उगवतीचे रंग
मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १३२
विचारूनि बोले विवंचूनि चाले ।
तयाचेनि संतप्त ते ही निवाले ।
बरे शोधिल्यावीण बोलो नको हो ।
जनीं चालणे शुद्ध नेमस्त राहो ।।१३२।।
अर्थ : जी व्यक्ती बोलताना नेहमी विचार करून बोलते आणि आपले वर्तन विवेकपूर्ण ठेवते अशा व्यक्तींचा सहवास लाभल्यानंतर संसारात तापाने किंवा दुःखाने पोळलेली माणसे देखील शांत आणि समाधानी होतात. बोलताना आपण सर्व बाजुंनी विचार केल्याशिवाय बोलू नये. लोकांमध्ये वावरताना आपले वागणे बोलणे शुद्ध आणि विवेकपूर्ण हवे.
( विचारूनि - विचारपूर्वक, विवंचूनि - मागचा पुढचा विचार करून/विवेकाने, नेमस्त - शिस्तबद्ध )
विवेचन
आजच्या भाषेत सांगायचे तर समर्थ हे मॅनेजमेंट गुरू आहेत. त्यांचा हा श्लोक पाहिला तर ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते. जीवनात ज्यांना आपली प्रगती साधायची आहे, ध्येय गाठायचे आहे अशा सर्वच लोकांसाठी हा श्लोक मार्गदर्शक आहे. जीवनात कसे वागावे हे समर्थांनी या श्लोकात सांगितले आहे. सर्वसामान्य माणूस बऱ्याच वेळा विचार न करता बोलतो. परंतु समर्थ म्हणतात की बोलताना आपण साधक बाधक विचार करून बोलले पाहिजे. आपल्या मुखातून बाहेर पडलेले शब्द म्हणजे सुटलेल्या बाणासारखे असतात. ते परत घेता येत नाहीत. त्यामुळे लोक दुखावले जाऊ शकतात. म्हणून विचारपूर्वक बोलले पाहिजे म्हणजे पश्चात्तापाची वेळ येत नाही. आजकाल समाजमाध्यमांवर विचार न करता लिहिणाऱ्या आणि बोलणाऱ्यांची भाऊगर्दी झाली आहे. अभ्यासपूर्ण बोलण्याऐवजी भडक लिहिणाऱ्या बोलणाऱ्यांची चलती आहे. समाजाची नैतिक पातळी घसरताना दिसते आहे. वागण्याबोलण्यातील विवेक हरवताना दिसतो आहे. म्हणूनच समर्थांचा उपदेश आज कधी नव्हे तो जास्त मोलाचा आहे. ' अभ्यासोनि प्रकटावे ' असे समर्थांनी दासबोधात जे सांगितले आहे त्याचा अर्थ हाच आहे.
आजच्या धावपळीच्या जगात जो तो विविध प्रकारच्या तापांनी किंवा दुःखाने त्रस्त आहे. कोणीतरी दोन प्रेमाचे शब्द बोलले की त्याला बरे वाटते. जी माणसे समर्थांनी सांगितल्यानुसार विचारपूर्वक वागतात आणि बोलतात अशा माणसांचा सहवास लाभला तर दुःखी आणि त्रस्त जीवांना बरे वाटते. त्यांच्याशी बोलून समाधान वाटते. समाजमाध्यमांवर विचार न करता व्यक्त होणारी माणसे पाहिली की समर्थांनी जे ' बरे शोधिल्यावीण बोलो नको हो ' हे किती मह्त्वाचे आहे हे पटते. सभांमध्ये उथळपणे विचार मांडणारे नेते, एकमेकांवर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे नेते, त्यांच्या विचारांना प्रसिद्धी देणारी प्रसिद्धीमाध्यमे या सर्व गोष्टी पाहिल्या की समाजाची नैतिक आणि वैचारिक अधोगती होत आहे असे दिसते.
लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्रा.राम शेवाळकर आदींची भाषणे पाहिली तर त्यांच्या सखोल अभ्यासाची साक्ष पटते. असे खरोखर ' अभ्यासोनि प्रकटणारे ' वक्ते आणि नेते आज अभावानेच आढळतात. म्हणूनच वागणे बोलणे हे ' नेमस्त ' म्हणजे शिस्तबद्ध असावे. चारित्र्य शुद्ध असावे तरच जनमानसावर प्रभाव पडू शकेल. समर्थांचा हा उपदेश जीवनात किंवा अध्यात्मात कोणालाही यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
स्वसंवाद
१. समाजमाध्यमांवर (Social Media) किंवा प्रत्यक्ष जीवनात व्यक्त होताना मी 'अभ्यासोनि प्रकटावे' या नियमाचे पालन करतो, की केवळ भावनेच्या भरात विचार न करता उथळ बडबड करतो?
२. माझ्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांमुळे संसारात तापलेल्या किंवा दुःखी माणसांना 'शांतता आणि समाधान' मिळते, की माझ्या बोलण्याने त्यांचा त्रास अधिक वाढतो?
३. माझ्या कामाच्या ठिकाणी किंवा समाजात वावरताना माझे चारित्र्य आणि आचरण खरोखरच 'शुद्ध आणि नेमस्त' (शिस्तबद्ध) आहे का?
४. भूतकाळातील थोर विचारवंत आणि वक्त्यांचा आदर्श समोर ठेवून, मी बोलण्याआधी 'साधक-बाधक विचार' करण्याची सवय स्वतःला लावून घेतली आहे का?
( क्रमशः )
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१५/७/२०२६
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा