मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १४४

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १४४

जगी पाहता साच ते काय आहे ।

अती आदरे सत्य शोधूनि पाहे ।

पुढे पाहता पाहता देव जोडे ।

भ्रमें भ्रांति अज्ञान हे सर्व मोडे ।।१४४।।

अर्थ : जगामध्ये सत्य काय आहे याचा विचार करावा. मनामध्ये आदर बाळगून सत्याचा शोध घ्यावा. असा शोध घेता घेता ईश्वरदर्शन होते. ते झाल्यावर आपले अज्ञान, भ्रम आणि भ्रांती या गोष्टी नाहीशा होतात.

( साच - सत्य, सत्य - येथे अर्थ अंतिम सत्य, भ्रांति - मनातील गोंधळ, अज्ञान - आत्मविस्मृती )

विवेचन 

आधीच्या श्लोकात समर्थांनी म्हटले की आपले हित कशात आहे ते आपल्याला कळत नाही. सत्य असत्याची पारख न करताच आपण नाणे म्हणजे एखादी गोष्ट स्वीकारतो. त्यामुळे आपले नुकसान होते. म्हणूनच या श्लोकात समर्थ आपल्याला सत्य काय आहे ते आदरपूर्वक शोधून पहा असे सांगतात. जे जे दिसते आणि खरे म्हणून वाटते ते सर्वच सत्य नसते. गारगोटी देखील हिऱ्यासारखी चमकते. All that glitters is not gold असे एक इंग्रजी वाक्य आहे. त्याचा अर्थ देखील हाच आहे. त्यासाठी समर्थांनी ' अखंड सावधानतेचा ' मंत्र दिलेला आहेच. खऱ्या खोट्याची जाणीवपूर्वक पारख करता यायला हवी. व्यवहारी जगात देखील सत्याला मह्त्व आहेच. कारण सत्य असत्याची परीक्षा करता आली नाही तर आपल्याला मोठे नुकसान सोसावे लागू शकते. अध्यात्मात तर सत्य अजूनच महत्वाचे आहे. कारण ते कळले नाही तर सारा जन्मच व्यर्थ जातो. अर्थात इथे सत्य म्हणजे ' अंतिम सत्य ' हा अर्थ अपेक्षित आहे. 

अंतिम सत्य एकच आहे. ते म्हणजे परमात्म वस्तू म्हणजेच ईश्वरी तत्त्व. त्याचा शोध मोठा कष्टपूर्वक आणि आदरपूर्वक घ्यावा लागतो. असा शोध घेता घेता कधी कधी संपूर्ण आयुष्यही खर्ची पडू शकते. कारण ही एक दिवसात होणारी गोष्ट नाही. त्यासाठी त्या गोष्टीचा सतत ध्यास असावा लागतो. सत्याचा मार्ग काटेरी असतो. अनेक संतांनी ईश्वराच्या शोधात अनंत कष्ट सहन केले आहेत. आपले संपूर्ण जीवन खर्ची घातले आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांना समाजाच्या प्रचंड छळाला तोंड द्यावे लागले आहे. सत्याच्या शोधात गौतम बुद्ध घरातून निघून गेले. सर्व सुखांचा त्याग करून कठोर तपश्चर्या केली. नंतरच त्यांना सत्याचे दर्शन झाले. भगवान महावीरांनी देखील तप केले. ईश्वराचा ध्यास लागल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी देखील त्याच्या प्राप्तीसाठी अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिले. 

वैज्ञानिकांना देखील सत्याचा शोध घेताना अनेक दिव्यातून जावे लागते. परंतु त्यांनी त्याचे वेड घेतलेले असते. त्यातूनच अनेक शोध लागतात. गॅलिलिओ, कोपर्निकस, आईन्स्टाईन, न्यूटन, एडिसन इ. अनेक शास्त्रज्ञांना खडतर जीवनाला सामोरे जावे लागले. पण वैज्ञानिक आणि संत यांच्या शोधात एक मूलभूत फरक असतो. वैज्ञानिक बाह्य जगतातील सत्याचा शोध घेतात तर संत अंतर्यामातील सत्याचा शोध घेतात. संत सत्याशी एकरूप होतात. वैज्ञानिक मात्र त्या दृष्टीने खऱ्या सत्यापासून दूरच असतात. आपल्यासारख्या सामान्य माणसाने देखील अंतिम सत्याचा आदरपूर्वक शोध घ्यावा असे समर्थ सांगतात. ही गोष्ट एक दिवसात होणारी नाही. पण हा शोध घेता घेता एक दिवस  ईश्वराचे दर्शन मात्र नक्कीच घडते. आत्मसाक्षात्कार घडतो. ज्याप्रमाणे दिव्याचा प्रकाश पडला की अंधार आपोआप नष्ट होतो त्याप्रमाणेच आत्मदर्शन घडले की माया, मोह,अहंकार हे विकार नष्ट होतात. हे जग सत्य आहे ही भ्रांती, वैचारिक गोंधळामुळे निर्माण होणारा भ्रम नष्ट होतो. अज्ञान नष्ट होते. 

स्वसंवाद 

१. "चकाकणारे सर्वच सोने नसते" या न्यायाने, मी या नश्वर जगतातील बाह्य आकर्षणांनाच सत्य मानून चाललो आहे, की त्यामागील अंतिम सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो?

२. संतांनी आणि महापुरुषांनी कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन सत्याचा ध्यास घेतला, तशी तळमळ आणि आदर माझ्या मनात ईश्वरी सत्याबद्दल आहे का?

३. मी केवळ बाह्य जगतातील भौतिक गोष्टींच्या (विज्ञानाच्या) शोधात मग्न आहे, की संतांप्रमाणे माझ्या अंतर्यामात डोकावून स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचा शोध घेतो?

४. आत्मज्ञानाचा प्रकाश पडताच अज्ञान, मोह आणि भ्रम नष्ट होतात यावर माझा विश्वास असून, मी दैनंदिन जीवनात 'अखंड सावधानता' बाळगतो का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

३१/७/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...