मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १४६

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १४६ 

दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी । 

अकस्मात आकारले काळ मोडी ।

पुढे सर्व जाईल काही न राहे ।

मना संत आनंत शोधूनि पाहे ।।१४६।।

अर्थ : डोळ्यांना जे जे दिसते ते ते अनंत काळापर्यंत टिकणारे नाही. अचानक आकाराला येणाऱ्या सर्व वस्तूंचा काळ नाश करतो. एक वेळ अशी येईल की आपल्याला दिसणारे हे सगळे विश्व नाहीसे होईल. काहीही शिल्लक राहणार नाही. म्हणूनच हे मना तू अनंत अशा त्या सद्वस्तूला (परब्रह्माला ) शोधून पहा. 

( कल्पकोडी - अनंत काळापर्यंत, संत - शाश्वत सत्य/परब्रह्म )

विवेचन 

या १४६ ते १५० श्लोकांमध्ये समर्थ आपल्याला सद्वस्तूची म्हणजेच परब्रह्माची ओळख करून देत आहेत. आपल्याला त्याचा शोध घेण्याचे आवाहन करीत आहेत. म्हणूनच या पाचही श्लोकांचा अंतिम चरण ' मना संत आनंत शोधूनि पाहे ' असा आहे. 

आपला जन्म झाल्यापासून आपल्या डोळ्यांनी आपण हे जग बघत असतो. त्यातील माणसे, पशुपक्षी, प्राणी, निसर्ग या साऱ्या गोष्टी आपण पाहत असतो. आपली दृष्टी बाह्य असल्यामुळे या साऱ्या दृश्य गोष्टी आपण खऱ्या मानून चालतो. पण जे आपल्याला दिसते ते तरी तसेच असते का की आपला तो भ्रम असतो ? सूर्य आपल्याला पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळताना दिसतो. असे वाटते की तो पृथ्वीभोवती फिरत आहे. आपली पृथ्वी प्रचंड वेगाने अंतराळात फिरत असते पण आपल्याला ती स्थिर वाटते. पौर्णिमेला पूर्ण आकारात दिसणारे चंद्रबिंब अमावास्येपर्यंत हळूहळू लहान होत जाते. त्यालाच आपण चंद्राच्या कला म्हणतो. पण प्रत्यक्षात तसे होते का ? तात्पर्य आपल्या डोळ्यांनी जे जे दिसते ते ते प्रत्यक्षात तसेच असेल असे नाही. 

हे जग पंचमहाभूतांपासून निर्माण झाले आहे. पूर्वी काही नव्हते. पण हे अनंत विश्व अचानक आकाराला आले. पण जे जे अकस्मात आकाराला येते, ते ते सर्व काळ नष्ट करतो. पंचमहाभूतातून आकाराला आलेल्या वस्तुंना गिळंकृत करणाऱ्या शक्तीला आपण काळ असे नाव देतो. आज आपल्याला जे जे दिसते, ते ते सर्व उद्या नष्ट होणार आहे. या ठिकाणी गीतरामायणातील ओळी आठवतात. श्रीराम भरताला म्हणतात,"दिसे भासते ते सारे आहे नाशिवंत. वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा."

या विश्वात एकच वस्तू भरून राहिली आहे. ती म्हणजे परब्रह्म. ते अविनाशी आहे. पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या प्रत्येक गोष्टी नष्ट होतात. काही कीटकांचे आयुष्य अवघ्या काही तासांचे किंवा एखाद्या दिवसाचे असते. काही प्राणी १५-२० वर्षे जगतात. मनुष्य शंभर सव्वाशे वर्षांपर्यंत जगू शकतो. वृक्ष, पर्वत, नद्या, समुद्र यांचे आयुष्य त्यापेक्षा जास्त आहे. पण एक दिवस काळाचा वरवंटा त्यांच्यावर देखील फिरणारच आहे. 

मायेच्या प्रभावामुळे हे जग आपल्याला सत्य वाटते. त्याच्यातुनच आसक्ती निर्माण होते. परंतु कायमचे समाधान आणि शांती लाभत नाही. माणूस आयुष्यभर सुखाच्या शोधात धावपळ करीत राहतो. सुखाचे मृगजळ माणसाला आयुष्यभर दमवते. आयुष्यात काही सुखाचे क्षण येतातही पण ते क्षणिकच टिकतात. पण खऱ्या सुखाला तो पारखा होतो. त्याचे कारण म्हणजे त्याने सद्वस्तु किंवा परब्रह्म सोडून इतर गोष्टीत आपला आनंद शोधलेला असतो. म्हणून समर्थ आपल्याला सावध करीत आहेत. हे मानवा, तू चिरंतन, शाश्वत अशा सत्याचा शोध घे. त्यातच चिरंतन आनंद गवसेल. शांती आणि समाधान त्याच्या शोधातच आहे. 

स्वसंवाद 

१. माझ्या डोळ्यांना दिसणारे हे नश्वर जग, वस्तू आणि नाती यांनाच मी सर्वस्व (शाश्वत) मानून चाललो आहे का?

२. गीतरामायणातील 'दिसे भासते ते सारे आहे नाशिवंत' या उक्तीप्रमाणे, काळाच्या ओघात सर्व काही नष्ट होणार आहे याचे भान ठेवून मी आसक्ती कमी करण्याचा प्रयत्न करतो का?

३. क्षणिक सुखाच्या मृगजळामागे आयुष्यभर धावण्याऐवजी, अंतर्यामी असलेल्या शाश्वत आणि चिरंतन आनंदाचा (परब्रह्माचा) शोध मी घेतो का?

४. समर्थांनी बजावलेल्या सावधानतेचा विचार करून, मी रोजच्या धावपळीत थोडा वेळ तरी आत्मचिंतनासाठी आणि विवेक जागवण्यासाठी देतो का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

३/८/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...