उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १४८
निराकार आधार ब्रह्मादिकांचा ।
जया सांगता सीणली वेदवाचा ।
विवेके तदाकार होऊनि राहे ।
मना संत आनंत शोधूनि पाहे ।।१४८।।
अर्थ : परमेश्वर हा निराकार आहे. तो ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यासारख्या देवांचाही आधार आहे. त्याचे वर्णन करताना वेद सुद्धा थकले आहेत. हे मना, तू विवेकाच्या साहाय्याने त्या परब्रह्माशी एकरूप होऊन राहा. हे मना, त्या परब्रह्माचा तू शोध घे.
( सीणली = थकली, तदाकार - त्याच्याशी एकरूप )
विवेचन
१४६ ते १५० या श्लोकांमध्ये समर्थ आपल्याला परब्रह्म स्वरूपाची ओळख करून देत आहेत. परमेश्वर निर्गुण निराकार आहे हे आपण नेहमी बोलतो किंवा ऐकतो. पण असा निराकार असलेला तो परमेश्वर साऱ्या विश्वाचाच नव्हे तर ज्याने हे जग निर्मिले असे ब्रह्मदेव, जगाचा पालनकर्ता श्रीविष्णू आणि संहारकर्ता श्रीमहेश यांच्यासारख्या त्रिदेवांचा देखील आधार आहे. ज्या वस्तुंना आकार आहे, त्यांचे वर्णन आपल्याला करता येते. निराकाराचे वर्णन करणार तरी कसे ? वेद आणि उपनिषदांना परमेश्वराचा श्वास म्हटले जाते. परंतु वेदांना देखील या परब्रह्माचे वर्णन करता येत नाही. त्याचे वर्णन करता करता वेदवाणी शिणली म्हणजेच थकून गेली. एक प्रकारे तिने आपली असमर्थताच व्यक्त केली. तिलाही शेवटी ' नेती नेती ..' म्हणजे असे नाही असे म्हणावे लागले.
आपल्याला दिसणारे हे विश्व पंचमहाभूतांची उत्पत्ती आहे. येथील प्रत्येक वस्तूला आकार आहे, वजन आहे, जन्म आहे, मृत्यू आहे. पंचज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने ती गोष्ट जाणून घेता येते. तिचे वर्णन करता येते. पंचमहाभूतांपैकी हवा आणि आकाश ही सूक्ष्म तत्त्वे आहेत. तरी देखील त्यांची जाणीव आपल्याला होते. माणसाने वैज्ञानिक प्रगती केली. जी सूक्ष्म गोष्ट आपल्या डोळ्यांनाही दिसत नाही, ती सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने आपण पाहू शकतो. पण जे परब्रह्म आहे ते निर्गुण निराकार आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते अगम्य किंवा अगोचर आहे. म्हणजे आपल्या इंद्रियांच्या साहाय्याने आपण त्याला जाणून घेऊ शकत नाही. पण सर्वत्र ते व्यापून राहिले आहे याची अनुभूती श्रद्धावान व्यक्तीला होऊ शकते.
विजेच्या तारेतून वाहणारी वीज आपल्याला दिसत नाही. मग ती नाही असे म्हणायचे का ? पण जेव्हा तिच्यावर अवलंबून असणारी उपकरणे काम करू लागतात, तेव्हा आपल्याला तिचे अस्तित्व जाणवते. वीज नसेल तर उपकरणे बंद पडतील. त्याचप्रमाणे या विश्वाचे कार्य ज्या शक्तीच्या साहाय्याने सुरु आहे, ती शक्ती म्हणजे परब्रह्म. ती दिसत नाही पण विश्वाचा नियमबद्ध कारभार सुरु आहे. चंद्र, सूर्य, तारे यांचे नियमित उगवणे, निसर्गातील ऋतू, समुद्राची भरती ओहोटी , चंद्रग्रहण, सूर्यग्रहण या सगळ्या गोष्टी नियमितपणे सुरू आहेत. आज विज्ञान देखील कार्यकारणभाव मान्य करते. तेव्हा या सगळ्या गोष्टीमागे उभी असणारी कोणतीतरी शक्ती निश्चित आहे. तिलाच आपण परमेश्वर, परब्रह्म अशी नावे देतो.
पण इथेच गंमत अशी आहे की जो मानवी देह आपल्याला लाभला आहे, त्याच्याच साहाय्याने परब्रह्माची अनुभूती आपण घेऊ शकतो, त्याला जाणून घेऊ शकतो. खरं म्हणजे हे परस्परविरोधी आहे. इंद्रियांनाही अगम्य असलेले परब्रह्म इंद्रियांच्याच साहाय्याने कसे बरे जाणून घेता येईल ? हे परब्रह्म आपल्या आत जसे आहे, तसेच ते बाहेरही सर्वत्र व्यापून राहिले आहे. समर्थ म्हणतात की आपल्याला विवेकाच्या साहाय्याने या दृश्य जगाला बाजूला सारून या निराकाराला जाणून घेता येते, त्याच्याशी एकरूप होता येते. त्यासाठी आपली सदोदित बाह्य असलेली दृष्टी आत वळवावी लागेल. आपल्या तपश्चर्येच्या, साधनेच्या जोरावर संतांनी ही किमया साध्य केली होती. त्यांनी परब्रह्माला जाणून घेतले होते. तीच अनुभूती त्यांची कृपा लाभली तर आपल्या शिष्यांनाही ते देऊ शकतात. संत ज्ञानेश्वरांना ती अनुभूती निवृत्तीनाथांनी दिली. भगवान रामकृष्णांसारख्या परमहंस पदाला प्राप्त झालेल्या संतांनी स्वामी विवेकानंदांसारख्या आपल्या शिष्यांना त्याचे दर्शन घडवले. तेव्हा या परब्रह्माचा शोध घेऊन पहा असे आवाहन समर्थ आपल्यालाही करतात.
स्वसंवाद
१. वेदांनाही जिथे 'नेती नेती' म्हणावे लागले, त्या अगम्य परब्रह्माचे अस्तित्व मी जगातील निसर्ग आणि नियमबद्धतेच्या रूपाने अनुभवण्याचा प्रयत्न करतो का?
२. तारेतील अदृश्य विजेप्रमाणे, माझ्या देहात आणि चराचरात कार्य करणाऱ्या अदृश्य ईश्वरी शक्तीवर माझी अढळ श्रद्धा आहे का?
३. दृश्य जगतातील नश्वर गोष्टींच्या मोहात अडकण्याऐवजी, विवेकाचा वापर करून मनाला अंतर्मुख करण्याचा आणि त्या अनंताशी 'तदाकार' (एकरूप) होण्याचा मी प्रयत्न करतो का?
४. संत ज्ञानेश्वर आणि स्वामी विवेकानंदांप्रमाणे, योग्य गुरूंच्या/संतांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मिक साधना करण्याची तळमळ माझ्या मनात आहे का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
४/८/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा