची जोडी म्हणजे इतिहासातील राम-लक्ष्मणाची जोडी मानली जात असे. बाजीरावांनी उत्तरेत मराठ्यांच्या सामर्थ्याचा विस्तार केला, तर चिमाजीअप्पांनी पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीजांविरुद्ध लढत वसईच्या विजयाचा पराक्रम गाजवला. दोन्ही भावांच्या कर्तृत्वामुळे मराठा सामर्थ्याला उत्तरेपासून पश्चिम किनाऱ्यापर्यंत नवी दिशा मिळाली.
बाजीरावांच्या अकाली निधनानंतर चिमाजीअप्पांच्या पत्रव्यवहारातून मोठ्या भावाविषयीची श्रद्धा, प्रेम आणि वेदना शब्दांतून ओसंडून वाहताना दिसतात. चिमाजीअप्पांच्या शब्दांत मोठ्या भावाविषयीची भावना व्यक्त करताना ते म्हणतात,“करून दाखवावे हे ईश्वरी सामर्थ्य त्यास दिल्हे होते, व करितेच!”
किती विलक्षण श्रद्धा! हा केवळ सेनापती नव्हता; तो आपल्या भावाच्या दृष्टीने असामान्य सामर्थ्य लाभलेला माणूस होता. आणि म्हणूनच बाजीराव गेले तेव्हा केवळ एक पेशवा गेला नाही. एक दिशा देणारा दीप विझला.
सततच्या स्वाऱ्या, लढाया आणि प्रवासामुळे बाजीरावांचे शरीर थकले होते. अखेरीस २८ एप्रिल १७४० रोजी नर्मदा तीरावरील रावेरखेडी येथे, अवघ्या चाळिसाव्या वर्षात, विषमज्वराने या अपराजित योद्ध्याचा जीवनप्रवास संपला. थकलेले शरीर विसावले. कायमचे !
किती विलक्षण नियती! अवघे चाळीस वर्षांचे आयुष्य. पण त्या अल्प आयुष्यात त्यांनी जे केले, ते अनेकांना प्रदीर्घ आयुष्यातही साधता आले नसते.
बाजीराव म्हणजे वेग. बाजीराव म्हणजे धाडस. बाजीराव म्हणजे दूरदृष्टी. बाजीराव म्हणजे माणसांची अचूक निवड. बाजीराव म्हणजे कृती. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बाजीराव म्हणजे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्याचा आत्मविश्वास.
आज त्यांच्या जीवनाकडे पाहताना मला वाटते, बाजीरावांची खरी शिकवण केवळ युद्धभूमीपुरती मर्यादित नाही. आपल्या आयुष्यातही अनेक पालखेड येतात. अनेक निजाम समोर उभे राहतात. अनेक दिल्ली आपल्याला दूर वाटतात. अनेकदा आपल्याकडे साधने कमी असतात, परिस्थिती प्रतिकूल असते, विरोधक बलाढ्य असतात. पण अशा वेळी प्रश्न परिस्थिती किती कठीण आहे हा नसतो. प्रश्न असतो आपली योजना किती अचूक आहे? आपली माणसे किती योग्य आहेत? आणि योग्य वेळी आपण किती वेगाने कृती करतो?
बाजीरावांची कथा याच प्रश्नांची उत्तरे देते. म्हणूनच त्यांच्या नावासोबत ‘अपराजित’ हा शब्द जोडला जातो. कारण त्यांनी केवळ लढाया जिंकल्या नाहीत; त्यांनी परिस्थितीवर मात करण्याची मानसिकता जिंकली.
आणि म्हणूनच...
जोवर मराठा साम्राज्याचा इतिहास पुस्तकांच्या पानांवर जिवंत आहे, जोवर महाराष्ट्राच्या मातीला आपल्या पराक्रमी पूर्वजांची आठवण आहे, जोवर स्वराज्य हा शब्द आपल्या मनात अभिमान जागवतो, तोवर या ‘शहामतपनाह बाजीरावा’च्या कर्तृत्वाचे पोवाडे गायले जातील.
“जीवाची बाजी लावणे” हा वाक्प्रचार आपण सहज वापरतो. पण त्या शब्दांना आपल्या जीवनाने अर्थ देऊन जाणारा हा योद्धा होता.
रावेरखेडीच्या नर्मदातीरावर त्यांचे शरीर विसावले; पण त्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज इतिहासाच्या वाटेवर आजही ऐकू येतो.
तो आवाज सांगतो,"ध्येय मोठे असेल, दृष्टी स्पष्ट असेल, माणसे सोबत असतील आणि कृतीला वेग असेल, तर वय अडथळा ठरत नाही."
अशा या अद्वितीय, अजिंक्य आणि अपराजित योद्ध्याला मानाचा मुजरा!
विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१३/८/२०२६
प्रतिक्रियेसाठी : ९४०३७४९९३२
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा