उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १२६
जनाकारणे देव लीळावतारी ।
बहुतांपरी आदरे वेषधारी ।
तया नेणती ते जन पापरूपी ।
दुरात्मे महा नष्ट चांडाळ पापी ।।१२६।।
अर्थ : भक्तांच्या उद्धारासाठी भगवंत सहजपणे पृथ्वीवर अवतार घेतो. अत्यंत प्रेमपूर्वक तो नाना प्रकारचे वेष धारण करतो. परंतु जे लोक त्याला ओळखत नाहीत ते दुरात्मे, वाईट, भगवंताबद्दल सद्भाव नसणारे आणि पापी समजावे.
( लीळा - लीला/क्रीडा, बहुतांपरी -वेगवेगळ्या प्रकारे, आदरे - प्रेमपूर्वक, वेषधारी - निरनिराळ्या रूपात प्रकट होणे, नेणती - न जाणणारे , दुरात्मे - भगवंतापासून दूर गेलेले आत्मे, नष्ट - वाईट, चांडाळ - भगवंताबद्दल आदर नसलेला )
विवेचन
आधीच्या श्लोकांमध्ये समर्थांनी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितले आहे की देव आपल्या भक्तांची उपेक्षा करीत नाही. या श्लोकामध्ये भक्तांसाठी परमेश्वराचे एक महत्वाचे लक्षण ते सांगून ठेवतात. ती गोष्ट म्हणजे आपल्या भक्तांच्या रक्षणार्थ अवतार घेणे ही भगवंताची लीला आहे. लीला या शब्दाचे दोन प्रकारे अर्थ आपल्याला घेता येतील. लीला म्हणजे चमत्कार आणि दुसरा अर्थ म्हणजे क्रीडा. एखादी गोष्ट अत्यंत सहजपणे करणे. भगवंतासाठी अवतार घेणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, " अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्यां त्यांसी." आपल्या पूर्वीच्या नऊ अवतारात त्याने वेगवेगळ्या प्रकारे देह धारण केला आहे. परंतु आपल्या भक्तांच्या साहाय्यार्थ वेगवेगळा वेष धारण करून त्याने त्यांना साहाय्य केले आहे. दामाजीपंतांसाठी त्याने विठू महाराचे रूप घेतले. एकनाथ महाराजांकडे त्याने श्रीखंड्या म्हणून पाणी भरले. जनाबाईला दळण दळू लागला. ' भक्त कैवारीया होसी नारायणा ' असा तो वेगवेगळ्या वेशात भक्तांचा कैवारी झाला. आणि हे सगळे त्याने कसे केले ? तर समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे " बहुतांपरी आदरे वेषधारी " म्हणजे अत्यंत प्रेमपूर्वक. दयाळू, कृपाळू होऊन.
आपण सामान्य माणसे. आपल्याला फक्त दोनच गोष्टी करता येतात. आपले नित्यकर्म आपण करू शकतो. सत्कर्मे करून पुण्याचा संचय गाठी बांधू शकतो. संत मात्र आपल्या अवतारात दोन प्रकारच्या गोष्टी करतात. एक म्हणजे धर्माबद्दलची जागृती घडवून आणणे आणि समाजामधील सात्विकता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे. सर्व संतांनी ही कामे केली आहेत. पण परमेश्वर जेव्हा अवतार घेतो तेव्हा तो या दोन गोष्टींव्यतिरिक्त आणखी एक तिसरी गोष्ट करतो. ती म्हणजे सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे पारिपत्य. "परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।" हे त्याचे ब्रीदच आहे.
आपल्या भक्तांसाठी तो नाना प्रकारचे देह धारण, वेष धारण करतो. त्याचे अनन्य भक्त त्याला ओळखू शकतात. परंतु दुर्जनांच्या कितीही सहवासात तो आला तरी अशी माणसे त्याला फक्त एक देहधारी व्यक्ती किंवा सामान्य माणूस समजतात. महाभारतात कुंती, अर्जुन, द्रौपदी, भीष्म आदींनी ओळखले होते की श्रीकृष्ण हा प्रत्यक्ष परमात्मा आहे. परंतु दुर्योधन, शिशुपाल आणि अन्य दुराचारी राजे मात्र त्याचा उल्लेख शेवटपर्यंत ' गवळ्याचा पोर ' असाच करत राहिले. रावण देखील आयुष्यभर रामाची एक सामान्य मानव म्हणून हेटाळणी करत आला.
अशा परमेश्वराला किंवा त्याच्या अस्तित्वाला ओळखण्यास नकार देणाऱ्या दुष्प्रवृत्ती आजही समाजात आहेत. अशा लोकांबद्दल बोलताना समर्थांच्या मनात संतापाची भावना दाटून येते. त्यामुळे अशा लोकांचा उल्लेख ते दुरात्मा, दुराचारी, पापी, चांडाळ अशा प्रकारचे शब्द वापरून करतात. असे लोक स्वतः तर काही करीत नाहीतच पण इतर सत्प्रवृत्त आणि श्रद्धावान लोकांचाही बुद्धिभेद करण्याचे काम करतात. अशा लोकांना उद्देशून समर्थांनी वरील शब्द योजले आहेत. आपण अशा लोकांच्या फसव्या युक्तिवादाला बळी न पडता संतांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून परमेश्वराची भक्ती करावी हेच समर्थांना अपेक्षित आहे.
स्वसंवाद
१. दामाजीपंत किंवा संत एकनाथांप्रमाणे, माझ्या आयुष्यातही भगवंत 'नाना वेष धारण करून' मला मदत करत असेल, तर त्याला ओळखण्याइतकी निर्मळ दृष्टी माझ्याकडे आहे का?
२. भगवंत माझ्यावर आणि जगावर अत्यंत 'प्रेमपूर्वक' (आदरे) कृपा करत असताना, मी मात्र दुर्योधनासारखा कोरडा आणि अविश्वासी दृष्टिकोन तर बाळगत नाही ना?
३. आजच्या काळात जे लोक श्रद्धेची किंवा सत्कर्माची खिल्ली उडवून 'बुद्धिभेद' करतात, त्यांच्या फसव्या युक्तिवादाला मी बळी पडतो, की माझा विश्वास संतांच्या शिकवणुकीवर अढळ ठेवतो?
४. 'देव लीलावतारी आहे', हे जाणून मी माझ्या जीवनातील संकटांना घाबरून जाण्याऐवजी, त्यामागील ईश्वराची 'सहज लीला' पाहण्याचा आणि स्वीकारण्याचा प्रयत्न करतो का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१२/७/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा