उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १३८
भ्रमे नाडळे वित्त ते गुप्त जालें ।
जिवा जन्मदारिद्र ठाकूनि आलें ।
देहेबुधिचा निश्चयो ज्या टळेना ।
जुने ठेवणें मीपणें आकळेना ।।१३८।।
अर्थ : भ्रमामुळे माणसाला त्याच्याजवळ असलेले धन देखील दिसत नाही. त्यामुळे त्याला जन्मभर दारिद्र्याचा सामना करावा लागतो. देहबुद्धीने आपल्याला घट्ट असे पकडले आहे. त्यामुळे आपल्याजवळ असणाऱ्या अनादी अशा आत्मरुपी धनाची आपल्याला जाणीव होत नाही.
( गुप्त जालें - सापडत नाही, ठाकूनि - समोर उभे राहिले )
विवेचन
देहबुद्धीमुळे आपण आपला कसा घात करून घेत आहोत ते समर्थ या श्लोकात आपल्याला सांगतात. देहबुद्धीमुळे आपल्याला सत्य काय आहे हे कळत नाही. आपल्याला दिसणारे जग हे भासमान आहे हे लक्षात येत नाही. तेच खरे मानून आपण चालतो. त्यामुळे भ्रमिष्ट माणसासारखी आपली अवस्था होते. वेद, उपनिषदांनी आणि संतांनी वारंवार वर्णन करून सांगितलेला मोक्षमार्ग किंवा आत्मस्वरूपाचे ज्ञान याची जाणीव आम्हाला होत नाही. समर्थ यालाच अनादी धनाचा ठेवा म्हणतात. हा ठेवा आमच्याजवळ असून आम्हाला दिसत नाही. आपल्या उशाशी असलेला दीपक आपल्याला दिसत नाही. आपण अंधारात चाचपडत राहतो. हे सर्व अज्ञानामुळे घडते. म्हणूनच गौतम बुद्धांसारखे महात्मे आपल्याला ' अत्तदीप भव ' असे सांगत राहतात. संत ज्ञानेश्वर म्हणतात,
मी अविवेकाची काजळी । फेडुनी विवेकदीप उजळी ।
तै योगियां पाहे दिवाळी । निरंतर ।।
साधक किंवा योगी आपल्या आत्म्यावर चढलेली अविवेकाची ( अज्ञानाची ) काजळी दूर करून विवेकाचा दीप पेटवतो. त्यामुळे त्याच्या जीवनात दिवाळीसारखा आनंदरूपी प्रकाश कायमच भरून राहिलेला असतो.
समर्थ ज्याला 'जुने ठेवणे' म्हणतात ती गोष्ट खरं म्हणजे आपल्या हिताची आहे. परंतु खरंच ती गुप्त आहे का ? तर ती गुप्त नाही पण तिच्याकडे पाहण्याची दृष्टीच आपल्याकडे नसल्याने आपल्याला ती दिसत नाही. खरंतर ती गोष्ट उघड, आहे प्रगट आहे. आपला विवेक आणि वैराग्य जागृत असेल तर तो अक्षय सुखाचा ठेवा निश्चितपणे आपल्याला प्राप्त होऊ शकतो.
परंतु आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीला देहबुद्धी घट्ट चिकटून बसलेली असते. त्यामुळे आपल्या अंतर्यामी आपली नजर वळतच नाही. खरं तर अक्षय सुखाचा ठेवा आपल्या अंतर्यामीच आहे. परंतु अज्ञानामुळे वासनेच्या पोटी जीव पुन्हा पुन्हा जन्मरणाच्या फेऱ्यात अडकतो. यालाच समर्थ जन्मदारिद्र्य असे म्हणतात. आपली भारतीय संस्कृती महान आहे. आपल्या परंपरा, संस्कार आपण टाकाऊ समजून सोडून देतो आहोत. ' जुने जाऊ द्या मरणालागुनी ' असे आपण म्हणतो. पण जुन्यातील सर्वच गोष्टी टाकाऊ नसतात. कालानुरूप काही दोष प्रत्येक गोष्टीत निर्माण होतात. तेवढे दूर केले तर भारतीय संस्कृतीतील ज्ञानाचा हा अमूल्य ठेवा आजही आम्हाला आणि जगाला मार्गदर्शन करू शकेल.
स्वसंवाद
१. माझ्या जवळच आत्मरूपाने शाश्वत आनंदाचा ठेवा असूनही, मी अज्ञानामुळे आणि भ्रमामुळे बाह्य विश्वात सुखाचा शोध घेत आहे का?
२. संत ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे, मी माझ्या मनावर साचलेली 'अविवेकाची काजळी' दूर करून 'विवेकदीप' उजवळण्याचा प्रयत्न करतो का?
३. 'मी म्हणजे केवळ हा देह' या मर्यादित विचाराने (देहबुद्धीने) मला घट्ट पकडून ठेवले आहे, की मी स्वतःला त्या पलीकडचे चैतन्य समजून जगू शकलो आहे?
४. जुन्या परंपरांना किंवा विचारांना त्याज्य म्हणून नाकारण्याऐवजी, त्यातील अमूल्य ज्ञान ओळखून स्वतःच्या जीवनात उतरवण्याची दृष्टी माझ्याकडे आहे का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
२४/७/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा