उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १५०
नसे पीत ना श्वेत ना शाम काही ।
नसे वेक्त आवेक्त ना नीळ नाही ।
म्हणें दास विश्वासता मुक्ति लाहें ।
मना संत आनंत शोधूनि पाहे ।।१५०।।
अर्थ : परब्रह्म पिवळे नाही, पांढरे नाही, श्यामवर्ण किंवा निळसर नाही. ते व्यक्त नाही आणि अव्यक्त पण नाही. पण संतवचनावर श्रद्धा ठेवल्याने त्याचे दर्शन घडू शकते आणि मुक्तीचा मार्ग खुला होतो. म्हणून हे मना, त्या अनंत अशा परब्रह्माचा तू शोध घे.
( पीत -पिवळे, श्वेत - पांढरे, शाम - निळसर काळे, वेक्त - व्यक्त/इंद्रियांना दिसणारे, आवेक्त - अव्यक्त/अदृश्य/इंद्रियांना न दिसणारे )
विवेचन
' मना संत आनंत शोधूनि पाहे ' या पाच श्लोकांच्या मालिकेतील हा शेवटचा श्लोक. या श्लोकात समर्थ परब्रह्माचे स्वरूप कसे नाही हे सांगताहेत. जन्मापासून आपल्याला या दृश्य जगताचा सहवास असतो. त्यामुळे प्रत्येक वस्तूचा आकार, रंग इ. वरून आपण त्या गोष्टीबद्दल अनुमान काढत असतो. ही सृष्टी विविध रंगांनी नटलेली आहे. त्यामुळे रंग किंवा वर्ण हा एखाद्या गोष्टीला ओळखण्याचा महत्वाचा मार्ग आहे. रंगांची मोहिनी आपल्याला पडलेली असते. आपण निसर्गचित्रात त्याप्रमाणे रंग भरत असतो. तर कधी मनानेच एखाद्या गोष्टीचे चित्र रंगवत असतो. धार्मिक गोष्टींशी संबंधित चित्र रंगवताना साधारणपणे पीत म्हणजे पिवळ्या किंवा भगव्या रंगांचा वापर होतो. पिवळा रंग हा सात्विकतेचेही प्रतीक समजला जातो. तांबडा रंग साधारणपणे रजोगुणाशी निगडित तर काळा रंग तमोगुणाशी निगडित समजला जातो. आपल्याकडे श्रीराम, श्रीकृष्ण, विष्णू या देवतांचा रंग निळसर दाखवला जातो.
जे लोक सातत्याने साधना करीत असतात त्यांनाही साधना करीत असताना विविध रंगांचे दर्शन होते. विविध नादांची अनुभूती होते. दिव्य सुगंध अनुभवायला येतो. या गोष्टी म्हणजे आपली साधना योग्य मार्गाने सुरु आहे याचे निदर्शक असतात. परंतु हे दिव्य रंग, नाद किंवा सुगंध एवढे मनमोहक असतात की बऱ्याच वेळा साधक त्यातच अडकून पडण्याची शक्यता असते. काही वेळा साधकाला असेही वाटू शकते मला परब्रह्म गवसले आहे. परंतु त्याला अजून पुढे वाटचाल करायची असते कारण हा मार्ग अनंत आहे. म्हणूनच समर्थांनी या ठिकाणी स्पष्ट केले आहे की निराकार असलेले परब्रह्म पीत, श्वेत, शाम, निळ्या अशा कोणत्याही रंगाचे नाही. ते रंगहीन आहे.
त्याशिवाय समर्थ म्हणतात की हे परब्रह्म व्यक्त नाही किंवा अव्यक्तही नाही. व्यक्त होणे म्हणजे दिसणे किंवा अव्यक्त म्हणजे न दिसणे या गोष्टी आपल्या इंद्रियांशी निगडित असतात. संतांच्या दृष्टीने पाहिले तर हे जग म्हणजे त्याचे दृश्य रूप आहे तर त्याचे निर्गुण निराकार असणे हे अव्यक्त रूप आहे. पण व्यक्त अव्यक्ताच्या पलीकडे जाऊन त्याची अनुभूती घ्यावी लागते. म्हणूनच समर्थांनी ते व्यक्तही नाही आणि अव्यक्तही नाही असे म्हटले असावे असे वाटते.
असं जर आहे तर साधकाच्या मनात शंका उत्पन्न होते की अशा या निर्गुण, निराकार, दृष्टीला अगोचर असणाऱ्या परब्रह्माचे मला ज्ञान होईल का, दर्शन होईल का ? इथे समर्थ आपल्याला आश्वस्त करीत आहेत. ते म्हणतात," म्हणे दास विश्वासता मुक्ति लाहे." त्याचे दर्शन निश्चित होईल, त्या दर्शनाने माणूस जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होईल. पण त्यासाठी संतांचा उपदेश पाळावा, त्यांचा सहवास करावा ही अट आहे असे समजावे. संत हे मोक्ष मार्गावरील दीपस्तंभ आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवून वाटचाल करावी. विश्वास किंवा श्रद्धा ही गोष्ट जीवनात अतिशय महत्वाची आहे. आपण जेव्हा एखाद्या डॉक्टरांचे औषध घेतो, तेव्हा त्या डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून ते घेतो. त्यामुळे मला बरे वाटणार आहे ही मनात खात्री असते. त्याप्रमाणेच संतवचनांवर आपला दृढ विश्वास किंवा श्रद्धा हवी. ही श्रद्धा किंवा हा विश्वास म्हणजे म्हणजे परमार्थ मार्गावर आपण अर्धी लढाई जिंकली असे समजायला हरकत नाही. परमेश्वर आहे या गोष्टीवर देखील दृढ श्रद्धा हवी. त्यामुळेच परब्रह्माचे दर्शन आपल्याला घडू शकेल.
स्वसंवाद
१. मी ईश्वराला किंवा आनंदाला केवळ बाह्य रंग, रूप आणि आकारांमध्येच शोधत राहतो, की त्या पलीकडच्या निर्गुण-निराकार परब्रह्माची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करतो?
२. साधनेच्या किंवा अभ्यासाच्या प्रवासात मिळणाऱ्या सूक्ष्म अनुभवांमध्ये/प्रलोभनांमध्येच न अडकता, अंतिम ध्येयाकडे (मुक्तीकडे) वाटचाल करण्याचे भान मी ठेवतो का?
३. डॉक्टरांच्या औषधावर विश्वास ठेवतो, तसा संतांच्या वचनांवर आणि गुरुंच्या उपदेशावर माझा दृढ आणि अढळ विश्वास आहे का?
४. संतांनी दाखवलेला मुक्तीचा मार्ग सोपा होण्यासाठी मी दैनंदिन व्यवहारात संशयाचा त्याग करून 'श्रद्धा आणि सबुरी' बाळगतो का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
४/८/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
एक परिच्छेद नव्याने ऍड केला आहे. तो वाचून योग्य आहे का हे सांगा. प्रश्नांमध्ये त्या दृष्टीने काही बदल हवा आहे का ?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा