मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १५२

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १५२

बहूतां परी कूसरी तत्वझाडा ।

परी पाहिजे अंतरी तो निवाडा ।

मना सार साचार ते वेगळे रे ।

समस्तांमधे येक ते आगळे रे ।।१५२।।

अर्थ : निरनिराळे लोक नाना प्रकारांनी चातुर्यपूर्वक तत्वज्ञान सांगतात. पण आपण आपल्या बुद्धीने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. हे मना, सर्वांचे सार असणारे ते सत्य काही वेगळेच आहे. ते परब्रह्म तत्त्व सर्वांमध्ये विद्यमान असले तरी ते सर्वांपेक्षा वेगळे आहे. 

( बहुतांपरी - नाना प्रकाराने, कुसरी - चातुर्य/कौशल्य, निवाडा - निर्णय, समस्तांमधे - सर्व तत्वांमध्ये, आगळे - वेगळे/श्रेष्ठ )

विवेचन 

या जगात अनेक धर्म, अनेक उपासना पद्धती आणि अनेक पंथ आहेत. त्यातील विद्वान, साधू, संत मोठया कौशल्यपूर्वक आपापल्या उपासना पद्धतीचे समर्थन करताना दिसतात. कोणी अद्वैत तत्वज्ञानाचे प्रतिपादन करतो, कोणी पूर्णवादाचे. कोणी कुंडलिनी जागृतीसंबंधीचे तत्वज्ञान मांडतात. आपापली उपासना पद्धती कशी चांगली आहे हे प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. असे सगळे विविध प्रकारचे तत्वज्ञान मांडले जाते. पण असे असले तरी ईश्वरी तत्त्व त्यांना समजले असेलच असे नाही. 

म्हणून दुसऱ्या ओळीत समर्थ म्हणतात," परी अंतरी पाहिजे तो निवाडा." या ओळीचा दोन प्रकारे अर्थ घेता येईल. पहिला अर्थ म्हणजे निरनिराळे तत्वज्ञान जे विद्वान मांडत असतात, त्यांच्या स्वतःच्या मनात त्याबद्दल गोंधळ असता कामा नये. परब्रह्माबद्दलचा योग्य तो निर्णय त्यांना स्वतःच्या मनाने घेता आला पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा ज्यांच्याकडे शाब्दिक पांडित्य असते, शास्त्रांचा अभ्यास केलेला असतो अशा विद्वानांना आपल्याला ईश्वरी तत्त्व कळले आहे असा अहंकार आणि भ्रम होऊ शकतो. या ओळीचा दुसरा अर्थ असा घेता येईल की विविध प्रकारे विविध लोकांनी मोठ्या कौशल्यपूर्वक केलेली आपापल्या तत्वज्ञानाची भलावण ऐकून आपला स्वतःचा गोंधळ होण्याची शक्यता असते. किंबहुना सर्वसामान्य माणसे गोंधळतातच आणि त्यांना योग्य तो निर्णय घेता येत नाही. अशा वेळी त्यांना देखील खरे काय आहे, आपण कोणत्या मार्गाने गेले पाहिजे याचा निर्णय घेता आला पाहिजे. 

या सगळ्या मतमतांच्या गलबल्यात आपण हरवून जाण्याची शक्यता असते. म्हणून तिसऱ्या ओळीत समर्थ म्हणतात," मना सार साचार ते वेगळे रे." मागील श्लोकांमध्ये आपण ' सार ' शब्द समर्थांना ज्या अर्थाने अपेक्षित आहे तो अर्थ जाणून घेतला होता. समर्थांच्या मते 'सार ' म्हणजे ईश्वर. तेच सत्य आहे. बाकी सर्व ' असार ' आहे. जे ' सार ' आहे ते ' साचार ' आहे. साचार म्हणजे ज्याचे आचरण करता येते ते. परमात्मा साचार आहे म्हणजे जगण्याचा विषय आहे. तो केवळ पुस्तकी पांडित्य वा तत्वज्ञानाचा विषय नाही. परमेश्वराचे स्वरूप वर्णन करताना वेद सुद्धा थकले असे म्हटले जाते तर आपल्यासारख्या सामान्यांची काय कथा !

जीवनामध्ये अनेक मोठमोठे विद्वान आपण पाहतो. पण त्यांच्यामध्येही मतभेद असलेले आपल्याला दिसतात. काहीवेळा तर द्वेषापोटी त्यांची भांडणे विकोपाला जातात आणि एकमेकांवर वैयक्तिक टीका करण्यापर्यंत त्यांची मजल जाते. काही प्रसिद्ध कीर्तनकार किंवा प्रवचनकार आपल्या बोलण्यातून मोठ्या कौशल्यपूर्वक श्रोत्यांना प्रभावित करतात. परमार्थ मार्गात अहंकार कसा अडथळा ठरतो, पैसा हा सर्वस्व कसा नाही, निरिच्छ राहणे किती महत्वाचे आहे यासारख्या गोष्टी ते मांडत असतात. पण बऱ्याच वेळा त्यांचे स्वतःचेच वागणे याच्या विपरीत आढळते. अशा लोकांपासून परमेश्वर दूरच असतो. त्यांना ' सारही ' समजले नाही आणि ' साचार ' म्हणजे त्यांच्या वागण्यातून ते प्रतिबिंबित होत नाही असे खेदाने म्हणावे लागते. 

चौथ्या चरणात समर्थ म्हणतात," समस्तांमधे येक ते आगळे रे." परमेश्वर सगळीकडे व्याप्त आहे. सर्व प्राणिमात्रांच्या ठायी आहे. परंतु असे असले तरी हे जग, प्राणिमात्र म्हणजे तो नाही. तो या सर्वांहून वेगळा आहे. त्याच्या आधारानेच सर्वांमध्ये चैतन्य विद्यमान आहे. विजेच्या तारांमध्ये असलेली वीज जेव्हा तिच्यावरील उपकरणे चालतात तेव्हा तिचे अस्तित्व आपल्याला कळते. प्रत्येक उपकरणात कार्य करणारी वीज एकच असली तरी विजेचा पुरवठा करणारे केंद्र वेगळे असते. त्या केंद्राशी आपण जोडलेले असू तरच आपले घर त्या शक्तीने प्रकाशमान होईल. त्याप्रमाणे परमेश्वर सर्वांमध्ये विद्यमान असला तरी त्याहूनही तो वेगळा आहे, श्रेष्ठ आहे. त्याला आपल्या मनानेच, अनुभवानेच जाणले पाहिजे. 

स्वसंवाद 

१. विविध मतांच्या आणि तात्त्विक वादांच्या गलबल्यात गोंधळून न जाता, मी माझ्या अंतर्मनाने ईश्वरी सत्याचा योग्य तो 'निवाडा' (निर्णय) करतो का?

२. मी अध्यात्माचा उपयोग केवळ कोरड्या शाब्दिक पांडित्यासाठी आणि चर्चेसाठी करतो, की त्या विचारांचे माझ्या रोजच्या जगण्यात 'आचरण' (साचार) करतो?

३. उपदेश करणारे आणि स्वतः तसे न वागणारे यांच्या दांभिकतेवर भुलून न जाता, मी खऱ्या 'साराचा' (ईश्वरी तत्त्वाचा) शोधाचा मार्ग धरतो का?

४. सर्व उपकरणांत वीज असली तरी मूळ वीज केंद्र वेगळे असते, या न्यायाने सर्व विश्वात व्यापून राहिलेले ईश्वरी चैतन्य ओळखून त्या श्रेष्ठ परब्रह्माशी जोडले जाण्याचा प्रयत्न करतो का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

५/८/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...