मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग ११७

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ११७ 

धुरु लेकरू बापुडे दैन्यवाणे ।

कृपा भाकिता दीधली भेटि जेणें ।

चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी ।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ।।११७।।

अर्थ : ध्रुव बाळ बिचारा दीनवाणा बालक होता. त्याने भगवंताजवळ कृपेची याचना केली तेव्हा प्रसन्न होऊन भगवंताने त्याला दर्शन दिले. आपल्या प्रेमभक्तीने त्याचे जीवन परिपूर्ण करून भगवंताने त्याला तारकामंडळात अढळ स्थान दिले. भगवंत आपल्या भक्तांचा अभिमानी असून तो त्यांची कधीही उपेक्षा करीत नाही. 

(धुरु - ध्रुव बाळ, बापुडे - बिचारा, दैन्यवाणा - ज्याची कीव यावी असा, कृपा भाकणे - कृपेची याचना करणे, चिरंजीव - अमर, प्रेमखाणी - प्रेम/भक्तीचा साठा /उगम )

विवेचन 

देव आपल्या भक्ताचा कैवारी कसा आहे ते समर्थ या श्लोकातही आपल्याला सांगतात. ध्रुव बाळाची गोष्ट लहानपणी आपण सगळ्यांनी बहुतेक ऐकलेली असते. परंतु परमेश्वराची कृपा काय असते ते समर्थ या श्लोकातून सांगतात. ध्रुव हा उत्तानपाद राजाचा मुलगा. या उत्तानपाद राजाला दोन राण्या होत्या. सुनिती ही मोठी राणी होती आणि धाकटी होती सुरुचि. सुरुचि ही राजाची लाडकी आणि त्यामुळेच गर्विष्ठ झालेली होती. सुनीति मात्र अत्यंत समजूतदार आणि गुणी होती. तिचाच मुलगा ध्रुव. सुरुचि ही सुनीतिचा आणि तिच्या मुलाचा अतिशय द्वेष करीत असे. राजा तर पूर्णपणे सुरुचिच्याच कह्यात गेला होता. एक दिवस खेळता खेळता छोटा ध्रुव राजाच्या म्हणजे आपल्या पित्याच्या मांडीवर जाऊन बसला. सुरुचिला ते अजिबात आवडले नाही. तिने राजाच्या मांडीवरून ओढून त्याला हाकलले आणि ओरडून म्हणाली, " जा चालता हो. पुन्हा इथे यायचे नाही. राजाची मांडी किंवा राज्याचे सिंहासन यावर बसण्याची तुझी पात्रता नाही." ध्रुव बिचारा रडत आपल्या आईकडे गेला. त्याने आईला ही घटना सांगितली. आईला खूप वाईट वाटले पण ती काही करू शकत नव्हती. तिने त्याची समजूत घातली. ती म्हणाली, " बाळा, मागील जन्मी काहीतरी पातक आपल्या हातून घडले असेल. त्यामुळे आज असे दिवस आपल्याला पाहावे लागत आहेत. पण एक लक्षात ठेव. राजाची मांडी किंवा सिंहासन या तात्पुरत्या गोष्टी आहेत. तू परमेश्वराची आराधना कर. तो सर्वांचे पालन करणारा आहे. तो प्रसन्न झाला म्हणजे तुला कोणी कुठूनही  हाकलू शकणार नाही. "

आपल्या आईचे हे उद्गार ऐकून ध्रुव बाळाने परमेश्वराला प्रसन्न करून घेण्याचा निश्चय केला. तो लहान असला तरी दृढनिश्चयी होता. त्याने जंगलाचा रस्ता धरला. वाटेत त्याची आणि नारदमुनींची भेट झाली. नारदांनी त्याची हकीगत जाणून घेतली. त्याला मंत्र देऊन भगवद्भक्तीचा मार्ग सांगितला. ध्रुवाने तहान -भूक कशाचीच पर्वा न करता कठोर तपश्चर्या केली. त्याच्या भक्तीने भगवान विष्णू प्रसन्न झाले. 

ध्रुव भगवंताच्या नामस्मरणात एवढा मग्न होता की प्रत्यक्ष देव त्याच्यासमोर उभा राहिला तरी त्याला त्याचे भान नव्हते. शेवटी भगवंताने त्याला म्हटले, " बाळ, डोळे उघड. मी प्रत्यक्ष परमेश्वर तुझ्या भक्तीने प्रसन्न होऊन तुला वर देण्यासाठी आलो आहे."

देवाचे मनोहर रूप पाहताच ध्रुव आपल्याला काय मागायचे आहे हे विसरला. भगवंताने आपल्या दिव्य शंखाचा स्पर्श त्याच्या गालाला करताच त्याला ज्ञान प्राप्त होऊन तो भगवंताची स्तुती करू लागला. भगवान विष्णूंनी त्याला त्याचे राज्य तर दिलेच परंतु आकाशातील तारकासमूहात त्याला असे अढळ स्थान प्राप्त करून दिले की जिथून त्याला कोणीही उठ म्हणू शकणार नाही. आपण आकाशात पाहतो तोच तेजस्वी ध्रुवतारा म्हणजे बाळ ध्रुव. तो परमेश्वरकृपेने चिरंजीव झाला. 

परमेश्वर आपल्या भक्तांना न मागता सर्व काही देतो हे आपल्याला मागील श्लोकातील उपमन्यू किंवा या श्लोकातील ध्रुव बाळाच्या उदाहरणावरून समजते. तो आपल्या भक्तांचा कैवारी आहे. त्यांची तो उपेक्षा करीत नाही. उपमन्यू किंवा ध्रुव बाळाची कथा या प्रतीकात्मक आहेत असे आपण मानले तरी परमेश्वराची कृपा काय असते हे या उदाहरणांवरून आपल्याला दिसते. राजाची मांडी किंवा सिंहासन या प्रतीकात्मक गोष्टी आहेत. त्या ऐहिक सुखाचे प्रतिनिधित्व करतात. आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले की काही मिळवायचे शिल्लक राहत नाही. म्हणून आपण भक्तिमार्गाचा अवलंब केला पाहिजे असे समर्थ यातून सूचित करतात. 

स्वसंवाद 

१. ध्रुव बाळाप्रमाणे माझ्या आयुष्यात जेव्हा कुणी माझा अपमान करतं, तेव्हा मी सूडबुद्धीने रागावत बसतो, की त्या दुःखाचे रूपांतर एखाद्या उच्च ध्येयाच्या (किंवा ईश्वराच्या) आराधनेत करतो? 

२. "राजाची मांडी किंवा सत्ता ही तात्पुरती आहे," या सुनीतीच्या उपदेशाप्रमाणे, मला हे समजले आहे का की संसारातील भौतिक पदे क्षणभंगुर असून केवळ सत्कर्म आणि भक्तीच अढळ असते ? 

३. ध्रुव बाळासारखा दृढनिश्चय माझ्या अंगी आहे का ? एखादे चांगले काम किंवा साधना हाती घेतल्यावर तहान-भूक विसरून मी त्यात पूर्णपणे मग्न होतो का ? 

४. जेव्हा मला ईश्वराची कृपा किंवा आयुष्यात मोठे यश प्राप्त होते, तेव्हा मी भौतिक गोष्टींची हाव न धरता केवळ कृतज्ञतेने 'स्तुती' (समाधान) करायला शिकलो आहे का ?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

५/७/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...