मुख्य सामग्रीवर वगळा

नात्यांचं महावस्त्र - भाग सात : 'मावशी'

उगवतीचे रंग

नात्यांचं महावस्त्र - भाग सात : 'मावशी' (आईची प्रतिछाया)

'नात्यांचं महावस्त्र' विणताना आपण आतापर्यंत आईची 'मायेची पैठणी', बाबांची 'सह्याद्रीची ढाल', आजीच्या 'संस्कारांची शिदोरी', आजोबांचे 'सुरकुत्यांमधील शहाणपण' आणि मामाचा 'माहेरचा समृद्ध दुवा' अनुभवला. या महावस्त्रात आईच्या मायेचाच दुसरा उबदार पदर जोडणारी आणि कुटुंबात आपुलकीचा सुंदर सुगंध पसरवणारी अतिशय प्रेमळ व्यक्ती म्हणजेच 'मावशी'! नात्यांच्या या महावस्त्रातील आईसारखाच रेशमी आणि मुलायम पदर म्हणजे मावशी.

हिंदीत एक खूप सुंदर आणि सार्थ म्हण आहे—"जो मां सी होती हैं, वो मौसी!" म्हणजेच, जी स्वभावाने, मायेने आणि वात्सल्याने हुबेहूब आईसारखीच असते, ती मावशी! मावशी या शब्दाचे पहिले अक्षरच मुळी 'मा' आहे. मा म्हणजे माया, आईच्या मायेचा स्पर्श. 'मावशी' या शब्दाची उकल केली तरी त्यात 'माझ्या आईची प्रतिछाया' दडलेली दिसते. आईनंतर जर जगात कोणाकडे आईएवढंच निशर्त प्रेम, जिव्हाळा आणि हक्क असेल, तर ते मावशीकडे असतं.

आपल्याकडे तर "माय मरो अन् मावशी उरो" अशी मावशीची महती व्यक्त करणारी सार्थ म्हण आहे. आईचे स्थान तर सर्वोच्च आहेच; पण आईच्या खालोखाल जिची आपल्या भाचरांवर अथांग माया असते, असं एक हळवं नातं म्हणजे मावशी. 'मावशी येणार आहे' असं नुसतं कळलं, तरी भाच्यांना केवढा आनंद होतो! आणि खरंच मावशी जेव्हा येते, तेव्हा ती रिकाम्या हाताने येत नाही; आपल्या भाच्यांसाठी आवडता खाऊ आणि भेटवस्तू तर आणतेच, पण सोबत अपार प्रेम आणि माया घेऊन येते. भाच्यांनी मिळवलेल्या अगदी छोट्याशा यशाचेही तिला केवढे कौतुक असते, ती अभिमानाने ते सगळ्यांना सांगत सुटते. मावशी आली की तिच्या रूपाने दुसरी आई आल्यासारखाच आनंद असतो.

लहानपणीच्या आठवणींमध्ये मावशीचे स्थान अत्यंत विशेष आणि हळवे असते. दिवाळीची सुट्टी असो किंवा उन्हाळ्याची सुट्टी, मावशीकडे सुट्टीचा आनंद लुटणे ही वेगळीच पर्वणी असते. आई जेव्हा कामात व्यस्त असते, आजारी असते किंवा काही कारणाने घराबाहेर असते, तेव्हा मुलांची दुसरी आई बनून त्यांना मायेने सावरणारी मावशीच असते. मावशीकडे आईसारखीच अथांग माया असते, पण आईसारखा ओरडा किंवा शिस्तीचा कडकपणा मात्र नसतो! त्यामुळे मुलांसाठी मावशी म्हणजे 'आईचे प्रेम आणि मैत्रिणीची मोकळीक' असा अद्भूत संगम असतो.

मावशी आणि भाचेमंडळी यांच्यातील नाते हे गमतीशीर आणि अथांग मैत्रीचे असते. आईपाशी जे सांगायला मुले घाबरतात, मनातल्या गुपितातल्या गोष्टी किंवा एखादा बालहट्ट, तो विश्वासाने उघड करण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे मावशी! मावशीच्या घरी गेलेले मूल कधीच उदास किंवा उपाशी राहिले आहे, असे होत नाही. आपल्या भाच्यांचे लाड करताना, त्यांना आवडणारे पदार्थ प्रेमाने बनवून भरवताना मावशीला जो आनंद होतो, तो तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो.

मावशी या शब्दात एवढं प्रेम दडलेलं आहे की, एखादी अनोळखी वयस्कर स्त्री दिसली तरी तिला आपण प्रेमाने 'मावशी' म्हणून हाक मारतो. मावशी या शब्दाने तिच्याशी त्या क्षणापुरते का होईना पण नाते निर्माण होते. ती देखील मग आईच्या मायेने आपल्याशी बोलते, असा अनुभव आपल्याला नेहमी येतो. आईच्या मैत्रिणीला आपण सहसा 'मावशी' म्हणूनच हाक मारतो; परंतु मैत्रिणीच्या आईला काकू म्हटले जाते. एखाद्या स्त्रीला मावशी म्हणून हाक मारली तर तिला राग येत नाही; पण काकू म्हटले तर काही स्त्रियांना राग येऊ शकतो! त्या गमतीने म्हणतात—"माझं काय वय झालंय का? मी काय काकूबाई वाटते का?" पण मावशी म्हटलं की असा राग येत नाही. एखाद्या लहान मुलीच्या मोठ्या बहिणीला मूल बाळ झाले, तर तिला अगदी लहान वयातच "तू आता मावशी झालीस" असे म्हटले जाते. म्हणजे लहान वयात मिळालेला हा 'मावशी' पदाचा बहुमान राग येण्याचा नव्हे, तर अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा असतो!

