मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १३०

उगवतीचे रंग 

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १३०

मना अल्प संकल्प तो ही नसावा ।

सदा सत्य संकल्प चित्ती वसावा ।

जनी जल्प वीकल्प तो ही तजावा ।

रमाकांत येकांतकाळी भजावा ।।१३०।।

अर्थ :  हे मना, अल्प किंवा संकुचित वासना किंवा इच्छा सुद्धा नसावी. आपल्या मनात नेहमी सद्विचारांना किंवा जे संपूर्ण सत्य आहे त्यालाच स्थान द्यावे. व्यर्थ बडबड आणि संशयाचा त्याग करावा. एकांतात भगवंताचे भजन करावे. 

( संकल्प - निश्चय/इच्छा, जल्प - व्यर्थ बडबड, विकल्प - संशय, तजावा - टाकून द्यावा )

विवेचन 

आधीच्या श्लोकात समर्थांनी आपल्याला मनातीत होण्याचा उपदेश केला. ते मनातीत कसे व्हायचे त्याचे रहस्य ते या श्लोकात सांगत आहेत. हे जग आभासी आहे. सत्य आणि असत्य यांचे मिश्रण आहे. अशा या जगात आपल्याला वावरावे लागते. त्यामुळे मनामध्ये नाना प्रकारच्या इच्छा, वासना आणि संकल्प निर्माण होतात. व्यावहारिक दृष्टीने योग्य प्रमाणात त्यांची पूर्तता होणे हेही आवश्यक असते. परंतु ज्याला उत्तम गती प्राप्त करून घ्यायची आहे, त्याला त्यांच्या अधिक आहारी जाऊन चालणार नाही. हे विश्व म्हणजे मायेचा पसारा असे म्हटले जाते. दृश्य जगताची मोहिनी आपल्यावर पडते. ते आपल्याला खरे वाटू लागते. पण त्यामुळे जे अंतिम किंवा पूर्ण सत्य आहे, त्यापासून आपण दूर जातो. परमेश्वर अंतिम सत्य आहे. म्हणून ऐहिक जीवनातील गोष्टींबद्दल वासना अल्प प्रमाणात देखील असतील तर जन्म मृत्यूचे चक्र अटळ आहे. म्हणून समर्थ म्हणतात की संकल्प म्हणजे इच्छा, वासना अल्प प्रमाणात देखील नको. कारण त्या परमार्थाला मारक आहेत. 

अनेक लोकांना व्यर्थ बडबड करण्याची सवय असते. बडबडीतून खूप मोठी शक्ती खर्च होते. व्यवहारात वागायचे तर बोलावे तर लागणारच. परंतु जेव्हा मोजके बोलण्याने काम भागत असेल तेव्हा व्यर्थ बडबड करण्यात काय हशील ? ज्ञानी माणसांचे बोलणे कसे असते किंवा कसे असावे हे ज्ञानेश्वर माउली फार सुंदर शब्दात सांगतात. 

 तैसे साच आणि मवाळ। मितले आणि रसाळ।शब्द जैसे कल्लोळ अमृताचे ।।

तसेच संशयाला देखील मनात थारा देऊ नये. व्यर्थ बडबड आणि संशय या गोष्टी परमार्थात हानिकारक आहेत. काही वेळा संशयाला विवेकाचा आधार असेल तर संशय यायला हरकत नाही. परंतु जेव्हा संशयासाठी संशय किंवा संशयी वृत्ती निर्माण होते, तेव्हा अशी व्यक्ती परमेश्वराची साधना करू शकत नाही. साधनेसाठी मन स्थिर लागते. संशयी मन नेहमी डळमळीत असते. ' संशयात्मा विनश्यति ' असे म्हटले जाते. तेव्हा मन स्थिर ठेवण्यासाठी आणि आधीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे मनातीत होण्यासाठी एकांतात परमेश्वराला भजावे, त्याचे ध्यान करावे. ' एकांत ' या शब्दाचा अर्थ आपण स्वतःला जो एक समजतो त्या एकाचाही अंत. अशा स्थितीत मन हळूहळू निर्विचार होऊ लागते. म्हणून एकांताचाही अभ्यास करावा लागतो. एकांतात मन एकाग्र होते. असे एकाग्र मनच मग कुठल्याही विषयाचा अभ्यास करू शकते. अनेक साधुसंत ठराविक काळासाठी एकांतात जात असत. समर्थ तर लोकविलक्षण संत ! त्यांनी लोकसंग्रह तर केलाच पण जेव्हा साधनेची आवश्यकता भासत असे तेव्हा नित्यनेमाने ते एकांत जवळ करीत. तुकाराम महाराज साधनेसाठी भंडाऱ्याच्या डोंगरावर जात. 

स्वसंवाद 

१. माझ्या मनात ऐहिक सुखाचे 'अल्प संकल्प' (संकुचित वासना) अधिक आहेत, की मी 'सत्य संकल्पावर' (परमेश्वरावर) लक्ष केंद्रित केले आहे? 

२. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे माझे बोलणे मवाळ आणि रसाळ असते, की मी केवळ 'व्यर्थ बडबड' (जल्प) करून माझी ऊर्जा वाया घालवतो?

 ३. माझ्या मनात उगीचच संशय (विकल्प) घेण्याची सवय बळावली आहे का, ज्यामुळे माझ्या मनाची शांती आणि स्थिरता ढळत आहे? 

४. 'एकांत' म्हणजे केवळ लोकांपासून दूर जाणे नव्हे, तर 'स्वतःच्या अहंकाराचा (मी पणाचा) अंत' करणे, हे ओळखून मी रोज थोडा वेळ तशा साधनेत व्यतीत करतो का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१४/७/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...