मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १५५

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १५५

दिसेना जनीं तेचि शोधूनि पाहे ।

बरे पाहता गूज तेथे चि आहे ।

करी घेऊन जाता कदा आडळेना ।

जनीं सर्व कोंदाटलें ते कळेना ।।१५५।।

अर्थ : हे मना, जगामध्ये डोळ्यांना जे सहज दिसत नाही, त्याचा शोध घे. काळजीपूर्वक पाहिले तर तिथेच खरे रहस्य दडलेले आहे. परमात्मा ही अशी गोष्ट आहे की ती हातात घेऊ म्हटले तरी हाती लागत नाही. जगात सर्वत्र तोच भरून राहिला आहे हे कळतही नाही. 

( गूज - रहस्य, आडळेना - हातात येत नाही, कोंदाटलें - सर्वत्र भरून राहिलेला )

विवेचन 

  समर्थ या श्लोकात आपल्याला परमेश्वराचा कसा शोध घ्यावा हे सांगत आहेत. परमेश्वर हा जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी असा सर्वत्र भरून राहिला आहे. पण आपल्याला तो दिसत नाही. आपल्याला पाणी दिसते, ठिकाण किंवा जागा दिसते, लाकूड दिसते, पाषाण म्हणजे दगड दिसतो. पण मग तो परमात्मा आहे कुठे ? तो आहे पण दिसत नाही अशी आपली स्थिती असते. 

जन्माला आल्यापासून आपल्याला आपल्यासमोरील जे जग दिसते ते आपण खरे मानतो. त्याचे कारण म्हणजे आपल्या पंचज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने त्याची अनुभूती घेता येते. वस्तू डोळ्याने दिसते, तिला स्पर्श करतो येतो. फुलासारख्या गोष्टीचा सुगंध अनुभवता येतो. पण जे दिसतच नाही ते कसे अनुभवणार ? पण एक छान तत्त्व किंवा गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आधार कोणतीतरी अदृश्य गोष्ट असते. उदाहरण सांगितले म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपल्याला एखादी इमारत दिसते. पण ती ज्या पायाच्या आधारावर उभी असते, तो पाया आपल्याला दिसत नाही. झाड आपल्याला दिसते पण त्याची खोल गेलेली मुळे आपल्याला दिसत नाही. विजेने प्रकाशित होणारे दिवे दिसतात पण त्यामागील वीज दिसत नाही. या तर रोजच्या अनुभवातील गोष्टी आहेत. 

मग हे एवढे विश्व आपल्याला दिसते, त्याच्यामागे सुद्धा कोणीतरी असेलच की ! ती शक्ती तिलाच आपण परमेश्वर, निसर्ग, नियती अशी वेगवेगळी नावे देतो. पण कुठलीतरी शक्ती आहे हे निश्चित. कारण त्याशिवाय नियमबद्ध असलेल्या या अफाट विश्वाचा पसारा चालणे शक्यच नाही. ही शक्ती म्हणजेच परमात्मतत्त्व . समर्थ याच शक्तीचा शोध घ्यायला आपल्याला सांगतात. त्या शक्तीच्या शोधातच तिचे रहस्य (गूज ) गवसेल. आपल्याला या दृश्य वस्तूंच्या जगात राहून त्या अदृश्य वस्तूचा शोध घ्यायचा आहे. फक्त त्यासाठी वेगळी दृष्टी आपल्याला विकसित करावी लागेल. सतत बाहेर धाव घेणारी आपली दृष्टी आत वळवावी लागेल. 

गंमत अशी आहे की तो परमात्मा अवघे ब्रह्माण्ड व्यापून उरलेला आहे पण तरीही तो आपल्याला दिसत नाही. प्रत्येक गोष्ट देहाच्या साहाय्याने पाहण्याची, अनुभवण्याची आपल्याला सवय लागलेली आहे. पण निर्गुण निराकार असलेला परमात्मा ना आपल्या हातात येणार, ना आपल्या या डोळ्यांनी पाहता येणार. म्हणूनच समर्थ या सत्याचा शोध घ्यायला आपल्याला सांगतात. तिथेच त्याचे रहस्य आपल्याला गवसेल. त्यासाठी सततच्या प्रयत्नांनी, सरावाने दृष्टीला तसे वळण लावावे लागेल. सद्गुरू आपल्याला ही दृष्टी प्रदान करतात म्हणजेच तो मार्ग दाखवतात. मात्र त्या मार्गावर वाटचाल आपल्यालाच करायची असते. 

स्वसंवाद 

१. मी केवळ डोळ्यांना दिसणाऱ्या नश्वर जगाला आणि वस्तूंनाच सर्वस्व मानतो, की त्यामागील अदृश्य ईश्वरी शक्तीचा (पायाचा/मुळांचा) शोध घेण्याचा प्रयत्न करतो?

२. इमारतीचा पाया किंवा झाडाची मुळे अदृश्य असूनही महत्त्वाची असतात, त्याप्रमाणे माझ्या आयुष्यात दिसणाऱ्या यशामागे आणि या विश्वामागे एका अदृश्य नियंत्याचा हात आहे हे मला पटते का?

३. सर्वत्र भरून राहिलेले ईश्वरी तत्त्व हातात धरता येत नाही किंवा स्थूल डोळ्यांनी पाहता येत नाही, हे ओळखून मी माझी दृष्टी अंतर्मुख (आत्मज्ञानाकडे) वळवतो का?

४. सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर केवळ अवलंबून न राहता, आत्मसाक्षात्कारासाठी मी स्वतः साधना आणि प्रयत्न करतो का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१२/८/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...