मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १५४

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १५४ 

महावाक्य तत्त्वादिके पंचीकरणे ।

खुणे पाविजे संतसंगे विवर्णे ।

द्वितीयेसि संकेत जो दाविजेती ।

तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो ।।१५४।।

अर्थ : वेदात सांगितलेली महावाक्ये, विश्वाच्या रचनेची मुलतत्वे, पंचमहाभूतांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या गोष्टी या सगळ्यांचे विवरण संतांच्या मुखातून ऐकावे. संत आपल्याला खुणेने किंवा संकेतपूर्वक परमतत्त्व दाखवतात. ज्याप्रमाणे द्वितीयेचा चंद्र दाखवण्यासाठी एखाद्या झाडाच्या फांदीची खूण दाखवतात.एकदा चंद्र दिसला की ती खूण बाजूला सारून चंद्राकडेच लक्ष द्यायचे असते.

( महावाक्ये - वेदात उल्लेखलेली महावाक्ये. त्यांचा उल्लेख पुढे विवेचनात आला आहे. तत्त्वादिके - विश्वरचनेत कारणीभूत ठरलेली तत्वे, पंचीकरणे - पंचमहाभूतांचे मिश्रणातून तयार झालेल्या गोष्टी, संकेत - खुणेने दाखवणे, दाविजेतो - दाखवतो, सांडून - सोडून देणे, भाविजेतो - भावना करणे/कल्पना करणे )

विवेचन 

अध्यात्मामध्ये महावाक्ये, विश्वरचनेतील मुलतत्वे आणि पंचीकरण यांचे स्पष्टीकरण संतांच्या मुखातून ऐकावे. वेदात चार प्रमुख महावाक्ये सांगितली आहेत. ती म्हणजे अहं ब्रह्मास्मि, तत्त्वमसि, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानं ब्रह्म. सद्गुरू शिष्याला उपदेश करताना या महावाक्यांचा बोध करून देतात. विश्वरचनेची मूलतत्त्वे समजावून सांगतात. पंचीकरणाची प्रक्रिया समजावून सांगतात. हे जग आणि त्यातील सर्व गोष्टी पंचमहाभूतांच्या मिश्रणातून निर्माण झालेल्या आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आपल्याला माहिती आहेत. ती क्रमाक्रमाने सूक्ष्म होत जातात. प्रत्येक तत्वात दुसरी तत्वे मिसळलेली असतात. उदाहरणार्थ पृथ्वी तत्वात पृथ्वी तत्वाचा पन्नास टक्के भाग आणि उरलेल्या पन्नास टक्क्यात उर्वरित चार तत्वे मिसळलेली असतात. प्रत्येक तत्वाबाबत असेच सांगता येईल. 

जेव्हा एखाद्याला वेदांत समजून घ्यायचा असतो तेव्हा दोन गोष्टींची आवश्यकता असते. पहिली म्हणजे जो वेदांत सांगणारा संत आहे तो आत्मज्ञानी असावा. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला हे ज्ञान करून घ्यायचे आहे त्याला ते प्राप्त करून घेण्याबद्दल ओढ किंवा तीव्र जिज्ञासा असावी. आत्मज्ञानी पुरुषांच्या सहवासात  राहिले की पहिली गोष्ट आपोआप साध्य होते. दुसरी गोष्ट म्हणजे आत्मज्ञानाबद्दलची शिष्याला असणारी जिज्ञासा. संतांच्या सहवासात राहिले की ती देखील हळूहळू निर्माण होऊ लागते. 

ज्यांना परमात्म तत्वाचा स्पर्श झालेला आहे असे आत्मज्ञानी महापुरुष आपल्या शिष्यांना हे समजावून सांगतात. कधी कधी ते या गोष्टी एखाद्या खुणेच्या किंवा संकेताच्या आधाराने समजावतात. यासाठी समर्थ आपल्याला एक सुंदर उदाहरण देतात. द्वितीयेचा चंद्र पाहणे शुभ समजले जाते. पण द्वितीयेची चंद्रकोर अतिशय बारीक असते. ती जास्त काळ दिसत नाही. ज्याने ती पाहिली असेल तो दुसऱ्यांना ती दाखवतो. पण जर ती सहजपणे दिसली नाही तर तो एखाद्या खुणेचा आधार घेऊन ती सांगतो. उदाहरणार्थ एखाद्या झाडाच्या फांदीकडे पहा. तिच्या पलीकडे ती चंद्रकोर दिसते आहे. एकदा का ती चंद्रकोर दिसली की मग झाडाची फांदी बाजूला पडते. कारण आता फांदी महत्वाची नसून चंद्रकोर महत्वाची आहे. एकदा चंद्र दिसला की फांदीची आवश्यकता राहत नाही. लक्ष द्यायचे ते चन्द्रकोरीकडे. अर्थात जे तत्त्व समजून घ्यायचे आहे त्याकडे. फांदी हे ती दाखवण्याचे केवळ एक साधन होते. यालाच शाखाचंद्र न्याय म्हटले जाते. 

स्वतः परमात्मतत्वाचा अनुभव घेतलेले संत महावाक्यांच्या खुणांच्या आधारे सदवस्तू किंवा परमात्मा आपल्या शिष्याला अनुभवाच्या कक्षेत आणण्याची युक्ती शिकवतात. तात्पर्य असे की संतांच्या संगतीत काय महत्वाचे आहे आणि काय गौण आहे हे लक्षात येते. त्यामुळे शिष्याचा पुढील प्रवास सोपा होतो. काय शिकावं, ते कोणाच्या सहवासात शिकायला मिळतं आणि ते कसं शिकावं याचं रहस्य समर्थांनी या श्लोकात उलगडून सांगितलं आहे. 

स्वसंवाद 

१. अध्यात्मातील कठीण तत्त्वज्ञान आणि ग्रंथ केवळ स्वतःच्या बळावर समजून घेण्याऐवजी, मी आत्मज्ञानी संतांच्या आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाचा आधार घेतो का?

२. द्वितीयेचा चंद्र दाखवणाऱ्या फांदीप्रमाणे, मी धार्मिक कर्मकांडे, पद्धती आणि साधनांना केवळ 'साधन' (माध्यम) मानतो, की मूळ 'साध्याचा' (परब्रह्माचा) विसर पडून साधनातच अडकून पडतो?

३. परमार्थात प्रगती होण्यासाठी आवश्यक असलेली 'तीव्र जिज्ञासा' माझ्या मनात निर्माण व्हावी म्हणून मी संतसंगात आणि सात्त्विक विचारांत राहण्याचा प्रयत्न करतो का?

४. संतांनी खुणेने दाखवलेल्या ईश्वरी सत्याचे केवळ शाब्दिक ज्ञान न ठेवता, ते स्वतःच्या 'अनुभवाच्या कक्षेत' आणण्यासाठी मी साधना करतो का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

११/८/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...