आजकाल शिक्षणाच्या निमित्ताने बऱ्याच मुलांना बाहेरगावी राहावे लागते. अशा वेळी घरचे, आईच्या हातचे जेवण मिळत नाही. पण बऱ्याच ठिकाणी मेसमध्ये किंवा हॉस्टेलवर आईच्याच मायेने स्वयंपाक करून मुलांना गरमागरम जेवण वाढणाऱ्या स्त्रिया असतात; साहजिकच मुले त्यांना 'मावशी' म्हणून मान देतात. हॉटेलमधील जेवण कितीही चांगले वाटले तरी काही दिवसांनी त्याचा कंटाळा येतो, पण या मावशींच्या कडील जेवणाचे कधीच तसे होत नाही.

आपल्या संस्कृतीत आणि इतिहासात मावशीच्या नात्याचे विविध पैलू पाहायला मिळतात. जसे महाभारतात मामाच्या नात्याला कलंक लावणारे शकुनी किंवा कंसासारखे अपवादात्मक मामा होते, तशीच द्वापारयुगात श्रीकृष्णाला मारण्यासाठी मायेचा आव आणणारी 'पुतना मावशी' देखील होती. कपटाने विष पाजणाऱ्या पुतना मावशीचे प्रेम हे केवळ ढोंग होते; पण खऱ्या अर्थाने मावशीचे हृदय कसे असावे, याचे अप्रतिम उदाहरण आपल्याला आधुनिक काळातील संगीताच्या महान विश्वात पाहायला मिळते!

माई आणि मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या संस्कारात वाढलेल्या मंगेशकर कुटुंबात या नात्याचे एक अत्यंत भावुक रूप आपण पाहिले आहे. लतादीदींची लहान बहीण आणि महान गायिका आशा भोसले यांनी तरुण वयात गणपतराव भोसले यांचा हात धरून घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्या तशा बाहेर पडल्या; पण पुढे अनेक कौटुंबिक वाद आणि खडतर संकटानंतर त्यांनी आपल्या घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्या जेव्हा आपल्या लहान मुलांना घेऊन परत आल्या, तेव्हा गायन क्षेत्रात प्रसिद्धीच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या लतादीदींनी मनात कोणताही आकस न ठेवता आपल्या या लहान बहिणीचा आणि तिच्या लहान मुलांचा पूर्ण आदराने व प्रेमाने स्वीकार केला. लतादीदींनी स्वतः विवाह न करता, आशाताईंच्या मुलांवर (आपल्या भाच्यांवर) सख्या आईसारखे निस्सीम प्रेम केले, त्यांचे अपार लाड केले आणि त्यांना मावशीचे उबदार छत्र दिले. आईच्या अनुपस्थितीत किंवा कठीण काळात भाच्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे काय असते, याचे हे अत्यंत जिवंत आणि प्रेरक उदाहरण आहे.

मावशी हे नाते केवळ भाच्यांपुरते मर्यादित नसून ते आपल्या आईच्या आयुष्यातील सर्वात मोठा भावनिक आधार असते. सख्ख्या दोन बहिणींमधील नाते हे जगातील सर्वात सुंदर आणि पारदर्शक नात्यांपैकी एक मानले जाते. लग्न होऊन वेगवेगळ्या घरी गेल्या, भिन्न संसारात रमल्या तरी लहानपणीचे दिवस, बालपणातल्या आठवणी आणि मनातले सुख-दुःख एकमेकांशी मनमोकळेपणाने शेअर करण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे 'बहीण'! आईला जेव्हा संसारात कसला ताण येतो किंवा थकवा जाणवतो, तेव्हा मावशीशी फोनवर बोलल्याने किंवा तिची एक भेट झाल्याने आईचा अर्धा ताण चुटकीसरशी हलका होतो. आईच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि मानसिक शांतता टिकवून ठेवण्यात मावशीची भूमिका अतिशय मोलाची असते.

बऱ्याचशा भारतीय भाषांचा जन्म हा संस्कृतपासून झाला आहे; त्या संस्कृतोद्भव आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, संस्कृत भाषा ही जर आई मानली, तर इतर भारतीय भाषा या तिच्या 'भाषा भगिनी' आहेत—म्हणजेच त्या आपल्या मावशीच्या जागी आहेत! मनापासून ही गोष्ट लक्षात घेतली, तर आपल्या देशातील भाषावाद आणि प्रांतवादसुद्धा संपुष्टात यायला वेळ लागणार नाही.

असा हा नात्यांच्या या भरजरी 'महावस्त्रा'चा मावशी नावाचा पदर! अत्यंत कोमल, रेशमी आणि मायेचा उबदार ओलावा देणारा! हा पदर जेवढ्या जिव्हाळ्याने जपला जाईल, तेवढा आपल्या नात्यांमधील मायेचा ओलावा कायम राहील.

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१/८/२०२६

प्रतिक्रियेसाठी: ९४०३७४९९३२

(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...